Chh. Sambhajinagar News : राज्यातील पहिला ३ मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. या वर्षी मार्चमध्ये प्रदान केलेल्या ९२०० मेगावॉट विकेंद्रित सौर प्रकल्पांचा हा एक भाग आहे. या प्रकल्पामुळे १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी हा एक प्रकल्प आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
हा जगातील सर्वांत मोठा विकेंद्रित सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. धोंदलगाव प्रकल्प ही सुरुवात आहे. प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार असल्याचे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२२ रोजी सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर किमान तीस टक्के कृषी फीडर्स डिसेंबर २०२५ पर्यंत सौरऊर्जेवर चालविण्यासाठी मिशन २०२५ जाहीर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. मिशन मोडवरील या योजनेतून सौरऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट ७ हजार मेगावॉटने वाढवून १६ हजार मेगावॉट विकेंद्रित सौरऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्टास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील शंभर टक्के कृषिपंप ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे.
१३ एकरांवर प्रकल्प उभारणी
धोंदलगाव येथे महावितरणच्या उपकेंद्रापासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या १३ एकर शासकीय जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या कामासाठी महावितरणकडून संबंधित कंपनीला ७ मार्च २०२४ रोजी कार्यादेश देण्यात आला तसेच १७ मे रोजी वीजखरेदी करार करण्यात आला. त्यानंतर अवघ्या साडेचार महिन्यांत प्रकल्प उभारून ५ सप्टेंबर रोजी कार्यान्वित करण्यात आला आहे.
१७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा
हा प्रकल्प महावितरणच्या धोंदलगाव ३३ केव्ही उपकेंद्राशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे उपकेंद्रातून निघणाऱ्या ५ वीजवाहिन्यांवरील १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळणार आहे. धोंदलगाव, नालेगाव, अमानतपूरवाडी व संजरपूरवाडी या गावांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्याची संधी
सौरऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करायची व त्याच्या आधारे कृषिपंप चालवायचे अशी ही योजना आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी विकेंद्रित स्वरूपात सौरऊर्जा निर्मिती केंद्रे उभारण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीजपुरवठा होण्यासोबत स्वस्तात वीज उपलब्ध झाल्याने उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्याची संधी भविष्यात मिळणार आहे. या योजनेमुळे कृषी क्षेत्राला मोलाची मदत करण्यासोबतच उद्योगांनाही प्रोत्साहन मिळणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.