Nutrition Benefits In Agriculture : अन्नद्रव्यांची कार्ये, कमतरतेची लक्षणे

Sustainable Production : प्रत्येक अन्नद्रव्याचे कार्य हे वेगवेगळे असते. पिकांच्या शाश्‍वत उत्पादनासाठी अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

डॉ. एस. एन. पोतकिले, डॉ. एकता बागडे, डॉ. मेघा डाहाळे

Indian Agriculture : अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकाची उत्पादकता कमी झालेली किंवा स्थिरावलेली दिसून येते. तसेच अन्नद्रव्यांचा पुरवठा व पिकाद्वारे अन्नद्रव्यांचे होणारे शोषण या मधील तफावत वाढत चाललेली दिसून येते. मुख्य व दुय्यम अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे दिवसेंदिवस जमिनीत व पिकांवर कमतरतेची लक्षणे आढळून येतात.

पिकांच्या शाश्‍वत उत्पादनासाठी अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पिकास आवश्यक असलेली मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अशा सर्वच अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा होतो. तसेच जमिनीची सुपीकता वाढविण्यास व टिकून ठेवण्यास मदत होते.

एखाद्या अन्नद्रव्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त किंवा कमी झाले, तर पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम दिसून येतो. फक्त रासायनिक खतांचा जास्त वापर केल्याने जमिनीची सुपीकता खालावत चाललेली आहे, असे दिसून येते, की गंधक, जस्त, लोह व बोरॉन इत्यादी अन्नद्रव्यांची कमतरता वाढत चाललेली आहे.

पिकांना जास्त प्रमाणात नत्र, स्फुरद, आणि पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये खतामधून दिली जातात. परंतु दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जात नाही.

खतांचा कार्यक्षम वापर व संतुलित मात्रेचा विचार करताना, मुळांची रचना व गुणधर्म, वाढीच्या कोणत्या अवस्थेत कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणात शोषून घेतली जातात आणि जमिनीत अन्नद्रव्यांची हालचाल कशी होते त्यानुसार खतांचे नियोजन करावे.

रासायनिक खतांच्या मात्रा देताना, पीक वाण, कालावधी, जमिनीतील ओलावा, तापमान, एकरी रोपांची संख्या, अपेक्षित उत्पादन, कीड-रोग आणि अन्नद्रव्यांची पातळी या बाबींचा विचार करावा. त्यामुळे खतांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अपेक्षित उत्पादन मिळण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे नत्र, स्फुरद आणि पालाश या खतांच्या वापराचे प्रमाण हे ४:२:१ असावे.

Agriculture
Sustainable Agriculture : शाश्‍वत शेतीसाठी ‘संजीवक’चा स्वीकार करा

अन्नद्रव्यांची कार्ये, कमतरतेची लक्षणे

१) नत्र

कार्य

- पानातील हरितद्रव्ये व प्रथिने वाढतात.

- शाखीय वाढ चांगली होते.

- पानांची व खोडाची वाढ झपाट्याने होते.

लक्षणे

- खालची पाने पिवळी होतात.

- मुळांची वाढ थांबते. परिणामी पिकांची वाढ खुंटते. त्याचा फुलांची संख्या आणि उत्पादनावर परिणाम होतो.

२) स्फुरद

कार्य

- पिकांच्या मुळांची वाढ होऊन ती निरोगी व सशक्त राहतात.

- पीक जमिनीवर लोळत नाही. पेशींचे विघटन व वाढ करते.

- बियाण्याची उगवण, फळधारणा आणि फळाच्या पक्वतेसाठी आवश्यक आहे.

लक्षणे

- पाने गडद हिरवट व लांबट होऊन वाढ खुंटते.

- खालील पानांची मागील बाजू जांभळी होते. झाडाचे खोड बारीक होते.

३) पालाश

कार्य

- झाडाची साल जाड व मजबूत होते. उत्पादनाची प्रत वाढते.

- पिष्टमय आणि शर्करायुक्त पदार्थ तयार करण्यास मदत करते.

- पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. रोगप्रतिकार शक्ती वाढते.

- फळांना चांगला रंग येऊन टिकवण क्षमता वाढते.

लक्षणे

- पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात.

- पानाच्या कडा तांबटसर होतात.

- झाडाचे खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.

४) गंधक

कार्य

- पिकांची कायिक वाढ जोमाने होते.

- हरितद्रव्ये निर्मितीमध्ये मदत करते.

लक्षणे

पिकांच्या कोवळ्या पानांतील हिरवा रंग कमी होतो. नंतर पाने पूर्ण पिवळी पडतात.

५) लोह

कार्य

- पानांतील हरितद्रव्ये तयार करण्यास मदत करते.

- वनस्पतीच्या मुळावरील गाठीमधील लेग हिमोग्लोबीन तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य करते.

लक्षणे

- झाडांची वाढ खुंटते.

- शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो.

६) जस्त

कार्य

- पाण्याचे शोषण व योग्य स्थलांतर करण्यास मदत करते.

- वाढीसाठी आवश्यक प्रेरक पदार्थ तयार करण्यास तसेच हरितद्रव्ये तयार करण्यास अप्रत्यक्षपणे मदत करते.

लक्षणे

- झाडांची पाने वाळलेली दिसतात.

- पाने लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो.

७) बोरॉन

कार्य

- मुळांची वाढ व पेशी तयार करण्यास मदत करते.

- वाढीसाठी आवश्यक प्रेरक पदार्थ व पाणी यांचे अंतर्गत स्थलांतर यात नियमितपणा येतो. मुळांची वाढ पण चांगली होते.

लक्षणे

- पानांवर सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात.

- झाडाचा शेंडा व कोवळी पाने पांढरट होऊन मरतात.

Agriculture
Sustainable Agriculture : भारतीय शेतीच्या शाश्वततेसाठी एकात्मिक शेती पद्धती फायदेशीर

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर व व्यवस्थापन

- सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरामुळे मुख्य अन्नद्रव्यांचे पिकांद्वारे शोषण वाढून मुख्य अन्नद्रव्येयुक्त (नत्र, स्फुरद, पालाश) खतांची कार्यक्षमता वाढते. एखाद्या अन्नद्रव्यांचे प्रमाण विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त किंवा कमी झाले, तर पिकाच्या वाढीवर त्याचे परिणाम त्वरित दिसून येतात. रासायनिक खतांचा जास्त वापर केल्याने गंधक व जस्ताची जमिनीत कमतरता भासून त्याचा उत्पादनावर परिणाम होतो.

- सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना कमी प्रमाणात लागतात. त्याची मात्रा शिफारशीपेक्षा अधिक झाली, तर पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये, त्यांची मात्रा, प्रकार, पिकांची गरज व जमिनीची सुपीकता इत्यादी बाबी लक्षात घेऊन योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे.

फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्यास कमी मात्रा लागते. परंतु जमिनीतून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करायचा असल्यास जास्त मात्रा लागते.

- सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर हा प्रमाणशीर होणे गरजेचे असते. कमी जास्त प्रमाणात वापर हा पिकासाठी घातक ठरतो. कारण या अन्नद्रव्यांची घातक होण्याची पातळी आणि कमतरतेची पातळी यामध्ये कमी अंतर असते. गरज नसताना त्यांच्या वापरामुळे ती पिकास व जमिनीस घातक ठरू शकतात आणि खर्चही वाढतो.

- तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये दरवर्षी वापरण्याची गरज नसते. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर हा चिलेटेड स्वरुपात केल्यास चांगला प्रतिसाद मिळतो.

उपाययोजना

नत्र, स्फुरद आणि पोटॅशयुक्त खते योग्य प्रमाणात जमिनीतून द्यावीत. दोन टक्के युरिया, डायअमोनियम फॉस्फेट व सल्फेट ऑफ पोटॅशची फवारणी पिकांवर १ ते दीड महिन्यांत करावी. हेक्टरी २५ ते ३० किलो गंधक, २५ किलो हिराकस, २० ते २५ किलो झिंक सल्फेट आणि २ ते ३ किलो बोरॉन जमिनीतून द्यावे.

पीक वाढीच्या अवस्थेत ०.५ टक्का हिराकस, झिंक सल्फेट आणि ०.२ टक्का बोरॅक्सची फवारणी करावी.

संपर्क - डॉ. एस. एन. पोतकिले, ९४२२२८४८३४, (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com