Mahad News : किल्ले रायगडाच्या (Raigad Fort) पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये रेशनिंग दुकानदाराकडून रेशनधारकांना कमी प्रमाणात धान्य देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. ग्रामस्थांच्या वतीने शाश्वत धेंडे यांनी याबाबत बेमुदत उपोषण केले होते.
यावर सखोल चौकशी करून अखेर रेशनिंग दुकानधारकाचा परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी बजावले आहे. तसे लेखी पत्र उपोषणकर्ते ग्रामस्थांनाही देण्यात आहे.
पाचाड गावामध्ये सुमारे ३८० रेशन कार्डधारक आहेत. या ठिकाणी रेशनिंग दुकान परवाना राजेंद्र खातू यांना देण्यात आला होता; मात्र हे दुकान युनुस सय्यद चालवत होते.
रेशनिंग दुकान चालवत असलेल्या दुकानदाराकडून रेशन कार्डधारकांना अपमानास्पद वागणूक देणे; तसेच सरकारने निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात धान्य दिले जात असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या.
या तक्रारीवर निर्णय होत नसल्याने गावातील सामाजिक कार्यकर्ते शाश्वत धेंडे यांनी ग्रामस्थांसह उपोषण सुरू केले. याबाबत जोपर्यंत सखोल तपास होत नाही आणि रेशनिंग दुकानाचा परवाना रद्द केला जात नाही;
तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यानुसार २२ फेब्रुवारीपासून हे उपोषण आंदोलन सुरू झाले होते.
या उपोषण आंदोलनाला प्रशासनाकडून याबाबत सुनावणी घेण्याचे आश्वासन मिळाल्याने ते स्थगित करण्यात आले होते; परंतु सुनावणी वेळेत होत नसल्याने २० मार्चपासून हे उपोषण पुन्हा सुरू करण्यात आले. त्यात उपोषणकर्ते धेंडे यांची प्रकृती बिघडली होती.
सुनावणी लावण्यात केली जाणारी टाळाटाळ यामुळे हे प्रकरण चिघळले होते. अखेर २५ मार्चला याबाबत आदेश प्राप्त झाला असून, रेशनिंग दुकानदाराचा परवाना रद्द केल्याचे पत्र ग्रामस्थांना दिले आहे.
प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय नवले यांनी हा आदेश काढला आहे. शिधाधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात हे दुकान कोंझर येथे जोडले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.