Financial Planning : आर्थिक नियोजनातूनच होईल बचत

Financial Management : पैसा सांभाळणे, विचारपूर्वक खर्च करणे, पैसा कमावण्याचे कौशल्य, भांडवल उभे करणे, विमा, रोखमुक्त व्यवहार आणि अन्य बँकिंग सुविधा यांची माहिती घेऊन आर्थिक नियोजन क्षमता विकसित करणे आवश्यक आहे.
Finance
Finance Agrowon
Published on
Updated on

कांचन परुळेकर

गुंतवणुकीसाठी आर्थिक नियोजन करताना बँक खात्याचा उपयोग, बचतीचे महत्त्व, कर्जाचा वापर याची माहिती महत्त्वाची असते. पैसा सांभाळणे, विचारपूर्वक खर्च करणे, पैसा कमावण्याचे कौशल्य, भांडवल उभे करणे, विमा, रोखमुक्त व्यवहार आणि अन्य बँकिंग सुविधा यांची माहिती घेऊन आर्थिक नियोजन क्षमता विकसित करणे आवश्यक आहे.

दे शामध्ये जनधन योजना सुरू झाली आणि कोट्यवधी लोकांनी आपली खाती बँकेमध्ये सुरू केली. जनधन योजनेद्वारे देशातील सर्वसामान्य माणूस बँकेद्वारे अर्थकारणाशी जोडला गेला पाहिजे हा शासनाचा हेतू साध्य झाला आहे. मात्र शासकीय अनुदान सरळ खात्यात जमा होणे आणि बँककडून कर्ज सुविधा मिळविणे यासाठीच आपले बॅंक खाते असते असा समज लोकांचा झाला आहे. अजूनही बरेच लोक अर्थसाक्षर झालेले नाहीत. सर्वत्र आर्थिक साक्षरतेवर कार्यशाळा घेतल्या जातात, लिखाण केले जाते, व्याख्याने दिली जातात. पण दिवसभर कामाच्या रगाड्यात अडकलेला आणि वाचनापासून दूर असणारा जनधन खातेधारक याचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणून साध्या, सोप्या भाषेत अर्थसाक्षरतेबाबत या लेखमालेतून विविध विषयांची ओळख आपण करून घेत आहोत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बँक खात्याचा उपयोग, बचतीचे महत्त्व, कर्जाचा वापर, गुंतवणूक, त्यासाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे झाले आहे. पैसा सांभाळणे, विचारपूर्वक खर्च करणे, पैसा कमावण्याचे कौशल्य, भांडवल उभे करणे, विमा म्हणजे पैसा सुरक्षा, रोखमुक्त व्यवहार आणि अन्य बँकिंग सुविधा यांची माहिती देऊन आर्थिक नियोजन क्षमता विकसित करण्याची गरज आहे. पैशांकडे पाहण्याची आणि पैसा वापरण्याची वृत्ती आणि ग्रामीण भागातील जीवनपद्धती बदलण्याचा वसा जोवर सर्व थरातून घेतला जात नाही तोपर्यंत देशाच्या अर्थकारणातील सक्षम भागीदार म्हणून जनधन खातेधारकांचा समावेश शक्य होणार नाही. म्हणूनच आपण सर्व जण अर्थसाक्षर होऊयात. आपल्यासोबत शेतमजूर, कामगार, अशिक्षित लोकांना देखील अर्थ साक्षर बनविण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

Finance
Agriculture Water Management : उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर महत्त्वाचा

बचतीची सवय महत्त्वाची :

आपण आर्थिकदृष्ट्या असुरक्षित आहोत. परिणामी, आपल्याला सतत हात उसने, कर्ज यांचा आधार घ्यावा लागतो. सतत कर्जफेडीचा विचार अस्वस्थ बनवतो. शोषण चक्रात अडकून आत्मविश्‍वास गमावतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना या दुष्टचक्रातून बाहेरच पडता येत नाही. हे टाळायचे असेल, तर प्रथम शांतपणे बसून विचार करावा. स्वतःला प्रश्‍न विचारा, की मी गरिबीच्या चक्रात का अडकून पडलो आहे? खरे म्हणजे मी खूप कष्ट करून दर दिवशी मजुरी, मेहनताना मिळवतो. पण तो कमी अन अनिश्‍चित आहे. आपल्याजवळ कमी पैसा असताना, समाजाची रीत म्हणून लग्न, श्राद्ध, सण, समारंभ इत्यादी बाबींवर आपण सतत खर्च करतो. याचबरोबरीने चैन आणि अनावश्यक वस्तूंचा मोह कुटुंबाला टाळता येत नसल्यामुळे त्यावर अनाठायी खर्च होतो.

पैसा कमी पडला, की कोणताही विचार न करता झटपट पैसे देणाऱ्याकडून उसनवारी केली जाते. जादा दराने व्याज द्यावे लागते. मालमत्ता गहाण ठेवावी लागते. नैसर्गिक आपत्ती, पूर, वादळ, दुष्काळामुळे खर्च वाढतो. सरकारने अशावेळी मदत निधी दिला तरी तो अपुरा असतो किंवा मीच तो दिलेल्या कारणासाठी खर्च न करता अनावश्यक बाबींवर खर्च करतो. मिळकतीपेक्षा खर्च सतत जास्त असल्याने बचत करणे शक्य नाही असे मी ठरवून टाकले आहे. त्यामुळे माझ्याकडे बचतीची रक्कमच उपलब्ध नाही.

मोठ्या कर्जाचा बोजा डोक्यावर लादून घेण्यापूर्वी मी कोणताही पुढचा मागचा विचार न करता पटकन निर्णय घेतो. कारण मी फक्त माझा आजचा दिवस कसा पार पडेल, आजची गरज कशी भागेल, एवढाच विचार करतो. त्या क्षणी उद्याचा, भविष्याचा, सर्व गरजांचा अजिबात विचार करत नाही. त्यामुळे माझ्या आर्थिक परिस्थितीत चांगला बदल कधीही होत नाही. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दैनंदिन नियोजनात काही बदल आवश्यक आहेत.

आजपासून मी भविष्याचा विचार करेन, माझ्या कुटुंबीयांच्या गरजा, आवश्यकता, टाळता येणारे खर्च, भविष्यासाठी तरतूद, बचत, विमा, बँकसेवा या बाबींची नीट माहिती गोळा करेन. पैशासाठी ढोर मेहनत हे सूत्र बाजूला ठेवून हाती येणारा पैसा आपल्यासाठी कशा पद्धतीने काम करेल यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करेन. माझ्या आयुष्याचे ध्येय निश्‍चित करून योजनाबद्ध वाटचालीस आजच सुरुवात करेन. असे केल्यास माझ्या आयुष्याक्रमात सकारात्मक बदल घडेल. अशा ध्येयवादी नियोजनातून आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो.

Finance
Onion Subsidy : कांदा अनुदानाचे ८५ कोटी रुपये वितरित

आर्थिक नियोजन म्हणजे काय?

आर्थिक दुर्बलतेच्या चक्रातून बाहेर पडून आनंददायी, चिंतामुक्त जीवनाकडे वाटचाल करायची, तर आपल्याला हाती येणाऱ्या पैशाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. आपल्या संपूर्ण जीवनचक्रात आपल्या आर्थिक गरजा कोणत्या, त्याची सविस्तर मांडणी करावी. त्यातील अत्यावश्यक मूलभूत गरजा कोणत्या, आपल्या चांगल्या आणि वाईट सवयी कोणत्या, यांची विभागणी करून मूलभूत गरजा अन् इच्छांच्या पूर्ततेसाठी हाती येणाऱ्या पैशाचे नियोजन करावे.

आपल्या कुटुंबाच्या गरजा, इच्छापूर्तीचे ध्येय नक्की करणे, त्यासाठी शिस्तबद्धपणे बचत करणे, काही वेळा अनावश्यक गरजा कमी करून पैसा वाचविणे तसेच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ठरावीक अंतराने आपल्या आर्थिक वाटचालीची पाहणी करून, कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यक बदल करावेत. आपण फक्त आजचा विचार करून भावनेच्या भरात घाईगडबडीने आपण पैशाबाबत निर्णय घेतो. उत्पन्न, खर्च, भविष्याची तरतूद याचा विचार न करता पैसा खर्च करतो. आर्थिक नियोजन केल्याने प्रथम आपल्या उत्पन्नाच्या बाबी ध्यानी घेऊन आपला आर्थिक स्तर लक्षात घेता येईल.

भविष्यात होणाऱ्या खर्चाची तजवीज कशी करायची याची आखणी करावी. भावी खर्च भागविण्याच्या दृष्टीने रोज हाती येणाऱ्या पैशाचा एक भाग नियमितपणे वाचवून बाजूला ठेवावा. पैसा वाचविण्यासाठी अनावश्यक गोष्टींवरील खर्च कमी करावा. गरजेच्या वेळी कर्ज, विमा या बाबींची नीट माहिती घेऊन परतफेड, हप्ता याचा विचार करून या गोष्टींबरोबरच अन्य बँकिंग सेवांचा लाभ कधी, कसा, किती घ्यायचा हे ठरवावे.

आपल्या उत्पन्नाचे योग्य नियोजन करावे. मिळकत, बचत, कर्ज, विमा, भांडवल, व्यवसाय या सर्व गोष्टींचा सविस्तर विचार करून आखणी करावी. कालांतराने अवलोकन करावे. याचा प्रारंभ करण्यासाठी आजपासून पुढील आठ दिवस आपले उत्पन्न आणि खर्च याच्या नोंदी ठेवा. तिथून पुढेही कायम या नोंदी ठेवाव्यात. यातून आपल्यालालवकरच बचतीचे महत्त्व लक्षात येईल.

उत्पन्न म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांना मिळणारा पगार किंवा मजुरी, घरभाडे, शेती किंवा अन्य मार्गाने मिळणारा पैसा. खर्च म्हणजे आपण वेगवेगळ्या गोष्टींवर खर्च केलेला पैसा. उदा. अन्न, कपडे, घरभाडे, घर दुरुस्ती, वीजबिल, पाणी, शिक्षण, आजारपण, लग्न समारंभ, सणवार, कर्जफेड हप्ता, तीर्थयात्रा इत्यादी.

हिशेब ठेवल्याने आपण उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करत आहोत, की खर्चापेक्षा उत्पन्न थोडेफार जास्त आहे हे स्वत:लाच नीट समजेल. पैशाचे नियोजन करण्यासाठी लवकरात लवकर आपण कोणत्या स्थितीत आहोत हे आपल्या लक्षात आले पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com