Weekly Weather : बुधवारपासून चांगल्या पावसाचा अंदाज

Rain Forecast : राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. काही भागात जोराचा पाऊस, काही भागांत अतिवृष्टी अशीही परिस्थिती राहील. त्यामुळे या आठवड्यात बुधवारपासून शनिवारपर्यंत (ता.१९ ते २२) चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
Rain Forecast
Rain ForecastAgrowon

Agriculture Weather : महाराष्ट्रावर आजपासून मंगळवार (ता.१६ ते १८) पर्यंत हवेचे दाब १००४ हेप्टापास्कल इतके राहतील. मात्र बुधवार (ता. १९) पासून हवेचे दाब १००० ते १००२ हेप्टापास्कल इतके कमी होतील. त्यावेळी राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. काही भागात जोराचा पाऊस, काही भागांत अतिवृष्टी अशीही परिस्थिती राहील. त्यामुळे या आठवड्यात बुधवारपासून शनिवारपर्यंत (ता.१९ ते २२) चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. अरबी समुद्राची शाखा सक्रिय होईल. त्याशिवाय बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर १००० ते १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब आठवडाभर राहील. त्यामुळे तेथे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात सर्व महाराष्ट्रावर, उत्तर भारतातील मध्यप्रदेशावर तसेच उत्तरेकडील भागावर ढग जमा होतील. आणि मॉन्सून वेगाने उत्तर भारताचे दिशेने आगेकूच करेल. उत्तर भारतावर हिमालयाच्या पायथ्याशी तसेच काश्मीरवर ९९४ ते ९९६ हेप्टापास्कल इतके कमी हवेचे दाब राहतील. त्यामुळे मॉन्सून निर्धारित वेळेपूर्वी उत्तर भारतातील बहुतांशी भागांत दाखल होईल.

सध्या मॉन्सूनने महाराष्ट्राचा जवळपास सर्व भाग व्यापलेला असून मॉन्सून वारे उत्तर भारताच्या दिशेने आगेकूच करीत आहेत. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच पश्चिम विदर्भात कमाल तापमानात घसरण झाली असून ते ३५ ते ३८ अंशावर आहे.

प्रशांत महासागराच्या पेरूजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून इक्वॅडोरजवळ ते २५ अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे ‘एल-निनो’ संपुष्टात आला असून ‘ला-निना’चा प्रभाव सुरू झाला आहे. हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअस, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. ही बाब चांगल्या पावसासाठी अनुकूल आहे.

Rain Forecast
Monsoon Update : मॉन्सूनची चाल मंदावली

कोकण :

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आज आणि उद्या (ता.१६,१७) ५ ते ८ मिमी, तर रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत २.५ ते ३.५ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ९ ते १० किमी, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ताशी १७ किमी राहील.

कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. पालघर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ६७ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र :

आज आणि उद्या (ता.१६,१७) नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण १ ते १.५ मिमी इतके कमी राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत वाढेल. वाऱ्याचा वेग नाशिक व जळगाव जिल्ह्यात ताशी २२ ते २३ किमी, तर नंदूरबार व धुळे जिल्ह्यांत ताशी २५ ते २६ किमी राहील. कमाल तापमान धुळे जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर नाशिक, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नंदूरबार जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर उर्वरित जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ४६ टक्के राहील.

मराठवाडा :

धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १ ते २.४ मिमी पावसाची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण आज आणि उद्या (ता.१६,१७) कमी राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. तसेच वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत २० किमी इतका अधिक राहील. कमाल तापमान जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३७ ते ३८ अंश सेल्सिअस, तर लातूर जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस आणि बीड जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर हिंगोली, बीड व जालना जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव व परभणी जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस, तर लातूर व नांदेड जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ४४ टक्के राहील.

Rain Forecast
Monsoon Rain : पाऊस कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार ? राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज कायम

पश्चिम विदर्भ :

आज आणि उद्या (ता.१६,१७) अकोला व अमरावती जिल्ह्यांत पावसात उघडीप राहण्याची शक्यता आहे. तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची शक्यता आहे. बहुतांशी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहण्यामुळे या प्रकारची स्थिती निर्माण होत आहे. मात्र बुधवार (ता. १९) नंतर पावसाच्या प्रमाणात वाढ होईल.

सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २१ ते २४ किमी राहील. कमाल तापमान बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३६ ते ३७ अंश सेल्सिअस, तर अमरावती जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० टक्के राहील.

मध्य विदर्भ :

आज आणि उद्या (ता.१६,१७) यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १ ते ३.३ मिमी इतक्या अल्प पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा वेग वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ताशी १७ ते १८ किमी, तर यवतमाळ जिल्ह्यात ताशी २२ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४१ ते ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ५० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के राहील.

पूर्व विदर्भ :

आज आणि उद्या (ता.१६,१७) चंद्रपूर जिल्ह्यात २.५ ते ८.२ मिमी, गडचिरोली जिल्ह्यात १२ ते २३ मिमी, भंडारा जिल्ह्यात ११ मिमी व गोंदिया जिल्ह्यात २.२ ते ७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली जिल्ह्यात ताशी १० किमी, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ताशी १५ किमी, तर भंडारा जिल्ह्यात ताशी १९ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३५ ते ३६ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४० ते ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, गोंदिया जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ४३ टक्के राहील.

पश्चिम महाराष्ट्र :

सांगली व सातारा जिल्ह्यांत आज आणि उद्या (ता.१६,१७) ४.६ ते ७.७ मिमी, तर कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत १ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर जिल्ह्यात ताशी १३ किमी, तर सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ताशी १७ ते २० किमी राहील. कमाल तापमान सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर सातारा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सोलापूर व सांगली जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. तसेच सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ६५ टक्के राहील.

कृषी सल्ला :

पेरणीयोग्य पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत वाफसा आल्यावर खरीप पिकांच्या पेरणीस सुरुवात करावी.

भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्यावर बियाणे पेरून रोपवाटिका तयार करावी.

फळपिकांच्या लागवडीसाठी भरलेल्या खड्ड्यांमध्ये कलमी रोपांची लागवड करून घ्यावी.

गोठ्यातील जनावरांना आणि कुक्कुटपक्ष्यांना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com