Gokul Milk Union: गोकुळ दूध संघाच्या कारभारात शासननियुक्त सदस्यांची नियुक्ती करून सहकार क्षेत्रावर कब्जा मिळवण्याचा सरकारचा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. गोकुळला अमूलच्या दावणीला बांधण्याची ही सुरुवात असून कोल्हापूरच्या स्वायत्ततेवर घाला घालणाऱ्यांना गप्प बसू देणार नाही, असा आक्रमक इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिला. गोकुळच्या निमित्ताने सरकारने सहकाराच्या मुळावरच घाव घातला असून हा केवळ दूध संघाचा संघर्ष नसून लोकशाही, सामान्य दूध उत्पादकांच्या अधिकारांची लढाई आहे, अशी तोफ त्यांनी डागली..कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) चार स्वीकृत संचालकांना अध्यक्ष निवडीत मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाविरोधात सोमवारी (ता. ९) पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीच्या वतीने येथे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दसरा चौकातून निघालेला दूध उत्पादकांचा संघर्ष मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला..Gokul Dairy Politics: सहकाराच्या गळ्याला नख.या मोर्चात हजारो दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. काळे झेंडे, कोल्हापुरी पायताण आणि ‘गोकुळ वाचवा, लोकशाही टिकवा’च्या घोषणांनी शहर दणाणून गेले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, विश्वजित कदम आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी या संघर्षात सहभागी झाले..सतेज पाटील यांनी थेट राज्य सरकार, मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘‘गोकुळवर प्रशासक येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केले. हसन मुश्रीफ मला सोडून गेले, तरी मी लढाई सोडली नाही. आज गोकुळमध्ये शासननियुक्त सदस्य घुसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्या षडयंत्राचा भाग आहे. सहकार संपवून त्यावर आपले नियंत्रण आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र कोल्हापूरची जनता हा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही.’’.गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागा समविचारी आघाडीने जिंकल्या, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या. स्पष्ट बहुमत असतानाही अध्यक्ष निवडीच्या सभेतील कोरमच्या पेचामुळे सत्तास्थापनेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक असताना राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर शासननियुक्त सदस्य नेमण्याचा निर्णय घेतला. त्यातील चार सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्याने गोकुळच्या सत्तासमीकरणात जाणीवपूर्वक हस्तक्षेप झाला..Gokul Dairy Politics: ‘गोकुळ’ ‘अमूल’च्या घशात घालण्याचा डाव : आमदार सतेज पाटील .‘कोल्हापूर जिल्ह्यात दररोज १० ते १२ लाख लिटर दूध संकलन होते. एवढ्या मोठ्या जिल्ह्यात एकही पात्र दूध उत्पादक किंवा तज्ज्ञ मिळाला नाही का? सांगलीतील व्यक्तीला गोकुळमध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून आणण्याची गरज काय? स्थानिक दूध उत्पादकांना आणि कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या व्यक्तींना संधी देण्यामागचा हेतू काय? गोकुळची स्वायत्तता संपवण्याचा हा डाव आहे,’’ असा सवाल त्यांनी केला. या वेळी शेट्टी, विशाल पाटील, जयंत पाटील, विश्वजित कदम आदींची भाषणे झाली..अमूल-मदर डेअरीच्या वर्चस्वाचा धोकादेशातील दूध संघांना एकत्र आणण्याच्या नावाखाली सरदार पटेल मिल्क फेडरेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या हालचालींचाही त्यांनी उल्लेख केला. भविष्यात अमूल आणि मदर डेअरी या दोनच मोठ्या ब्रँडचे वर्चस्व निर्माण करून स्थानिक दूध संघांचे स्वतंत्र अस्तित्व संपवण्याचा धोका असल्याचे ते म्हणाले. गोकुळ हा केवळ दूध व्यवसाय करणारा संघ नसून कोल्हापूरच्या सहकार चळवळीचा कणा आहे. लाखो दूध उत्पादकांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या या संस्थेवर बाहेरच्यांचे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला..२०२९ मध्ये महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होणारकोल्हापूर हा संघर्ष आणि सहकाराचा जिल्हा आहे. रत्नाप्पाण्णा कुंभार, तात्यासाहेब कोरे, सदाशिवराव मंडलिक यांच्यासारख्या दिग्गजांनी सहकाराची भक्कम पायाभरणी केली. त्याच सहकाराला आज मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोकुळच्या लढ्याने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सामान्य माणसाला अन्यायाविरोधात उभे राहण्याची प्रेरणा मिळाली आहे. लढलो तर जिंकू शकतो, हा विश्वास निर्माण झाला आहे. २०२९ मध्ये महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होणार असून त्याची बीजे कोल्हापूरच्या मातीत रोवली गेली आहेत, निर्धारही पाटील यांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.