
Sangli News : सांगली जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग २३ मार्चपूर्वी रद्द करावा, अन्यथा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदान दिनी म्हणजेच शहीददिनी बाधित शेतकरी सामुदायिक फाशी घेतील, असा इशारा शेकापच्या वतीने आयोजित महामार्ग लढा राज्यव्यापी कार्यशाळेत देण्यात आला.
शक्तिपीठ महामार्ग व राज्यभरातील इतर महामार्गामधील बाधित शेतकऱ्यांची राज्यव्यापी कार्यशाळा शनिवारी (ता. १५) सांगलीत शेकापच्या महामार्ग आघाडीच्या वतीने पार पडली. मराठवाड्याचे शेकापचे नेते मोहन गुंड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून उद्घाटन केले. डॉ. भारत पाटणकर, प्रा. दिनकर दळवी, ॲड. एकनाथ ढोकळे, ॲड. अजितराव सूर्यवंशी, कार्यशाळेचे निमंत्रक दिगंबर कांबळे आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बाबूराव लगारे होते.
डॉ. पाटणकर यांनी, महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा संघर्ष मजबूत करण्यासाठी गावागावांतील शेतकरी एकजूट करण्याचे आवाहन केले. प्रा. दळवी यांनी भूसंपादनबाबत मार्गदर्शन केले. उच्च न्यायालयाचे वकील ॲड. एकनाथ ढोकळे यांनी, २०१३ भूमी अधिग्रहण कायदा व त्यामध्ये शेतकरीविरोधी झालेले बदल याबद्दलची मांडणी केली. निमंत्रक दिगंबर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. शेतात आलेल्या अधिकाऱ्यांना फाशी देऊ, पण एक इंच जमीन देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
ॲड. अजितराव सूर्यवंशी यांनी स्वागत केले. संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष भूषण गुरव यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी शक्तिपीठ महामार्ग बाधित अनेक शेतकऱ्यांनी मते मांडली. संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष घनःश्याम नलावडे यांनी कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातून रद्द करण्यास भाग पाडू, असा इशारा दिला.
विविध महामार्गामधील दोनशेपेक्षा जास्त बाधित शेतकरी उपस्थित होते. शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार यांनी आभार मानले. या वेळी तेजस्विनी सूर्यवंशी, सूर्यकांत पाटील, विनोद लगारे, शशिकांत बामणे, सागर रणदिवे, गजानन सावंत व इतर शेतकरी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.