
पूजा कुलथे, अमिता जैन
महाराष्ट्रातील मच्छीमार सहकारी संस्था मच्छीमार समुदायाला संसाधने, तांत्रिक मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. राज्यातील मत्स्य सहकार चळवळ १९१३ मध्ये सुरू झाली. भारतातील पहिली मच्छीमार सहकारी संस्था ‘कारला मच्छीमार सहकारी संस्था’ स्थापन झाली.
महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये प्राथमिक मच्छीमार सहकारी संस्था कार्यरत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ‘जिल्हा मच्छीमार सहकारी संघ’ असतो, जो प्राथमिक संस्थांचे समन्वय साधतो. हे संघ मत्स्य व्यवसायास आवश्यक असलेल्या धोरणात्मक मार्गदर्शन, तांत्रिक साह्य, शीतगृह सुविधा आणि मासेमारी उपकरणांचे व्यवस्थापन यासारख्या सेवांची पूर्तता करतात.
महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी महासंघ
राज्य पातळीवर, महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी महासंघ (MSFCF) ही सर्वोच्च संस्था आहे. या महासंघाची स्थापना १९५० मध्ये झाली. महासंघाचे कार्यालय मुंबई येथे आहे. (संपर्क क्रमांक : ०२२-२२६१७१६४/६१)
महासंघाचे विभाग :
मुख्य कार्यालय : आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन आणि निर्णय अंमलबजावणी.
ताज्या मासळी विभाग : नोंदणीकृत नौकाधारक आणि सहकारी सभासदांकडून मासळी खरेदी व विक्री.
औद्योगिक माल विभाग : मच्छीमारांना जाळी आणि संबंधित साहित्य पुरवणे.
डिझेल विभाग : समुद्री क्षेत्रातील नौकांसाठी डिझेल पुरवठा, विशेषतः मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत.
महाराष्ट्रातील काही प्रमुख मच्छीमार सहकारी संस्था :
रायगड जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ लि. ः राष्ट्रीय मत्स्य सहकारी महासंघ सदस्य. (FISHCOPFED)
बसेन मच्छीमार सर्वोदय सोसायटी ः राष्ट्रीय मत्स्य सहकारी महासंघाची सदस्य संस्था.
या सहकारी संस्था आणि महासंघ राज्यातील मच्छीमारांच्या विकासासाठी आणि उपजीविकेसाठी महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. मत्स्य व्यवसायात सहकारी संस्था महत्त्वाच्या आहेत. मच्छीमारांना एकत्रित साह्य पुरवतात, उत्पादनक्षमता वाढवतात, न्याय व्यापार सुनिश्चिश्चित करतात आणि शाश्वत मासेमारी पद्धती प्रोत्साहित करतात.
या संस्था लहान मच्छीमारांना आर्थिक मदत, तांत्रिक प्रशिक्षण आणि संसाधने पुरवून सक्षम करतात. तसेच, सहकारी संस्था व्यक्तिगत मच्छीमार आणि मोठ्या बाजारपेठेमधील दुवा साधून त्यांचे जीवनमान सुधारतात, दीर्घकालीन स्थिरता प्रदान करतात.
आर्थिक सबलीकरण ः
मत्स्य सहकारी संस्थांचा मुख्य उद्देश म्हणजे मच्छीमारांचे आर्थिक स्थैर्य वाढवणे हा आहे. एकत्रित संसाधन व्यवस्थापनाद्वारे, या संस्था सदस्यांना कर्ज, अनुदान आणि विमा सेवा उपलब्ध करून देतात. त्यामुळे मच्छीमारांना मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होते.
मच्छीमारांना उत्पादनाचे अधिक योग्य मूल्य मिळते. सहकारी संस्था मासेमारीसाठी आवश्यक साधनसामग्री सामूहिकरीत्या खरेदी करून खर्च कमी करतात.
बाजारपेठेचा प्रवेश आणि योग्य दर ः
मत्स्य सहकारी संस्था मच्छीमार आणि बाजारपेठेतील खरेदीदारांमध्ये थेट संपर्क साधून मध्यस्थांची गरज कमी करतात आणि मासळीला योग्य दर मिळवून देतात.
घाऊक खरेदीदार, निर्यातदार आणि स्थानिक बाजारपेठांशी उत्तम व्यवहार करून मच्छीमारांच्या उत्पन्नात वाढ करतात.
काही सहकारी संस्था शीतगृह आणि प्रक्रिया केंद्रांची उभारणी करतात. ज्यामुळे मासळी दीर्घकाळ टिकवता येते, नफ्यात वाढ होते.
तांत्रिक साह्य आणि क्षमता विकास ः
मत्स्य सहकारी संस्था आधुनिक मासेमारी तंत्रज्ञान, प्रवास प्रणाली आणि सुरक्षेचे नियम यासंबंधी प्रशिक्षण देतात. मच्छीमारांना आधुनिक मासेमारी उपकरणे वापरण्याच्या आणि मासेमारी कार्यक्षमतेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने साह्य करतात. मत्स्यपालन आणि मत्स्यवाढीच्या अत्याधुनिक तंत्रांचा अवलंब करून उत्पादनवाढीस हातभार लावतात.
सामाजिक आणि सामुदायिक विकास ः
मत्स्य सहकारी संस्था केवळ आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवत नाहीत, तर त्या मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करतात.
आरोग्यसेवा, शिक्षण आणि गृहनिर्माण योजनेत सहभाग घेतात.
अनेक सहकारी संस्था शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करून तरुणांना मासेमारीव्यतिरिक्त इतर नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतात.
सरकारी सहयोग आणि धोरण नियोजन ः
मत्स्य सहकारी संस्था शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभागी होऊन मच्छीमारांसाठी अनुकूल धोरणे राबवण्यासाठी मदत करतात.
मासेमारी हक्क, सागरी संरक्षण आणि अनुदान योजनांसाठी सरकारकडे मागण्या मांडतात. सहकारी संस्था विविध सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावतात, जेणेकरून त्याचा लाभ प्रत्यक्ष मच्छीमारांपर्यंत पोहोचू शकेल.
शाश्वत मासेमारी
मत्स्य सहकारी संस्था शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्या मर्यादित मासेमारी, प्रजनन कार्यक्रम आणि जलीय परिसंस्थेचे संरक्षण यासारख्या जबाबदार मासेमारी पद्धती प्रोत्साहित करतात.
मच्छीमारांना अति-शिकार टाळण्यासाठी आणि पर्यावरणपूरक मासेमारी पद्धती अवलंबण्यासाठी प्रशिक्षण देतात. काही सहकारी संस्था पर्यावरण संघटना आणि सरकारी यंत्रणांसोबत सहयोग करून सागरी संरक्षण प्रकल्प राबवतात.
पूजा कुलथे ७०२०५२६२९०
(पूजा कुलथे या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पीएचडी स्कॉलर आहेत. अमिता जैन या मोर्शी (जि. अमरावती) येथे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.