
Ratnagiri News : कृषी विभागाकडून जिल्ह्याला मंजूर असलेल्या खतांपैकी ११ हजार ७४१ टन एवढे खत उपलब्ध झाले आहे. आतापर्यंत १ हजार ५३७ पैकी ८१४ गावांमध्ये शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप केले गेले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. शिवकुमार सदाफुले यांनी दिली.
यंदा खरीप हंगामाकरिता एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी युरिया, डीएपी, संयुक्त खते, एसएसपीचे १२ हजार ९०८ टन खत मंजूर आहे. त्यापैकी ६ हजार ९८४ टन युरिया जिल्ह्याला मंजूर आहे. मागील तीन महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते जून या कालवधीत जिल्ह्यात ११ हजार ७४१ टन एवढे खत उपलब्ध झाले आहे. तसेच ७ हजार २३७ टन युरियाही उपलब्ध झाले.
जिल्ह्यातील परिस्थिती पाहता मागील तीन वर्षांमध्ये खतांचा सरासरी वापर १२ हजार २९७ टन आहे. सद्यःस्थितीतa मंजूर खत आणि उपलब्ध खते यांची तुलना केली असता जिल्ह्यात ९० टक्के खते उपलब्ध झालेले आहे. इथून पुढे भात पिकाकरिता व फळझाडांच्या खते भरणीकरिता आवश्यक असलेली आणखी खते उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.
तसेच वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून भात पिकासाठी युरिया खत मिळावे यासाठी जिल्ह्यातील ५०० टन बफर स्टॉकमधील ४१६ टन युरियाचा साठा ८३ टक्के खत विक्रिसाठी खुले करून देण्यात आले आहे. याचा फायदा जिल्ह्यामधील दुर्गम भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच इतरांनाही झाला आहे.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून बांधावर खते, बियाणे, निविष्ठा वितरण मोहीम जिल्ह्यातील शेतकरी गट किंवा समूहांकरिता कृषी विभाग रत्नागिरी, खरेदी-विक्री संघ, विकास सोसायटींद्वारा राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १ हजार ५३७ गावांपैकी ८१४ गावांमध्ये ४४९ गटांमार्फत बांधावर खते किंवा निविष्ठांचे वितरण करण्यात आले असून सामूहिक खरेदीमुळे आर्थिक बचतीसह वेळेची देखील बचत झाली आहे.
संगेमश्वर, चिपळूणात खतांची टंचाई
संगमेश्वर, चिपळूण या दोन तालुक्यांत खतांची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. याबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ठाकरे शिवसैनिकांनीही यावरून कृषी विभागाला लक्ष्य केलेले होते. जिल्हा कृषी विभागाकडून आतापर्यंत चिपळूणमध्ये ११७६ टन तर संगमेश्वरमध्ये ८५४ टन खतपुरवठा केलेला आहे.
दरवर्षीप्रमाणे दोन्ही तालुक्यांना खतपुरवठा केलेला असतानाही शेतकऱ्यांकडून ओरड होत असल्याने तालुक्याला प्राप्त खत झिरपले कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जाता आहे.
तालुकानिहाय खतांचा पुरवठा (टनांत) ः
तालुका युरिया सुफला एकूण खत (युरिया+ सुफला)
दापोली ५७५.५५ २८५.५ ८६१.०५
मंडणगड ४०.५ १२२ १६२.५
खेड ४५४.१४ ८४ ५३८.१४
गुहागर २८८.७६ ३०१.८ ५९०.५६
चिपळूण १०१४.०७ १६२ ११७६.०७
संगमेश्वर ७०४.७ १४९.५ ८५४.२
रत्नागिरी ११६२.८४ ४७८.५ १६४१.३४
लांजा ६०७.२४ २१६.५ ८२३.७४
राजापूर ६७४.९९ २७८ ९५२.९९
एकूण ५५२२.७९ २०७७.८ ७६००.५९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.