
Latur News : दमडाही खर्च होता शेताला जाणाऱ्या शेतरस्ते, पाणंद रस्ते व वहिवाटीच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सस्ती अदालतीचा उपक्रम हाती घेतला असून मंगळवारी (ता. ६) लातूर तहसील कार्यालयात तर बुधवारी (ता. सात) मुरुड (ता. लातूर) येथे आयोजित या उपक्रमाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
दोन्ही अदालतींमध्ये मिळून दीडशेहून अधिक शेतकऱ्यांनी शेतरस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. यातील १०५ शेतरस्त्यांसाठी तातडीने स्थळपाहणी (स्पॉट व्हिजिट) करण्यात येणार असून, गरज पडल्यास भूमिअभिलेख विभागाकडून मोजणी व पोलिस बंदोबस्तात रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात येणार, असल्याची माहिती तहसीलदार सौदागर तांदळे व नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी दिली.
जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शेत, पाणंद, शिव व वहिवाटीच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली जात आहे. मोठ्या संख्येने शेतरस्ते पक्के झाले तरी विभक्त कुटुंबात होणाऱ्या जमिनीच्या वाटण्या व या जमिनीला लागणाऱ्या रस्त्याची गरज व वाद वाढत आहेत. यामुळे शेतरस्त्याचे विषय संपता संपत नसल्याची स्थिती आहे. यातूनच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार व विभागीय महसूल आयुक्त दिलीप गावडे यांच्या संकल्पनेतून सस्ती अदालतीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
मंगळवारी लातूर तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे - विरोळे यांच्या उपस्थितीत आयोजित सस्ती अदालतीत साडेदहा किलोमीटरच्या सहा रस्त्यांसाठी तडजोड करण्यात आली. याचा साठ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. ३५ शेतरस्त्यांची आता स्थळ पाहणी होणार आहे. यासाठी मोजणी व पोलिस बंदोबस्त मोफत दिला जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी अदालतीतील रस्त्यांचा विषय निकाली काढण्यात येणार येणार असल्याचे श्री. तांदळे यांनी सांगितले.
मुरुड येथे बुधवारी आदिनाथ मंगल कार्यालयात आयोजित सस्ती अदालतीच्या उपक्रमात ७० शेतकऱ्यांनी शेतरस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी केली. एका माजी सैनिक शेतकऱ्याला शेतरस्त्याची अडचण मांडताना अश्रू अनावर झाले. नायब तहसीलदार सरोदे यांनी त्यांना जवळ घेऊन दिलासा दिला. उपक्रमात दाखल शेतकऱ्यांच्या सर्व शेतरस्त्यांची स्थळपाहणी करण्यात येणार आहे.
रस्त्याशी संबंधित सर्व शेतकऱ्यांना नोटिसा देऊन स्थळपाहणीच्या वेळी हजर राहण्यास सांगण्यात येणार आहे. स्थळपाहणीच्या वेळी मोजणीदार व पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून लागलीच मोजणी करुन रस्त्यावरील अतिक्रमण काढून शेतकऱ्यांच्या सहभागाने कच्चा रस्ता तयार करून दिला जाणार असल्याचे श्री. सरोदे यांनी सांगितले.
धाराशिवमध्ये आज सस्ती अदालत
शेतरस्ते अतिक्रमणमुक्तीसाठी राबवण्यात येणाऱ्या सस्ती अदालतीतील पहिला उपक्रम शुक्रवारी (ता. ९) तहसील कार्यालयात होणार आहे. तहसील कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आल्याचे तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना अतिक्रमित शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे करून देण्यासाठी जलद आणि परिणामकारक उपाययोजना म्हणून सस्ती अदालत उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सरकारच्या विविध विभागांचे अधिकारी दर पंधरवड्याला एकत्र येऊन प्रकरणांचा तातडीने निपटारा करणार आहेत. त्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.