Integrated Farming : पन्नास एकरांत एकात्मिक, सेंद्रिय शेतीचे मॉडेल

Organic farming : जहागिरपूर (जि. अमरावती) येथील संगणकीय अभियंता असलेल्या सूरज गिरी यांनी शेती, त्यात विविध फळपिके, गहू, हरभरा व तेलबिया अशी विविधता व त्यास देशी गोपालनाची जोड यातून ५० एकरांत एकात्मिक सेंद्रिय शेतीचे मॉडेल आकारास आणले आहे.
Organic farming
Organic farmingAgrowon
Published on
Updated on

विनोद इंगोले

Integrated Organic Farming : जहागिरपूर (जि. अमरावती) येथील संगणकीय अभियंता असलेल्या सूरज गिरी यांनी शेती, त्यात
विविध फळपिके, गहू, हरभरा व तेलबिया अशी विविधता व त्यास देशी गोपालनाची जोड यातून ५० एकरांत एकात्मिक सेंद्रिय शेतीचे मॉडेल आकारास आणले आहे. शेतीतील उत्पादनास बाजारपेठ मिळवून विक्री व्यवस्थाही तयार केली आहे.

अमरावती जिल्ह्यात जहागिरपूर (ता. तिवसा) येथे गिरी कुटुंबाची सामुहिक ५० एकर शेती आहे. शेती व पूरक व्यवसाय अशी एकात्मिक सेंद्रिय शेती विकसित केली आहे. सध्या मुख्य जबाबदारी संगणकीय अभियंता असलेले सूरज पाहतात. त्यांचे वडील माधव यवतमाळ पोलिस दलातून उपअधिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. नोकरीच्या मागे न लागता सूरज यांनी विविध कल्पना, संकल्पना राबवीत २०१२ पासून शेतीलाच प्रयोगशाळा बनविले. त्यांची बहिण डॉ. श्‍वेता या विवाहीत असून दंतचिकित्सक आहेत.

पीक पद्धती व विकास

एकूण पन्नास एकरांत मुख्य पीक २० एकरांतील संत्रा आहे. दहा-बारा वर्षांपूर्वीची तसेच अलीकडील काही वर्षांतील अशी एकूण दोनहजारांपर्यंत झाडे आहेत. सुमारे १० गुंठ्यात सघन पद्धतीने प्रत्येक फळपिकाची काही झाडे याप्रकारे विविधता तयार केली आहे. यात जंबो तसेच एल- ९ हे पेरूचे, केशर, तोतापुरी, बारमाही, दशहरी हे आंब्याचे, बालानगर, एनएमके-१ (गोल्डन) हे सीताफळाचे तर पपईचे गावरान, रेड लेडी आदी वाण आहेत. या बागेत भेंडी, गवार, टोमॅटो, पालक, मेथी, कारली आदींची आंतरपिके घेतली आहेत. बारमाही कोणते ना कोणते फळ उपलब्ध होत राहावे या प्रकारे लागवडीचे नियोजन आहे. आंतरपिकांमधून उत्पन्न मिळत राहणार आहे. हिमाचल प्रदेशातील सफरचंद, गुलाबी रंगाचे व पाण्याचे प्रमाण अधिक असलेले रोज ॲपल, वॉटर ऍपल, स्टार फ्रूट, पपनस, मँगो बोअर, मलबेरी आदींचीही प्रत्येकी एक- दोन झाडे आहेत.

Organic farming
Integrated Farming Practices : एकात्मिक शेती पद्धतीतूनच कोकणाचा शाश्‍वत विकास

गहू, हरभऱ्याचे विविध वाण

-गव्हाच्या पाच तर हरभऱ्याच्या तीन वाणांची लागवड.
-सोनामोती गहू छत्तीसगड भागातील. शरीरात लोहाचे प्रमाण वाढण्यासाठी तो उपयुक्त.
-खपली गव्हात ग्लुटेनचे प्रमाण कमी. शरबती गव्हापासून पुरणपोळ्या चांगल्या होतात.
-प्रत्येक वाणाची दरवर्षी एक- दीड एकरांत लागवड.
-खपली गव्हाला मागणी अधिक असल्याने त्याचे क्षेत्र दोन एकरांपर्यंत.
-प्रति किलो दराने खपली ८० रुपये, सोनामती १५० रुपये किरकोळ तर १०५ रुपये घाऊक, शरबती ५० रुपये या प्रकारे थेट विक्री.
-हरभऱ्याचा चनोली (पांढरा) वाण हिमाचल प्रदेशातून आणला आहे. पुरण व उसळ म्हणून त्याची चव जिभेवर रुळणारी. त्यामुळे मागणी राहते. त्याचा किरकोळ विक्रीचा दर प्रति किलो १३० रुपये तर घाऊक दर १०० रुपये.
-काबुली हरभरा अर्धा एकर. त्याची घाऊक विक्री आठ हजार रुपये प्रति क्‍विंटल दराने.

तेलबियांची विविधता

-दोन एकर मोहरी, अडीच एकर जवस, सव्वा एकरांवर उन्हाळी तीळ.
-मोहरीचे एकरी तीन क्‍विंटल, जवस साडेतीन क्‍विंटल उत्पादन. करडई यावर्षी पहिल्यांदाच लावली आहे. जवस १२० रुपये तर मोहरी १०० रुपये प्रति किलोप्रमाणे घरूनच विक्री.

-गुजराती (बारीक) आणि जाड मोहरीचेही उत्पादन.
-ग्राहकांकडून मागणी असल्यास जवस तेल काढून देण्यावर भर. त्यासाठी छोटे यंत्र घेतले आहे.

बाजारपेठ, सेंद्रिय प्रमाणीकरण

सूरज बहुतांश मालाची थेट विक्री करण्यावर भर देतात.बंगळूर, हैदराबाद, मुंबई, पुणे येथील मॉल्सलाही
माल पाठविण्यात येतो. अमरावती येथे चार भागीदारांसह सेंद्रिय शेतमालाचा मॉल सुरू केला आहे. शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यात येते. तृतीय पक्ष कंपनीकडून शेतीचे प्रमाणीकरण करून घेतले आहे.

देशी गोपालन

सेंद्रिय शेतीला पूरक असे ३५ गवळाऊ देशी गायींचे पालन होते. देशी तुपाची मागणी लक्षात घेऊन दोनहजार रुपये प्रति किलो दराने विक्री होते. एक किलो तूप तयार करण्यासाठी २८ ते ३२ लिटर दुधाची गरज भासते. मिळणाऱ्या दुधापैकी ५० टक्के दूध गायीच्या बछड्यास दिले जाते. ताकाचा सेंद्रिय शेतीत वापर होतो. मुबलक प्रमाणात शेणखत मिळत असल्याने सहा क्‍युबिक मिटर क्षमतेचे बायोगॅस युनिट उभारले आहे. इंधनाचा वापर फार्महाऊस व मजुरांच्या घरी होणार आहे.

शेतीतील अन्य बाबी

-एक हेक्टरमध्ये मिळून चार शेततळी.
-शेतालगत वाहणाऱ्या नाल्याचे खोली- रुंदीकरण. ५० मिटर लांब आणि तीन मिटर रुंद असे नाल्याचे आकारमान. बांधबंदिस्ती व ‘फिल्टरेशन पीट’ उभारला आहे. त्यात कोळसा व वाळू यांचा वापर करून पाण्याचे शुद्धीकरण करण्यावर भर. ‘लिफ्ट’ करून पाणी विहिरीत सोडले जाते.

-प्रति २०० लिटरच्या ड्रममध्ये ताक. त्यात तांब्याची भांडी ठेवली जातात. त्याचा वापर किडी-रोगांना प्रतिबंध करण्यासाठी.
-शेतातील नैसर्गिक स्त्रोतांपासूनच विविध सेंद्रिय निविष्ठांची निर्मिती.
-जैविक खते व कीडनाशके कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर येथून आणली जातात.
-धैंच्याची लागवड व फुलावर येताच तो जमिनीत गाडण्यात येतो.

-परागीकरणाचे महत्त्व लक्षात घेऊन शेतात मधमाशांच्या दहा पेट्या ठेवल्या आहेत. खादी- ग्रामोद्योग मंडळाच्या प्रशिक्षण वर्गात सूरज सहभागी झाले होते. त्यातूनच पेट्यांचा अनुदानावर पुरवठा.

सूरज गिरी- ९०२८०९६१९३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com