शेतकरी : लवू रामकृष्ण पवारगाव : खांबाळे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग,काजू लागवड : ३० गुंठेएकूण काजू कलमे : ६०सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खांबाळे (ता. वैभववाडी) येथे लवु पवार यांची चार एकर शेतजमीन आहे. त्यापैकी काही क्षेत्रात नारळ, सुपारी झाडांची लागवड केली आहे. याशिवाय खरिपात भात लागवड केली जाते. त्यांच्याकडील ३० गुंठे क्षेत्र पडीक होते. जमीन बराच काळ पडीक राहिल्यामुळे या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडी झुडपांची बऱ्यापैकी वाढ झाली होती. त्यामध्ये त्यांनी काजू लागवड करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी वेंगुर्ला ७ या काजू जातीच्या ६० कलमांची ३० गुंठ्यांमध्ये लागवड केली. सध्या बागेतील कलमांची वाढ चांगली झाली असून बागेत तण नियंत्रणाचे काम सुरू आहे..लागवड काजू कलम लागवडीसाठी निवडलेली जमीन ही पडीक असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली होती. कलम लागवडीपूर्वी ही जागा स्वच्छ करून लागवडीसाठी तयार करणे अत्यंत गरजेचे होते. त्यासाठी मार्च २०२४ पासून पूर्वतयारी करण्यात आली.झाडाझुडपांची वाढ जास्त असल्यामुळे जेसीबी लावून ती काढण्यात आली. तयार केलेल्या क्षेत्रास तारेचे कुंपण करण्यात आले..Cashew Farming: नवीन काजू बागेत अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर.लागवडीसाठी जेसीबीच्या साह्याने दोन बाय दोन फूट आकाराचे खड्डे खोदण्यात आले. दोन खड्ड्यांमध्ये आणि दोन ओळींमध्ये साधारण २१ फूट इतके अंतर राखण्यात आले.खड्डे काढून तयार झाल्यानंतर जमीन तयार करण्याच्या वेळी गोळा केलेला पालापाचोळा प्रत्येक खड्ड्यांत टाकून घेतला. याशिवाय खतांच्या मात्रा देखील देण्यात आल्या. घरी कुक्कुटपालन आणि शेळीपालन करीत असल्यामुळे लेंडीखत आणि कोंबडीखत मुबलक उपलब्ध होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंगल सुपर फॉस्फेट खतासोबत शेणखत, लेंडीखत, कोंबडीची विष्टा असे मिश्रण करून त्यात निंबोळी पेंड मिश्रण करून खड्ड्यावरील मातीवर पसरवून घेतले. त्यानंतर खड्डे मातीने भरून घेतले..लागवडीची संपूर्ण तयारी झाल्यानंतर मे महिन्यामध्ये शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतून काजूच्या वेंगुर्ला सात या जातीची कलमे आणली. लागवड जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर करण्याचे नियोजित होते. त्यानुसार आणलेल्या रोपांना सावलीमध्ये ठेवून नियमित पाणी दिले. सुरुवातीच्या टप्प्यात रोपे आणल्यामुळे चांगली दर्जेदार रोपे मिळाली.जूनमध्ये पाऊस सुरु झाल्यानंतर कलमांची लागवड करण्यात आली. लागवडीनंतर प्रत्येक कलमाला बांबूची काठी बांधून आधार देण्यात आला. जेणेकरून कलमांना वाढीच्या काळात आधार मिळेल..Cashew Farming: नवीन काजू लागवडीला प्रारंभ.लागवडीसाठी निवडलेल्या ठिकाणी सिंचनासाठी पाण्याची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे पाइपलाइनद्वारे पाणी आणून लागवडीच्या ठिकाणी टाकी उभारत त्याजागी साठा केला जातो.जानेवारी ते मे अखेरपर्यंत आठवड्यातून एकदा कलमांना सिंचन करण्यात आले. कलमांच्या बुंध्यांत गवताचे आच्छादन केले. त्यामुळे आठवडाभर ओलावा टिकून राहिला. त्यामुळे कलमांची वाढ चांगली होण्यास मदत झाली.या वर्षी जूनमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश आणि युरिया खतासोबत लेंडीखत आणि कोंबडीखत देण्यात आले..आगामी नियोजनयंदा सतत पाऊस असल्याने तण नियंत्रण करताना अडचणी आल्या. त्यामुळे सध्या ग्रासकटरच्या साहाय्याने तण कापण्याचे काम सुरू आहे. कापलेले तण कलमांच्या बुंध्यात आच्छादन म्हणून वापरले जात आहे. त्याचा कलमास चांगला फायदा होतो.सध्या कलमाच्या सानिध्यात असलेल्या मोठ्या गवताची काढणी चालू आहे. पुढील चार पाच दिवसांत संपूर्ण बागेत तण काढण्याचे काम पूर्ण होईल..सध्या कलमांना पालवी फुटण्यास सुरुवात झाली आहे. नवीन येणाऱ्या पालवीवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी शिफारशीत कीटकनाशकांची रासायनिक फवारणी घेतली जात आहे. मागील महिन्यात कीटकनाशकांची एक फवारणी घेतली आहे. पुढील १० दिवसांनी आणखी एक फवारणी घेतली जाईल.पुढील तीन वर्षे काजू उत्पादन घेण्याचे नियोजनात नाही. त्यामुळे कलमांना येत असलेला मोहोर काढला जाईल.- लवु पवार ९६०४९३६९६३(शब्दांकन : एकनाथ पवार).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.