Mango Processing : आंबा फ्रूटी, पन्हे, स्क्वॅश निर्मितीचे तंत्र
यशवंत जगदाळे, समाधान खुपसे
आंब्यामध्ये जीवनसत्त्व बी-६, जीवनसत्त्व अ आणि जीवनसत्त्व क खूप अधिक प्रमाणात असते.पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि तांबे भरपूर प्रमाणात असते. कोलेस्टरॉल कमी होण्यास मदत होते.आंब्यातील तंतूमय घटक पाचनक्रिया सुधारतात. फळामध्ये ॲन्टीऑक्सिडंट्सअसतात.
फ्रूटी
साहित्य : पिकलेले आंबे २ नग, कच्ची कैरी १ नग, साखर ३ चमचे, पाणी १ कप, लिंबू रस २ चमचे.
कृती: कच्चा आणि पिकलेल्या आंब्याच्या साली काढून फोडी करून घ्याव्या त्यानंतर त्या मिक्सर मधून बारीक करून त्याचा गर बनवून घ्यावा. त्यामध्ये १ कप पाणी आणि साखर घालून हा गर शिजवून घ्यावा. गर थंड झाला की त्यात २ कप पाणी घालून गळून घ्यावे. मॅंगो फ्रूटी थंड झाल्यावर प्यावी.
पन्हे
साहित्य : कैरीचा गर २०० ग्रॅम, १५० ग्रॅम साखर, २००मिलि पाणी, अर्धा चमचा काळीमिरी पावडर,पुदिना, बर्फ.
कृती: पूर्ण वाढ झालेली कच्ची कैरी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. कैरी पाण्यामध्ये शिजवून घ्यावी. त्यानंतर थंड झाल्यावर त्याचा गर काढून घ्यावा. कैरीचा २०० ग्रॅम गर घेतल्यास त्यात १५० ग्रॅम साखर, ७०० मिलि पाणी मिसळावे. हे मिश्रण चाळणीने गाळून घ्यावे. त्यात १ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळावे. तयार पन्हे निर्जंतुक बाटलीत भरावे. बाटल्या हवाबंद करून गरम पाण्यात (८५ ते १०० अंश सेल्सिअस तापमानाला) ठेवून नंतर थंड करून घ्याव्यात.
छुंदा
साहित्य: किसलेली कैरी एक वाटी,लाल मिरची पावडर,मीठ,जिरा पावडर, गूळ एक वाटी.
कृती: गॅस वर एका भांड्यामध्ये किसलेल्या कैऱ्या घ्याव्यात. त्यामध्ये किसलेल्या कैरी येवढाच गूळ मिसळावा. हे सर्व उकळी येईपर्यंत हलवायचे आहे. नंतर त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर,एक चमचा जिरा पावडर,चवीनुसार मीठ मिसळावे. हे मिश्रण परत उकळून घ्यावे. मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर निर्जंतुक बाटल्यामध्ये सीलबंद करावा.
स्क्वॅश
साहित्य :आंब्याचा रस १ लिटर, पाणी १ लिटर, साखर१.८ किलो, पोटॅशिअम मेटाबायसल्फेट०.६ ग्रॅम, ५ ग्रॅम सायट्रिक आम्ल.
कृती :एक लिटर गाळून घेतलेल्या आंब्याच्या रसामध्ये १ लिटर पाणी, १.८ किलो साखर, ०.६ ग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फेट आणि ५ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळावे. मिश्रण विरघळून घ्यावे. तयार स्क्वॅश निर्जंतुक बाटल्या मध्ये सीलबंद करावा.
आमरस
आमरस तयार करण्यापूर्वी प्रथम रिकाम्या काचेच्या बाटल्या तसेच क्राऊन कॅप (बिल्ले) प्रथम निर्जंतुकीकरण करावे. पूर्ण पिकलेली फळे निवडावी. स्वच्छ धुवून फळांची साल काढून पल्प काढून घ्यावा. रसामधील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण हॅण्ड रिफ्रॅक्टोमीटरच्या साहाय्याने तपासावे आणि साखर मिसळून २५ अंश ब्रिक्स करावे (अंदाजे ७० ग्रॅम साखर प्रति किलो रस). त्यानंतर रसाची आम्लता तपासून ती सायट्रिक आम्ल मिसळून ०.५ टक्के करावी (अंदाजे २.३ ग्रॅम सायट्रिक आम्ल प्रती किलो साखर घातलेला रस).
रस १० मिनिटे उकळवावा उकळत असताना त्यातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण आणि आम्लता पुन्हा तपासावी. आवश्यकता भासल्यास साखर व सायट्रिक आम्ल मिसळून आवश्यक प्रमाण राखावे. रस उकळत असताना शेवटची पाच मिनिटे शिल्लक राहिल्यावर रसामध्ये पोटॅशिअम मेटाबाय सल्फाइड मिसळावे (७०० मिलीग्रॅम प्रती किलो रस). पोटॅशिअम मेटाबाय सल्फाइड टाकण्यापूर्वी गरम पाण्यात विरघळून नंतर संपूर्ण रसात टाकून ढवळावे. दहा मिनिटे उकळल्यावर त्वरित गरम रस बाटलीमध्ये भरावा.
बाटली भरतेवेळी रसाचे तापमान तपासावे. रसाचे तापमान ८० अंश सेल्सिअसच्यावर ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा बाटल्या खराब होण्याची शक्यता असते. बाटलीमध्ये भरल्यानंतर ताबडतोब क्राऊन कॅप यंत्राच्या साहाय्याने क्राऊन कॅप (बिल्ला) लावावा.
ताबडतोब भरलेल्या बाटल्यांचे पाश्चरीकरण करावे. त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी घेऊन ८० अंश सेल्सिअस पर्यंत गरम करावे. पातेल्यामध्ये तळाला स्वच्छ कापड टाकून बाटल्या हळूहळू सोडाव्यात. बाटल्या ३० मिनिटे तशाच पातेल्यामध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पातेल्यामधून काढून थंड कोरड्या जागी साठवणूक करावी.
आंबा पोळी
आंबा रस स्टीलच्या पातेल्यात घेऊन वजन करावे. पोळी टिकावी म्हणून रस तयार केल्यावर त्यात प्रति किलो रस १ ग्रॅम पोटॅशियम मेटाबाय सल्फाइड हे परिरक्षक मिसळावे. रसामधील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण हॅण्ड रिफ्रॅक्टोमीटरच्या साहाय्याने पहावे. रसामध्ये साखर मिसळून रसामधील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ३५ अंश ब्रिक्स करावे (अंदाजे १७० ग्रॅम साखर प्रती किलो रस).
साखर विरघळून झाल्यावर रसामध्ये सायट्रिक आम्ल मिसळून रसाची आम्लता ०.५ टक्के करावी (अंदाजे २.३ ग्रॅम सायट्रिक आम्ल प्रती किलो मिश्रण). अॅल्युमिनियम ट्रे ला तुपाचा पातळ थर देवून पोळीसाठी तयार केलेला रस ट्रे मध्ये ओतावा. पोळी वाळवणी यंत्रामध्ये ५५ अंश सेल्सिअस तापमानाला वाळवावी. वाळलेली पोळी प्लॅस्टिक पिशवीमध्ये हवाबंद करावी. प्रक्रियेपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- यशवंत जगदाळे, ९६२३३८४२८७ (विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.