
Ahilyanagar News : अहिल्यानगर तालुक्याच्या दक्षिण-पश्चिम भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पूर्वा व वालुंबा या नद्यांना इतिहासात प्रथमच मोठा महापूर आला. प्रचंड पाण्यामुळे गावोगावचा संपर्क तुटला होता. साधारण पंधरापेक्षा अधिक गावांच्या शिवारात मोठे नुकसान झाले आहे.
जनावरे, वाहने वाहून गेली. पुराच्या पाण्यात अडकलेल्या दहा नागरिकांची पोलिस लष्कर आणि स्थानिकांनी सुटका केली. मंगळवारी (ता. २७) अहिल्यानगर- दौंड महामार्ग काही काळ बंद होता. जिल्ह्याच्या अन्य भागांतही जोरदार पाऊस झाला आहे.
अहिल्यानगर तालुक्यात जोरदार पावसाने खडकी येथे जनावरे, तर सारोळा कासारला वाहने वाहून गेली. अकोळनेर भोरवाडी रस्त्यासह इतर छोटे रस्तेही वाहून गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला होता. कामरगाव व वाळकीचा धोंडेवाडी या मोठ्या तलावांसह इतर छोटे-मोठे बंधारे पूर्ण भरले असून, वीजपुरवठा पूर्ण खंडित झाला होता.
पिंपळगाव कौडा, कामरगाव, चास, भोरवाडी, सोनेवाडी, अकोळनेर, सारोळा कासार, खडकी, बाबुर्डी बेंद या परिसरात झालेल्या जोरदार पावसाने पिंपळगाव कौडा, कामरगाव परिसरात उगम पावणाऱ्या वालुंबा नदीला काही वेळातच महापूर आला. या पुरामुळे अकोळनेर ते भोरवाडी रस्ता वाहून गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला. नदीवरील सारोळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने अकोळनेर ते सारोळा वाहतूकही ठप्प झाली.
अस्तगाव-सारोळा, सारोळा-घोसपुरी रस्त्यावरील वाहतूक बंद होती. पूर्वा- वालुंबा नद्यांचा संगम खडकीत असल्याने खडकी गावात पावसाचे पाणी घुसले. सयाजी कोठुळे यांच्या घराला पाण्याने वेढा दिला. खडकी येथील काही शेतकऱ्यांची जनावरे पुरात वाहून गेली. सारोळा कासार येथेही ट्रॅक्टर ट्रॉलीसह नदीच्या प्रवाहात वाहून गेला. वाळकीतील व्यावसायिक टपऱ्या वालुंबा नदीला आलेल्या महापुरात वाहून गेल्या आहेत.
नागरी वस्त्यांत पाणी शिरले. परिसरात बंधारे ओव्हर-फ्लो झाले असून, अनेक ठिकाणी नदीच्या पाण्याने प्रवाह बदलून सदर पाणी शेतामध्ये घुसले. वाळकी परिसरातील धोंडेवाडीचा साठवण तलाव इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात भरला. वडगाव तांदळी, गुणवडी येथील तलावात पाण्याची आवक झाली.
अरणगाव, खडकी, वाळकी परिसरात नदीपात्रामध्ये अडकलेल्या २५ नागरिकांनी लष्कर, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे सुटका केली. लष्कराच्या आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (एसीसीस ॲण्ड एस) विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली. नेवासा तालुक्यातील सोनई, घोडेगाव, वडाळा व मुळाथडीतील शिरेगाव, खेडलेपरमानंद व अंमळनेर परिसरात सलग चौथ्या दिवशी जोरदार पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले. संततधारेने व्यावसायिक व शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शिरेगाव परिसरात झालेल्या धुवाधार पावसाने खरवंडी रस्त्यावरील ओढ्याला पूर आला.
पाच मंडलांत अतिवृष्टी
अहिल्यानगर तालुक्यातील बारा महसूल मंडलांपैकी ४ व श्रीगोंदा तालुक्यातील एका मंडलात अतिवृष्टी झाली. बुधवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये ः सावेडी : ८७, कापूरवाडी : ५२, केडगाव : १००, वाळकी : १००, चास : ११८, सुपा : ४४, श्रीगोंदा : ३४, कोळगाव : ७०.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.