FPC Mahaparishad 2023 : ‘एफपीसीं’ना बहुराष्ट्रीय कंपन्यांशी जोडणार

Dhananjay Munde : काळ्या आईची सेवा करणारा माझा कष्टकरी शेतकरी भविष्यात कृषी क्षेत्रातील उद्योगपती झाला पाहिजे. त्यासाठी राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) बाजारपेठ मिळण्याकरिता अॅमेझॉनसह विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांशी जोडण्यात येईल.
FPC Mahaparishad
FPC Mahaparishad Agrowon
Published on
Updated on

Pune News : काळ्या आईची सेवा करणारा माझा कष्टकरी शेतकरी भविष्यात कृषी क्षेत्रातील उद्योगपती झाला पाहिजे. त्यासाठी राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) बाजारपेठ मिळण्याकरिता अॅमेझॉनसह विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांशी जोडण्यात येईल. त्यासाठी पावले उचलण्यास सरकारने सुरुवात केली आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

‘सकाळ-ॲग्रोवन’ आयोजित दुसऱ्या एकदिवसीय एफपीसी महापरिषदेचे उद्‌घाटन रविवारी (ता. २९) करताना ते बोलत होते. ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, झुआरी फार्म हब लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मदनमोहन पांडे व ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण व्यासपीठावर होते.

नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, नॅचरल शुगर्स अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, ‘आत्मा’चे संचालक दशरथ तांभाळे यांच्यासह राज्यभरातील निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (एफपीसी) प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. या महापरिषदेचे मुख्य प्रायोजक पारादीप फॉस्फेट लिमिटेड होते.

तसेच एक्स्चेंज पार्टनर म्हणून एनसीडीईएक्स; तर धनश्री क्रॉप सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, मल्टिलाइन अॅग्रो इंडस्ट्रीज, इकोझेन सोल्यूशन्स, स्मार्ट व पीएमएफएमई सहप्रायोजक होते.

FPC Mahaparishad
FPC Mahaparishad : मूल्यसाखळी विकासाचे घोडे अडलेलेच!

श्री. मुंडे म्हणाले, ‘‘राज्यात मोठ्या प्रमाणात एफपीसींची नोंदणी होते आहे. त्यांना अनुदानही पुरवले जाते. पण त्यांची मुख्य समस्या बाजारपेठेची आहे. त्यामुळे अॅमेझॉनसह इतर मोठ्या कंपन्यांच्या व्यासपीठांच्या एफपीसींना आणून जगाच्या बाजारपेठांशी जोडण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

एफपीसींच्या माध्यमातून शेतकऱ्याला उद्योजक करता येईल. अर्थात, ते केवळ कृषी ज्ञानाचा प्रसार करणाऱ्या अॅग्रोवनमुळे शक्य होईल. कारण सकाळ माध्यम समूह आज एका ज्ञानाच्या दिव्यासमान काम करते आहे आणि कृषिमंत्री म्हणून देखील प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात उत्कर्षाचा दीप प्रज्ज्वलित करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे.’’

‘‘कृषिमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच आमचे नेते अजित पवार यांनी बारामती केव्हीकेचा दौरा करण्यास सुचविले होते. बारामतीसारखे केव्हीके प्रत्येक जिल्ह्यात उभे करण्याचे आव्हान एफपीसींच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा संकल्प आपण करूया. एकविसाव्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानाची शेती केल्याशिवाय समृद्धी येणार नाही हे तरुण शेतकऱ्यांना सांगावे लागेल.

शेतीमालाला हमीभाव देण्याचे माझ्या हाती नसेल. पण चांगल्या योजना व अनुदानाच्या माध्यमातून उत्पादन खर्च २० टक्क्यांनी कमी करण्याची जबाबदारी कृषिमंत्री म्हणून मी माझ्या खांद्यावर घेतली, तरी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती येऊ शकेल. त्यासाठी एफपीसींच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरणाला वेग देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,’’ असेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार या वेळी म्हणाले, की आधुनिक ज्ञानाचे प्रवाह समूह शेतीत आणावे लागतील. त्याला एफपीसींची जोड दिल्यास क्रांती येईल. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सह्याद्री व नॅचरल शुगर अशा एफपीसी असून, त्याचा विस्तार होण्यासाठीच एफपीसी महापरिषदेचा उपक्रम हाती घेतला आहे. आज माध्यमांमध्ये नकारात्मक बाबींच्या हेडलाइन होत आहेत.

मात्र तळागाळात कुठे तरी जागतिक दर्जाच्या सुरू असलेल्या कामाची बातमीदेखील नाही. परंतु समाजासाठी आम्ही काय करू शकतो याचा सतत ध्यास सकाळ माध्यम समूह घेतो आणि त्यासाठी कृतीदेखील करतो.

शेतकऱ्यांच्या कष्टाच्या आता ज्ञानाची जोड द्यावी लागेल. त्यामुळेच बारामतीला आम्ही जागतिक दर्जाच्या संस्थांना एकाच व्यासपीठावर आणतो आहोत. त्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे प्रकल्प राबवीत आहोत. या प्रकल्पांचा विस्तार झाल्यास देशभरातील शेतकरी समृद्ध होतील.

FPC Mahaparishad
FPC Mahaparishad -2023 : ‘एफपीसीं’ना ऊर्जा क्षेत्रात मोठ्या संधी

अॅग्रोवनचे संपादक संचालक चव्हाण यांनी समूह शेतीला दिशा देण्यासाठी महापरिषद घेतली जात असल्याचे प्रास्ताविकात स्पष्ट केले. ‘‘एफपीसींनी आता अनुदानाच्या जंजाळात न अडकता सरकारकडून केवळ पायाभूत सुविधा तसेच बॅंकांकडून कर्ज या व्यतिरिक्त इतर बाबींमध्ये स्वतः वाटचाल करावी. ज्ञानाच्या आधारावर अडथळे पार करीत जगाच्या बाजारात ठामपणे उभे राहावे. या वाटचालीत अॅग्रोवन तुमच्या सोबत आहे,’’ अशी ग्वाही श्री. चव्हाण दिली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन मकरंद टिल्लू यांनी केले.

‘अॅग्रोवन’चे माझे नाते वडिलांसमान

कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी ‘अॅग्रोवन’शी आपले नाते कौटुंबिक असल्याचे सांगितले. ‘‘माझ्या वडिलांनी कधीकाळी ऊस तोडण्याचे काम केलेला साखर कारखाना मी आज लिजवर चालविण्यास घेतला आहे. शेतकरी पुत्र म्हणून ती माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. रोज सकाळी चहा आणि ‘अॅग्रोवन’सोबत माझ्या वडिलांची सकाळ उजाडत असे.

आज कृषिमंत्री पदावर मला बघताना त्यांना आनंद झाला असताच; पण माझ्या हस्ते ‘अॅग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन होत असल्याचे पाहून त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता. त्यामुळे माझे व माझ्या वडिलांचे जे भावनिक नाते होते, तेच नाते माझे या दैनिकाशी आजही आहे,’’ असे भावनिक उद्‍गार कृषिमंत्र्यांनी या वेळी काढले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com