Maharashtra Politics: दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रात सध्या सहकाराच्या गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न ‘गोकुळ’च्या माध्यमातून झाल्याने हादऱ्याचे केंद्र कोल्हापूरकडे वळले आहे. एका जिल्हा संघाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या दोन घटक पक्षांनी काँग्रेसला पर्यायाने सतेज पाटील यांना मोठी ताकद दिली आहे. राज्यात जमेल तेथे सुमडीत भाजपशी संधान बांधून आपला सुभा कसा सुरक्षित राहील या जोडणीत अनेक नेते असताना कोल्हापूरच्या लाल मातीतील मल्लाप्रमाणे सतेज पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. .त्यामुळे महायुतीने खेळलेल्या रडीच्या खेळीतून सतेज पाटील यांना राज्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि आता गोकुळची निवडणूक ताकदीने कोणताही किंतु परंतु न ठेवता नेटाने लढली. महापालिका आणि जिल्हा परिषदेत थोडक्यात बहुमत गमावलेले..गोकुळमध्येही काठावर बहुमत आले. त्यामुळे आताही येथे सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सत्तेचा वापर केला जात आहे. पाटील यांचे विधान परिषद सदस्यत्व पुढील महिन्यात संपत आहे. त्यामुळे त्यांना सर्व सत्तास्थानावरून, जिल्ह्याच्या नेतृत्वातून आणि पर्यायाने राज्याच्या नेत्यांच्या रांगेतून बाजूला काढण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत..राज्याच्या राजकारणात गोकुळ या जिल्हा दूध संघाने जोरदार धमाका केला आहे. भाजप आणि सत्तेसाठी कायम चटावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोडीला शिंदे गट आहे. गोकुळवर सत्ता येत नाही म्हटल्यावर मंत्री चंद्रकात पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर यांच्या जोडीला अपक्ष आमदार शिवाजी पाटील आणि महायुतीची फौज आहे. सभासदांनी नाकारल्यानंतर विरोधात बसायचे आणि तेही गोकुळसारख्या मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या संस्थेत हे कुणालाच मान्य नाही. हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्या सोबतीने मागील निवडणुकीत गोकुळमध्ये प्रवेश केला..Gokul Dairy Union: गोकुळवर पाच शासकीय सदस्यांची नियुक्ती होणार; अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी!.आता सत्तेचे लोणी खाता खाता त्यांना या सहकाऱ्याचा सोईस्कर विसर झाला आहे. हसन मुश्रीफ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची भारतीय जनता पार्टीच्या तळातल्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरच्या साठमारीतील हत्तीसारखी अवस्था केली. एका बाजूला सत्ता आणि दुसरीकडे सहकारी पक्षातील कालच्या पोरांच्या टोचण्या यापैकी काय निवडायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यापैकी त्यांनी टोचण्या खात सत्ता राखावी असा खुश्कीचा मार्ग स्वीकारला..गोकुळमध्ये काहीही करून सत्ता स्थापन करायची यासाठी पाच शासकीय सदस्य नेमून त्यापैकी चार सदस्यांना मतांचा अधिकार द्यायचा हा सहकाराच्या गळ्याला नख लावण्याचा प्रकार सध्या राज्यात टीकेचा आणि चर्चेचा विषय आहे. गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या सभेला २५ पैकी किमान १४ संचालक हवेत असा उपविधी आहे. खरे तर सहकारी संस्थांना आदर्श उपविधी हवा. पण ‘तळे राखील तो पाणी चाखील’ या न्यायाने सहकार कायद्यात अनेक बदल करून सोईचे मार्ग काढले आहेत..मात्र गळ्याला नख लावण्याइतका प्रकार झाला नाही. शासकीय संचालक हे म्हणजे जनतेच्या जिवावर पक्षातील कार्यकर्ते पोसण्याची सोय आहे. हे स्वीकृत, तज्ज्ञ, शासकीय संचालक संचालक असे काय दिवे लावतात, की ज्यांची नियुक्ती करावी असा प्रश्न आता उभा राहिला आहे. खरे तर या नियुक्त्या पूर्णपणे पुनर्वसनासाठी आहेत. गोकुळमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढून कुणाला शासन नियुक्त संचालक करायचे याचे पत्रच निवडणुकीआधी व्हायरल झाले होते..दुसरी गोष्ट म्हणजे गोकुळच्या अध्यक्ष निवडीत शासकीय दोन शासकीय सदस्यांऐवजी चार तज्ज्ञ संचालक नियुक्त करून त्यांना मताचा अधिकार देणे हे निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुंग लावणारे आहे. या संचालकांमध्ये भाजपला दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी एक असे चार संचालक नियुक्त करण्याचा डाव आहे. निवडणुकीत महायुतीला ११ जागा मिळाल्या असत्या, तर सहा संचालक नेमण्यास सरकारने मागे पुढे पाहिले नसते. एकूणचे सहकार कायद्याचे पायपुसणे करण्याची मोहीम सरकारी आशीर्वादाने काढली आहे..Gokul Milk Union: ‘गोकुळा’तील ‘आनंदी आनंद’.या निमित्ताने भाजपससह सर्वच सहकारी पक्षांची राज्यस्तरीय छी थू होत आहे. पण प्रत्येक गोष्टीवर सरकारकडे उतारा आहे. हसन मुश्रीफ यांनी आपल्या संचालकांना बैठकीला जाऊ दिले नाही. वर ते सांगतात, की गणपूर्ती झाली नाही, त्यामुळे अध्यक्ष निवड होत नाही. अभूतपूर्व परिस्थितीमुळे चार संचालकांना मतांचा अधिकार द्यावा लागला. हा पेच आम्ही सोडविला. खरे तर कोल्हापूरच्या मातीत राज्यकर्त्यांना नेहमी सावध भूमिका घ्यावी लागते..नाहीतर भल्याभल्यांना पंचगंगेचे पाणी पाजले जाते. तेथून सुरू झालेला ट्रेंड राज्यभर पोहोचतो. मुश्रीफ ही गोष्ट चांगली जाणून आहेत. पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा बदललेला पोत त्यांना चांगला माहीत आहे. त्यामुळे आजचे आज पाहू. निवडणुकीला तीन वर्षे आहेत. जेव्हाचे गहू तेव्हाच्या पोळ्या. तीन वर्षांत लोकांसमोर नवे काहीतरी वाढून ठेवू, म्हणजे मागचे विसरून जातील असे त्यांना आणि भाजपला वाटत आहे..अनेक जुन्या जाणत्या नेत्यांनी व्यक्तिगत भावभावना आणि टीकाटिप्पणीपलीकडे महाराष्ट्राचे व्यापक हित पाहिले आहे. मात्र सध्या नेत्यांच्या भावना इतक्या पातळ झाल्या आहेत, की त्यांना टिकाही सहन होईना झाली आहे. हजारो कोटींच्या संस्था बगलेत मारायच्या तर थोडी टिका सहन करावी लागेल. हे या नेत्यांना कळत नाही असे नाही. पण छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करायच्या आणि त्याच्या आडून चुकीचा निर्णय कसा बरोबर आहे हे सांगायची चढाओढ आहे..सध्या गोकुळच्या निमित्ताने सहकार कायद्यातील प्रस्तावित सुधारणेसाठी महायुतीचे नेते चंद्र, सूर्य दाखवत आहेत तो त्याचाच भाग आहे. आजचा कार्यभाग उरकण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिवावर जो सहकार उभा राहिला आहे, त्या सहकाराच्या गळ्याला नख लावले आहेच पण थोड्याच दिवसांत गळाही घोटला जाईल यात शंका नाही..राष्ट्रवादीचे लोटांगणराष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी संधान बांधले तरी दिवंगत अजित पवार यांनी पक्षाची ओळख स्वतंत्र ठेवली होती. मात्र गोकुळच्या निमित्ताने ज्या घडामोडी घडल्या त्या पाहता खरेच ही ओळख स्वतंत्र आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपच्या हिंदुत्वापेक्षा आमचे हिंदुत्व किती कडवे आहे हे शिंदे गट दाखवतो आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस नावापुरते का असेना शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेत होते..केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनी घेतलेली भेट, गोकुळसाठी अधिनियम दुरुस्तीचा निर्णय आणि त्यानंतर लगेचच मनी लाँड्रिंगच्या आरोपांतून मुश्रीफ यांची मुक्तता यांचा परस्पराशी संबंध आहे. मुश्रीफ आरोपपत्रातून मुक्त होण्याआधी गोकुळच्या प्रश्नावर जोरात बोलत होते. पण त्यांना आता भाजपकडून प्रशिक्षण घेऊनच प्रतिवाद करावा लागणार आहे, तसा प्रयत्न केला तर तो त्यांना सोसणाराही नसेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.