
Jalgaon News : रशिया व युक्रेनमधील युद्ध, अस्थिर असलेला बांगलादेश व आखात आणि पाकिस्तानशी ताणलेले संबंध यामुळे देशातील कापूस किंवा रुई, सुताच्या बाजाराला फटका बसत आहे. युरोपात इंधन व अन्नासंबंधी महागाई वाढली आहे. अमेरिकेतील काही सरकारी बँका वित्तीय अडचणीत आहेत. यामुळे कापड बाजार संकटात आहे. कापूस किंवा कापूसगाठींचा उठाव रोडावला असून, देशातील कापूस निर्यातीलाही फटका बसला आहे.
भारतीय कापूस पीक नैसर्गिक समस्या व गुलाबी बोंड अळीच्या संकटामुळे शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचे ठरत आहे. वर्षागणिक या पिकातील तोटा वाढत आहे. यातच देशातील कापूस निर्यातही कमी होत असून, आक्रसलेला कापूस बाजार कापूस उत्पादकांसाठी नुकसानकारक ठरला आहे.
देशातून २०२१ मध्ये ४२ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्यात झाली. २०२२ मध्ये ही निर्यात सुमारे ३४ लाख गाठी एवढी झाली. २०२३ मध्ये २५ हजार गाठींची निर्यात झाली आहे. २०२४ मध्येही देशातील कापूस निर्यात ३२ लाख गाठींएवढीही नाही. यंदाही निर्यात २५ ते ३० लाख गाठी एवढीच राहू शकते. २०१० ते २०२० या दशकात देशातून कापसाची निर्यात सरासरी ४५ लाख गाठी एवढी राहिली आहे. परंतु मागील तीन वर्षे निर्यात सतत कमी झाली आहे.
कापडास उठाव राहिल्यास रुई व सुतास मागणी असते. कापडास कोविड काळात उठाव होता. यामुळे या कालावधीत कापूस किंवा रुई, सुताची मोठी मागणी होती. देशात या कालावधीत कापूस उत्पादन ३४० लाख गाठींपर्यंत असतानाही कापूस दर सरासरी आठ हजार रुपयांवर होते. परंतु २०२२, २०२३ व २०२४ या कालावधीत कापूस उत्पादनात घट आली. कापूस उत्पादन या तीन वर्षांत सरासरी ३३० लाख गाठी एवढेही आले नाही.
तरीदेखील कापूस दर सरासरी खेडा खरेदीत सात हजार रुपये प्रतिक्विंटल एवढेच राहिले. कापूस निर्यातीमधील घट व जागतिक अस्थिरता यामुळे ही स्थिती असल्याचा मुद्दा कापूस जगतात उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे कापड उद्योगात सूत किंवा रुईचा वापरही घटला आहे. सिंथेटिक कापडाची निर्मिती वाढली आहे. यामुळेही सुताची मागणी घटली आहे.
बांगलादेशकडून खरेदीबाबत साशंकता
देशातील कापसाला सर्वांत मोठा खरेदीदार बांगलादेश राहिला आहे. एकटा बांगलादेश भारताकडून दर वर्षी २५ ते ३० लाख गाठींची खरेदी करायचा. तेथील नारायणगंज भाग हा कापड उत्पादनासंबंधी जगभरात प्रसिद्ध आहे. बांगलादेशात चीनने देखील गुंतवणूक केली होती. तेथे दर वर्षी १२० ते १३० लाख गाठींचा वापर कापड निर्मितीसाठी केला जातो. तसेच सुताची देखील मोठी आयात बांगलादेश भारतातून करायचा.
गरीब किंवा वित्तीय अडचणीतील देश असल्याने बांगलादेशातील कापडाची निर्यात अनेक देशांत ड्यूटी फ्री किंवा कुठल्याही शुल्काशिवाय करता येते. परंतु चीन व अमेरिकेचे संबंध खराब झाले. अमेरिकेने चीनच्या कापडावर बंदी घातली. बांगलादेशचा वस्त्रोद्योग काहीसा संथ झाला. त्यात आता बांगलादेश अस्थिर झाला आहे. अमेरिका व युरोपातील बाजारात बांगलादेशी कापडाची पाठवणूक सुरू होती.
कोविड काळातही बांगलादेशने वस्त्रोद्योगात चांगली कामगिरी केली. रशिया व युक्रेनचे युद्ध सुरू झाल्याने युरोपातील ग्राहकांची क्रयशक्ती खालावली. तेथे इंधन, वीज महागले. युरोपातील काही देशांत तेथील सरकारला अन्नासाठी योजना आणाव्या लागल्या आहेत. अमेरिकेतील काही बँकांनी दिवाळखोरी जाहीर केली आहे. आयटी क्षेत्रात मंदी आहे. बँकांचे वाढते व्याजदरही डोकेदुखी बनली आहे.
आखाती देश व इस्राईलमधील ताणलेल्या संबंधांची त्यात भर पडली आहे. परिणामी, बांगलादेशसह इतर देशांमधील वस्त्रोद्योग संकटात आहे. कापड गिरण्या, सूतगिरण्यांचे कामकाज कोलमडले आहे. कापूस प्रक्रिया उद्योग १०० टक्के क्षमतेने कार्यरत नाही. बांगलादेशसह पाकिस्तानशी भारताचे संबंध ताणलेले आहेत. नजीकच्या देशांत स्थिती बरी नसल्याने भारतीय कापूस बाजारावर परिणाम झाल्याची स्थिती आहे, असे जाणकारांचे मत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.