Food Processing : ‘केव्हीके’तर्फे अन्न प्रक्रिया उद्योग कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा
Washim News : भारतासारख्या विकसनशील देशाची अर्थव्यवस्था शेतीशी निगडित आहे. उत्पादित अतिरिक्त कृषी मालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती केल्यास कृषी औद्योगिक अर्थव्यवस्था बळकट होईल. हा उद्देश समोर ठेवून कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) गृहविज्ञान शाखेतर्फे २ ते ६ सप्टेंबर या कालावधीत शेतीमालावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी कृषी मालाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविणे, काढणीपश्चात मालाची नासाडी कमी करणे, हाताळणी, साठवण, प्रक्रिया आणि विक्री याचे शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन करणे, जेणेकरून कृषी प्रक्रिया विकासातून ग्रामीण भागाचा विकास होऊन रोजगारनिर्मिती होऊ शकेल, या दृष्टिने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगितले.
कृषी विस्तार शाखेचे प्रमुख डॉ. एस. के. देशमुख यांनी, ग्राहकांची गेल्या २० वर्षांत बदललेली आहार पद्धती, वेळेअभावी तयार खाण्यायोग्य माल घेण्याकडे ग्राहकांचा कल, महिलांचा नोकरी-व्यवसायात मोठ्या प्रमाणात झालेला सहभाग, लोकांच्या उत्पन्नात झालेली वाढ, वृत्तपत्रे आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून होणाऱ्या जाहिराती, लोकांमध्ये वाढलेले साक्षरतेचे प्रमाण, आहाराबाबतची जागरूकता या सर्वांमुळे येणाऱ्या काळात अन्न प्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणात गती मिळेल, त्यामुळे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून या विषयाचे सर्व तंत्रज्ञान समजून घ्यावे, असे आवाहन केले.
गृहविज्ञान शाखेच्या प्रमुख शुभांगी वाटाणे यांनी, अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करताना प्रथमतः उद्योग उभारणीचा निश्चय झाल्यानंतर रितसर त्याची नोंदणी जिल्हा उद्योग केंद्राकडे करावी व प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाल्यानंतर उत्पादन क्षमतेनुसार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आवश्यक ती फीस भरून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे, असे सांगितले.
कृषी विद्या शाखेचे प्रमुख तुषार देशमुख यांनी, प्रगत अन्न प्रक्रिया उद्योगामुळे प्रामुख्याने हंगामातील अतिरिक्त उत्पादनामुळे होणारे नुकसान टाळू शकते, प्रक्रियेमुळे मूल्यवर्धन होण्यास मदत होते, शेतीमध्ये विविधता आणता येते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगली किंमत देता येऊ शकते, असे सांगितले.
पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख मयूर देशमुख यांनी, दूध व दुग्ध पदार्थ या विषयावर भर दिला. या प्रशिक्षणादरम्यान अर्चना कदम व सिंधूताई शिंदे यांच्या मदतीने शुभांगी वाटाणे यांनी विविध मसाले, लोणची, सोया दूध, टोफू तयार करून या सर्व अन्न पदार्थांचे पॅकिंग, लेबलिंग इत्यादींचे प्रात्यक्षिक करून घेतले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.