
डॉ. अमृतलाल खैरे
आजवर कृषी संशोधन आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये पिकांच्या उत्पादकतेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात होते. त्यातून गेल्या पन्नास वर्षांमध्ये केवळ कॅलरीयुक्त उत्पादन वाढ साध्य झाली. मात्र केवळ आवश्यक तितक्या कॅलरी ऊर्जेची गरज पूर्ण होऊन निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगता येणार नाही, याची जाणीव विविध वैद्यकीय संशोधनातून पुढे येत होती. कारण पौष्टिक आहार ही मानवाची एक मूलभूत गरज आहेच, पण एखाद्या समाजाच्या सुदृढ विकासाचे आणि सुबत्तेचे एकक देखील आहे.
जागतिक पातळीवर आज दोन अब्जापेक्षा जास्त लोकसंख्येला पोषक आहाराच्या अभावातच जीवन कंठावे लागत आहे. याचाच अर्थ तीन व्यक्तींपैकी एक व्यक्ती ही पोषक अन्नद्रव्याच्या कमतरतेने पिडीत आहे. त्यामुळे भविष्यकालीन कृषी संशोधनामध्ये पिकांचे वाण विकसित करत असताना त्यात पोषक व सूक्ष्म मूलद्रव्य वाढविण्याच्या दिशेने काम सुरू झाले. त्यातून जैवसमृद्ध (बायोफोर्टिफाइड) वाणांच्या विकासावर भर देण्यात येऊ लागला.
भारतामध्ये जैवसमृद्धीकरणाची गरज
वर्ष २०२४ आकडेवारीनुसार, जागतिक भूक निर्देशांक मोजल्या गेलेल्या एकूण १२५ देशांपैकी भारताचा क्रमांक १०५ आहे. ही चिंता व्यक्त करणारी बाब आहे. भूक निर्देशांक मोजण्यासाठी कुपोषण, बाल वाढ खुंटणे, बाल क्षयरोग आणि बालमृत्यू दर हे चार मुख्य घटक विचारात घेतले जातात.
आंतरराष्ट्रीय अन्न संघटना व जागतिक पोषण अहवालानुसार, भारतातील एकूण कुपोषित लोकसंख्या १५.३० टक्के आहे. बालकांच्या पोषण स्थितीत बालवाढ खुंटणे (३५.५ टक्के), क्षयरोग (१९.३ टक्के), अति धोकादायक क्षयरोग (७.७ टक्के) आणि वाजवीपेक्षा कमी वजन संख्या (३२.१ टक्के) ही आकडेवारी चिंतेची बाब आहे.
देशातील अॅनिमियाचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात असून, लहान मुले (६-५९ महिने) यामध्ये ६७.१ टक्के, महिलांमध्ये ५७ टक्के, तर किशोरवयीन मुलींमध्ये ५९.११ टक्के व मुलांमध्ये ३१.१ टक्के आहे.
बाल मृत्युदराची स्थिती लक्षवेधी असून त्यात नवजात मृत्युदर २४.९ टक्के व पाच वर्षांखालील मृत्युदर ४२.९ टक्के इतकी आहे.
या सर्व आकडेवारीवरून भारतामधील कुपोषण व आरोग्याशी संबंधित समस्यांचे प्रमाण गंभीर असल्याचे स्पष्ट होते. परिणामी, भारताचा जागतिक भूक निर्देशांक (२७.५) हा ‘गंभीर’ श्रेणीत मोडतो. याचे प्रभावशाली व्यवस्थापन करण्यासाठी आहारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी आहारातील विविधता जपतानाच संतुलित आहार, वैद्यकीय पूरक औषधे हे पर्याय असू शकतात. मात्र त्यासाठी लागणारा खर्च हा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांच्या परवडण्यापलीकडे जातो. त्यामुळे त्यांच्या रोजच्या आहारात असलेल्या अन्नधान्यांचेच पोषणमूल्य वाढवणे (जैवसमृद्धीकरण) हा सर्वांत उपयुक्त आणि महत्त्वाचा ठरू शकतो.
जैवसमृद्धीकरण म्हणजे काय?
जैवसमृद्धीकरण (बायोफोर्टिफिकेशन) म्हणजे आपल्या आहारातील मुख्य अन्न पिकांमध्ये शाश्वत आणि किफायतशीर पद्धतीने सूक्ष्म पोषक मूलद्रव्यांचे (उदा. खनिजे, जीवनसत्त्वे इ.) प्रमाण वाढवून, ते अधिक पोषक बनविणे होय.
अनेकदा निकृष्ट दर्जाचे अन्न खाल्ल्याने पोट तात्पुरते भरल्याची भावना होत असली, तरी त्यातून पुरेसे पोषण मिळतेच असे नाही. पोषणाच्या अभावामुळे कुपोषणाचे आणि विविध आजारांचे चक्र कायम राहते. म्हणूनच रोजच्या आहारामध्ये असलेली आणि सामान्यतः सर्व शेतकऱ्यांची आणि आदिवासींचे मुख्य पिके असलेल्या भात, गहू, बाजरी, मका, रताळे इ. पिकांमध्ये अतिरिक्त प्रमाणात पोषक तत्त्वांचा समावेश करण्यावर कृषी शास्त्रज्ञांनी भर दिला आहे. अशा अन्नधान्यांची आहारात वापर केल्यामुळे गरिबांचेही कुपोषण दूर होण्यास मदत होते. त्यांच्या शरीरातील सूक्ष्म व पोषक मूलद्रव्यांची कमतरता टाळता येते.
पारंपरिक किंवा जैवतंत्रज्ञान पद्धतीने पिकांचे पुनरुत्पादन व नव्या जातींच्या पैदाशीतून जैवसमृद्धीकरण करता येते. कोणत्याही पोषक तत्त्वयुक्त अन्नधान्य पीक वाण तयार करताना काही महत्त्वाच्या बाबींवर लक्ष ठेवले जाते. त्यातील पोषक घटकांची, जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढवत असताना त्यांची एकरी उत्पादन कमी होऊन चालणार नाही. त्यांच्या शिजविण्याच्या किंवा स्वयंपाकांच्या पद्धतीमध्ये फारसे बदल करावे लागणार नाहीत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे हे वाण ग्राहकानाही पसंत पडले पाहिजेत. त्यामुळे शेतकरीही व्यावसायिक पातळीवर ही पिके घेण्यास पुढे येतील.
जैवसमृद्धीकरणाचे फायदे
जैवसमृद्धीकरणामुळे पिकांमधील पोषक द्रव्यांची जैवउपलब्धता वाढते.
तितक्याच उत्पादनामधून पोषकतेची गरज पूर्ण झाल्यामुळे गरिबांसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारी ठरते.
सामान्यतः या पिकांच्या लागवड व्यवस्थापनामध्ये फारसे बदल करावे लागत नाहीत.
उत्पादकता पूर्वीच्याच पातळीवर असल्याने शेतकऱ्यांच्या फायद्यात घट होत नाही.
ग्राहकांवरही कोणताही अतिरिक्त खर्च किंवा ताण वाढत नाही.
पोषक घटक किंवा जीवनसत्त्वाच्या वेगळ्या गोळ्या किंवा पूरक आहार घेण्यापेक्षा रोजच्याच आहारातून त्यांची पूर्तता होते.
- डॉ. अमृतलाल खैरे, ९८२२८८३४००
साहाय्यक प्राध्यापक, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी, मालेगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.