Monsoon Crop Management : मॉन्सून आधारित पीक व्यवस्थापनाची सूत्रे

Monsoon Based crop Management : या वर्षी पाऊस वेळेवर येण्याची शक्यता अधिक आहे. अशा स्थितीमध्ये खरिपातील वेळेवर पेरणीसाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावे.
Monsoon Crop Management
Monsoon Crop ManagementAgrowon

-डॉ. प्रल्हाद जायभाये

हवामान विभागाने २०२४ या वर्षाच्या मॉन्सूनचा अंदाज १५ मे रोजी दिला आहे. त्यानुसार पाऊस सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी खरीप पिकांचे व्यवस्थापन करावे. या व्यवस्थापनासाठी १२ सूत्रे महत्त्वाची ठरणार आहेत. त्यातील जास्तीत जास्त मुद्यांचा आपल्या नियोजनात समावेश केल्यास शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणाला तोंड देणारी यशस्वी व लवचिक शेती करणे शक्य होणार आहे. 

वेळेवर पेरणी 

या वर्षी पाऊस वेळेवर येण्याची शक्यता अधिक आहे. अशा स्थितीमध्ये खरिपातील वेळेवर पेरणीसाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावे. कारण पेरणीची वेळ चुकली आणि उशीर झाल्यास काढणीच्या काळात परतीच्या पावसामुळे नुकसानीची शक्यता वाढेल. किंवा पिकाच्या पक्वतेच्या काळात  पाण्याच्या ताणास ते बळी पडू शकते. विशेषतः कोरडवाहू कापूस, सोयाबीन, तूर अशा पिकांची पेरणी एक आठवडा उशिरा झाली तर १० टक्के, दोन आठवडा उशीर झाला तर २५ ते ३० टक्के आणि तीन आठवडे उशीर झाला तर ५० ते ६० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येते, हे लक्षात ठेवावे.             

बांधबंदिस्ती व मृद्‍संधारणाच्या कामांवर भर 

या वर्षी अनेक भागांमध्ये मुसळधार किंवा जोरदार वादळी वाऱ्यासह पावसांच्या घटनांची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतातील माती वाहून जाऊ नये, यासाठी बांध बंदिस्ती आणि मृद्‌संधारणाच्या कामाकडे विशेष लक्ष द्यावे. गावपरिसरातील मृद जलसंधारणाची कामेही ‘माथा ते पायथा’ या तंत्राने झाली असल्याची गावसमितीने खात्री करावी. कामे झालेली नसल्यास पावसापूर्वी करून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे पाण्याच्या लोंढ्यांचा वेग कमी राहून आपली शेती वाचू शकेल. 

पूरपरिस्थितीचा धोका 

या वर्षी नदीपात्राच्या शेजारी असलेल्या गावांमध्ये पूर परिस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो. पूर परिस्थितीमुळे काठ व शेतातील माती वाहून जाण्यासोबतच नंतर जुलै ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये गोगलगाईंचा प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो. नदी, नाले व अन्य वाहत्या जलस्रोतांच्या पात्राशेजारच्या शेतकऱ्यांनी गोगलगाय नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची तयारी ठेवावी. पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना आखून पीक पद्धतीही ठरवावी. 

वाणांची निवड 

कोरडवाहू प्रदेशातील कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, तीळ, उडीद, मूग, खुरासणी/कारळा, नागली, वरई या पिकांच्या पेरणीसाठी हळव्या किंवा  निमगरव्या वाणांची निवड करावी. तर अन्य पिकांच्या पेरणीसाठी निमगरव्या किंवा गरव्या वाणाची निवड करणे उपयुक्त ठरू शकते.

पेरणी पद्धतींची निवड 

मूलस्थानी मृद्‍ व जलसंधारण करण्याकरिता उताराला आडवी मशागत, उताराला आडवी पेरणी,  बीबीएफ वर पेरणी, मिश्र पिकांची पेरणी तसेच गादीवाफ्यावर पेरणी, सरीवर पेरणी, मृत सरी या पैकी योग्य त्या पद्धती नक्की वापराव्यात. भाजीपाला पीक घेताना विशेषतः कांदा लागवड करताना गादीवाफा किंवा सरीवरच लागवड करणे अत्यावश्यक आहे.

जिवाणू संवर्धकावर भर 

बीज प्रक्रियेमध्ये जिवाणू संवर्धकाचा समावेश करावा. त्याच प्रमाणे खतांचे नियोजन करताना जिवाणूयक्त खतांची मात्रा देणे लाभदायी ठरेल. कारण उपयुक्त जिवाणूंची संख्या मुळांच्या परिसरात वाढल्यामुळे अति पाऊस किंवा पावसातील खंड या विपरीत काळातील परिणाम कमी राहण्यात मदत होते. उत्पादनामध्ये १५ ते ३५ टक्के पर्यंत वाढ मिळते. सोबत सेंद्रिय खतांची मात्रा थोडी वाढवून द्यावी.

शिफारशीत अंतरावरच पेरणी आवश्यक 

एकल पीक असो वा मिश्र पीक शिफारशीत अंतरावरच पेरणी करावी. रोपांची संख्या अधिक ठेवू नये. त्यामुळे पर्णभाराचे प्रमाण योग्य राहून, पिकांमधील ‘सूक्ष्म वातावरण’ योग्य राखले जाईल. पर्जन्य आपत्तीकाळात पीक वाया जाणार नाही. कोरडवाहू क्षेत्रामध्ये  रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धत, पट्टा पद्धत, मिश्र पीक, आंतरपीक वाणानुसार दोन ओळींतील व दोन रोपांतील अंतर शिफारशीप्रमाणेच ठेवावे.

वातावरण पावसाळी व ढगाळ अधिक काळ राहणार असल्याने कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. उदा. पिकातील सापेक्ष आर्द्रता सत्तर टक्क्यांहून अधिक, रिमझिम पाऊस अथवा ढगाळ वातावरण, ओली जमीन आणि पिकांचा पर्णभार अतिघनतेच्या लागवडीमुळे वाढतो. तांबेरा, अन्य बुरशीजन्य रोग अथवा रसशोषक किडी, पाने, फुले, शेंगा, बोंडे, खोड पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव अधिक होतो. कारण त्यांच्या वाढीस उपयुक्त सूक्ष्म वातावरण मिळते. पण झाडांची गर्दी शिफारशीइतकीच मर्यादित असल्यास हवा खेळती राहून त्यांचे प्रमाण कमी होईल. अति पावसात तण, कीड व रोग आणि खत व्यवस्थापन करणे सोपे जाईल. पीक अजैविक ताणासही बळी पडणार नाही.

अपेक्षित ओलावा झाल्याशिवाय पेरणी नको  

या वेळी मॉन्सूनचे आगमन वेळेत होण्याचा अंदाज आहे. वेळेत आगमन झाल्यानंतरही सलग तीन ते पाच दिवस पाऊस झाल्यानंतर, वातावरणात आर्द्रता असल्याचे पाहून सर्व खरीप पिकांची पेरणी जूनअखेर करावी. पेरणी करताना जमिनीचे व हवेचे तापमान त्या आठवड्यातील सरासरीइतके (म्हणजेच २५ ते ३० अंश सेल्सिअस) असावे. पूर्व विदर्भ, पश्‍चिम घाट आणि कोकणात या वर्षी भात पिकांची रोपे तयार करण्याचे काम वेळेत करावे. म्हणजेच भात लागवड शिफारशीप्रमाणे वेळेवर करणे शक्य होईल.

फळबाग

नवीन फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी शिफारशीप्रमाणे खड्डे खोदणे, खड्डे भरून ठेवावेत. नवीन लागवड केलेल्या व एक ते दोन वर्षे जुन्या लागवडीच्या झाडांना भक्कम लाकडी काठ्यांचा आधार द्यावा. अशा कलमांच्या मुळाशी माती लावावी. अतिरिक्त पाणी जमिनीमध्ये साचणार नाही यासाठी उपाययोजना करावी.फळबागेच्या नैॡत्य (दक्षिण -पश्चिम) व ईशान्य (उत्तर – पूर्व) बाजूने जैविक वारा प्रतिबंधक कुंपणाची लागवड करावी. शेडनेट किंवा हरितगृहातील संरक्षित शेती करत असलेल्या शेतकऱ्यांनी त्याच्या चौफेर बाजूंनी काही अंतरावर वारा प्रतिबंधक जैविक कुंपणाची लागवड करून घ्यावी. वारावादळापासून शेडचे संरक्षण होण्यास मदत होते.

विभागून खतांचे नियोजन 

खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांची मात्रा ही अधिक हप्त्यामध्ये विभागून देण्याचे नियोजन असावे. कारण अचानक आलेल्या पावसाने अन्नद्रव्ये वाहून जाण्याचा धोका लक्षात असू द्यावा. विशेषतः युरियाची मात्रा तरी अधिक हप्त्यांमध्ये विभागून द्यावी. ज्यांना शक्य आहे, त्यांनी रासायनिक खतांची मात्रा युरिया - डीएपी ब्रिकेटद्वारे दिल्यास सावकाश उपलब्धता होईल. किंवा कमतरतांनुसार नॅनो खतांच्या फवारणी द्वारे देण्याची तयारी ठेवावी.

पशुधनाची काळजी व लसीकरण 

आपल्या पशुधनाचे वेळच्यावेळी लसीकरण करून घ्यावे. हवामानांच्या अंदाजावर सातत्याने लक्ष ठेवून आपल्या पाळीव पशुपक्ष्यांचे अतिपाऊस किंवा पावसाळ्यातील पुराच्या धोक्यापासून संरक्षण होईल असे व्यवस्थापन करावे.

एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब 

महाराष्ट्रामध्ये अत्यल्प आणि अल्प शेतकऱ्यांची संख्या ४५ टक्के असून बहुतांश शेतकरी कोरडवाहू आहेत. अशा शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी एक किंवा दोन पिकांवर अवलंबून राहण्यापेक्षा हळूहळू शेतीचे विभाजन वेगवेगळ्या प्रकारातील पिकांमध्ये किंवा पूरक व्यवसायामध्ये करावे. आर्थिक स्थिती उत्तम असल्यास एकूण जमिनीच्या १० टक्के संरक्षित शेतीमध्ये वळवावे. ज्यांची आर्थिक स्थिती तितकीशी चांगली नाही, त्यांनी आपल्या पारंपरिक पिकांसोबत १० टक्के संरक्षित शेती, २५ टक्के सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये वळवावी. भविष्यात बदलत्या वातावरणाला तोंड देण्यासाठी आपली तयारी आतापासूनच हळूहळू करत जावी लागणार आहे. संरक्षित शेतीतूनच शेती उद्योग म्हणून फायदेशीर ठरू शकतो.

-डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९

(कृषी हवामान शास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com