Bharatratna Chaudhary Charan Singh : शेतकरीपूत्र भारतरत्न : चौधरी चरणसिंह

Article by Nagesh Tekale : भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार व्यक्तींना त्यांच्या राष्ट्रसेवा अथवा निःस्वार्थ समाजसेवेसाठी दिला जातो. कृषिप्रधान भारतास घडविण्याचे, तळागाळामधील लहान मोठ्या शेतकऱ्‍यांना माया, प्रेम देऊन त्यांना आधार देणारे शेतकरीपूत्र स्व. चौधरी चरणसिंह हे भारत मातेचे खऱ्या अर्थाने रत्न होते, म्हणूनच मरणोत्तर का होईना ते भारतरत्न झाले.
Chaudhary Charan Singh
Chaudhary Charan SinghAgrowon

Ex. PM And Farmer Leader Chaudhary Charan Singh : भारतरत्न हा भारत सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्याच बरोबरचे इतर सन्माननीय नागरी पुरस्कार २६ जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यावर राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या शुभहस्ते प्रदान केले जातात. भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार व्यक्तींना त्यांच्या राष्ट्रसेवा अथवा निःस्वार्थ समाजसेवेसाठी दिला जातो. या वर्षीचे भारतरत्न पुरस्कारांचे चित्र जरा वेगळेच होते. प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यावर एक आठवड्याने दोन भारतरत्न जाहीर झाले आणि त्यानंतरच्या एका आठवड्याने दुसऱ्‍या टप्प्यात तीन भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले.

या पंचरत्नामधील सर्वांत जास्त जमेची बाजू म्हणजे दुसऱ्‍या टप्प्यातील दोन रत्ने शेतकऱ्‍यांना मिळाली. ही दोन रत्ने म्हणजे एक माजी पंतप्रधान स्व. चौधरी चरणसिंह तर दुसरे कृषी शास्त्रज्ञ स्व. एम. एस.स्वामिनाथन. दोन आठवड्यातच घडलेल्या या दोन सुखद घटनांवर लेखाच्या रूपात भाष्य करण्यास मी मुद्दाम एक आठवडा जास्त घेतला तो फक्त लोकांची प्रतिक्रिया ऐकून त्यांची नोंद घेण्यासाठी.

ताम्रपट व पिंपळ पानाच्या आकाराचे सन्मान चिन्ह असे या सर्वोच्च नागरी सन्मानाचे स्वरूप आहे. स्वतः शेतकरी असलेले आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी स्व. चरणसिंह हे शेतकऱ्‍यांचे खऱ्‍या अर्थाने तारणहार होते. ते उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री नंतर देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान सुद्धा झाले. एवढ्या उच्च पदावर राहून सुद्धा ते शेतकऱ्‍यांना कधीही विसरले नाहीत.

चौधरी चरणसिंह यांची शेतकरी, त्यांचे विविध प्रश्न व त्यासाठी त्यांची बांधीलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे असे अनेक जण म्हणत असताना दिल्ली, उत्तर प्रदेशच्या सीमांना लागून शेतकऱ्‍यांचा त्यांच्या उत्पादित धान्यांस योग्य हमीभाव द्यावा हा आक्रोश कोणाच्याही कानावर पडत नाही काय?

Chaudhary Charan Singh
Bharat Ratna Award : शेतकऱ्यांच्या कैवाऱ्याचा 'भारत रत्न'ने सन्मान ; कोण होते चौधरी चरणसिंह?

स्वतः विज्ञानाचे पदवीधर असणारे चरणसिंह यांनी शेतकऱ्‍यांना विज्ञानास धरून शेती करण्यास प्रोत्साहित केले. उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात ते महसूल आणि कृषिमंत्री असल्यामुळे शेतकऱ्‍यांच्या सर्व लहान मोठ्या प्रश्नांची त्यांना फक्त ओळखच नव्हती तर ते प्रश्न सोडवण्यास ते कायम प्राधान्य देत. तेथील शेतकऱ्‍यांचा साधा पेहराव त्यांनी शेतकरी म्हणून स्वत:ही स्वीकारला आणि शेवटपर्यंत ते तसेच शेतकऱ्‍यासारखे साधे जीवन जगले.

उत्तर प्रदेशमधील जमीन सुधारणांचे संपूर्ण श्रेय त्यांना जाते. कर्जबाजारी शेतकऱ्‍यांना कर्जमुक्ती देणारे विधेयक त्यांनीच त्यांच्या काळात मंजूर केले होते. अनेक वेळा उत्तर प्रदेशमध्ये जनसभा घेताना ते सभेला उद्देशून ‘माझ्या शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो,’ असे संबोधित करत आणि नंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट पाच मिनिटे तरी थांबत नसे.

भारताचे पंतप्रधान असताना त्यांच्या स्मृती चिन्हांच्या संग्रहालयात नांगर, औत, तिफण, बैलजोडी, गोठ्यामधील गाय हे सर्व पाहिल्यावर विदेशी पाहुणे आश्चर्य चकीत होत. कृषिप्रधान भारतास घडविण्याचे, तळागाळामधील लहान मोठ्या शेतकऱ्‍यांना माया, प्रेम देऊन सतत त्यांना आधार देणारा हा भारत मातेचा शेतकरीपूत्र खऱ्या अर्थाने रत्न होता, म्हणूनच मरणोत्तर का होईना ते भारतरत्न झाले. आणीबाणीमध्ये ते तुरुंगांत असताना सुद्धा पत्ररुपाने शेतकऱ्‍यांशी संवाद साधत.

‘‘आपला भारत हा विविध जाती धर्मांचा देश आहे, येथे सर्वधर्म सहिष्णूता आहे म्हणूनच शेतामध्ये सुद्धा शेतकऱ्‍यांनी प्रत्येक हंगामात विविध प्रकारची पिके लावावीत, त्यांचे उत्पादन घ्यावे,’’ हे ते नेहमी शेतकऱ्यांना सांगत.

Chaudhary Charan Singh
National Farmer's Day 2023 : देशाचे पंतप्रधान तरीही शेतकऱ्यांचे कैवारी ; कोण होते चौधरी चरणसिंह?

उत्तर प्रदेश म्हणजे ऊस पिकाचे आगारच! स्व. चरणसिंह यांनी पाण्याची व्यवस्था नसणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्‍यांना ऊस शेतीसाठी कधीही प्रोत्साहित केले नाही. कृषी विद्यापीठांत शेतकऱ्‍यांना आमंत्रित करून तेथील संशोधन दाखविण्यापेक्षा कृषी विद्यापीठांनीच स्वतः शेतकऱ्‍यांच्या बांधावर जावे असे ते आग्रहाने म्हणत. कृषी विद्यापीठास तुमच्या बांधावर त्यांच्या ज्ञानासह घेऊन येईल, हे असे वचन देणारे ते पहिले कृषिमंत्री होते.

उत्तर प्रदेशामध्ये कृषिमंत्री असताना त्यांची डॉ. स्वामिनाथन यांच्याशी नेहमी भेट होत असे. ते स्वतः त्यांच्या भेटीस जात. दिल्लीमध्ये आल्यावर मोकळा मिळणारा थोडा वेळ ते नेहमी पुसाच्या भव्य परिसरात व्यथित करत. अनेक शास्त्रज्ञांना भेटत आणि उत्तर प्रदेशाच्या शेतकऱ्यांसाठी अजून काय चांगलं करता येईल, याची चर्चा करत.

स्व. चरणसिंह यांना भारतरत्न सन्मान जाहीर झाल्यावर पश्चिम उत्तर प्रदेशामधील जाट शेतकरी भागात दिवाळी प्रमाणे उत्सव साजरा झाला. २८ जुलै १९७९ रोजी चरणसिंह भारताचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते की, ‘‘देशामधील गरिबी हटवावयाची असेल तर सर्व प्रथम आपला शेतकरी खऱ्‍या अर्थाने श्रीमंत होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन प्रयत्न करू या,

आजपासूनच कामाला लागू या.’’ स्व. चौधरी चरणसिंह यांचे हे शब्द त्यांच्या काळात पूर्ण झालेच नाहीत. ते त्यांच्या सरकारवरच्या विश्वासदर्शक ठराव लोकसभेत जिंकू शकले नाहीत आणि जेमतेम १७० दिवसांचे त्यांचे शेतकरी कल्याण प्रधान सरकार कोट्यवधी गरीब शेतकऱ्‍यांच्या डोळ्यात अश्रूंना वाहते ठेवत कोसळले. शेवटपर्यंत शेतकऱ्‍यांचा, शेतकऱ्‍यांसाठी आणि शेतकऱ्यांकरता जगणारा हा शेतकरी पंतप्रधान आज खऱ्‍या अर्थाने भारतरत्न झाला ही शेतकऱ्यांबद्दल प्रेम, संवेदना असणाऱ्‍या प्रत्येकासाठी डोळ्यात आनंद

अश्रू आणणारी घटना आहे. शेतकरी श्रीमंत होणे हे त्यांचे स्वप्न होते. भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने त्यांचे हे अधुरे स्वप्न पूर्ण होईल का?

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com