Pune News : संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा (KMM) च्या मार्गदर्शनाखाली दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन हमीभाव कायद्याची अंमलबजावणी, इतर मागण्यांसाठी आधी हे सुरू होते. पण आता तीन शेतकऱ्यांच्या सुटकेवरून याला अधिक धार आली आहे. १७ एप्रिलपासून शेतकरी शंभू सीमेवर आंदोलन करत आहेत. यामुळे मंगळवारी देखील अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या चार दिवसात रेल्वे विभागाला २० लाख १२ हजार रुपये परत करावे लागले आहेत. यामुळे रेल्वे विभागाचे आर्थिक नुकसान होत असून या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसत आहे.
हरियाणा पोलीसांनी अटक केलेल्या नवदीप सिंग, अनिश खतकर आणि गुरकीरत सिंग या शेतकऱ्यांच्या सुटकेसाठी आंदोलक शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे याच्या आधी फिरोजपूर विभागातील १७१ गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर २८६ गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले होते. यामुळे येथे ९४४ प्रवाशांना ४ लाख ९७ हजार रूपयांचा परतावा द्यावा लागला होता. यानंतर लुधियाना रेल्वे स्थानकावर देखील प्रवाशांना पैसे परत करण्याची नामुष्की रेल्वे विभागावर ओढावली. येथे दीड लाख रुपये प्रवाशांना द्यावे लागले आहेत.
तर शेतकरी आंदोलनामुळे हजारो प्रवाशांना तिकीट रद्द करावे लागले असून ३८८ गाड्या प्रभावित झाल्या आहेत. यापैकी १३० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. २२६ गाड्या वळवण्यात आल्या असून १५ गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. तर १४ गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. दोन गाड्यांचे वेळापत्रक री-शेड्युल करण्यात आले असून एक नियमित करण्यात आल्याची माहिती फिरोजपूर विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे.
गेल्या सात दिवसापासून सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या रेल्वे रोको आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे स्थानकावर अनेक तासानंतरही तिकीट मिळत नाही किंवा रद्द करण्यास वेळ लागत आहे. यामुळे अनेक प्रवाशांना टॅक्सीचा आधार घ्यावा लागत आहे. तर शंभू स्थानकावरील अंबाला विभागातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे अमृतसर, लुधियाना, भटिंडा, फाजिल्का, हिस्सार आदी मार्गांवर परिणाम होत आहे.
दरम्यान हिमाचल प्रदेशातील उना ते दिल्लीपर्यंत धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस रेल्वे पुन्हा सुरू झाली. यामुळे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र उना येथून धावणाऱ्या तीन पॅसेंजर गाड्या रेल्वे बोर्डाला रद्द कराव्या लागल्या आहेत. रेल्वे बोर्डाने उना-चंदीगड-अंबाला, उना-सहारनपूर-हरिद्वार आणि दौलतपूर चौक-अंब-अंदौरा-चंदीगड-अंबाला या मार्गांवर धावणाऱ्या प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तीन पॅसेंजर गाड्या रद्द कराव्या लागल्या असून त्या पुढील आदेश येईपर्यंत सुरू केल्या जाणार नाहीत, असे उना रेल्वे स्टेशनचे अधीक्षक रोदश सिंह यांनी पीटीआयला सांगितले.
तसेच सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे उनाला येणाऱ्या काही गाड्या गेल्या काही दिवसांपासून उशिराने धावत आहेत. अंबाला-अमृतसर मार्गावर किमान ७३ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या आंदोलनामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांची गैरसोय होण्याबरोबरच उत्पन्नाचेही नुकसान झाल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.