
Kolhapur News : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील उदगाव ते चोकाक बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळावी, होणारा मार्ग उदगाव बायपास महामार्गावरून न्यावा या मागणीसाठी शनिवारी (ता.१५) कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगाव (ता.शिरोळ) येथील टोलनाक्यावर सकाळी अकराच्या सुमारास महिला व शेतकरी एकत्रित येऊन महामार्गावर ठिय्या मारला.
‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, चौपट भरपाई मिळालीच पाहिजे, जुन्या बायपास मार्गावरून महामार्ग नेला पाहिजे’ यांसह विविध घोषणा देत सरकारचा निषेध केला. या वेळी शेतकरी पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. दरम्यान, शेकडो शेतकरी व महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे मोठे तणाव निर्माण झाला होता.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील उदगाव ते चोकाक बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळावी, होणारा मार्ग उदगाव बायपास महामार्गावरून न्यावा या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शनिवारी (ता. १५) उदगाव येथे सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखून आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता.
याच पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी अकराच्या सुमारात आंदोलकांनी उदगाव येथे सांगली-कोल्हापूर महामार्गावर ठिय्या मारला. या वेळी पोलिस फौजफाटा व शेतकरी-महिला यांच्यामध्ये जोरदार झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी महिला व शेतकऱ्यांना उचलून ताब्यात घेतले. शनिवारी सकाळपासून शिरोळ येथे राजू शेट्टी यांना शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
त्यानंतर जयसिंगपूर, कोथळी, निमशिरगाव, जैनापूर, अतिग्रे, तमदलगे, उदगाव, हातकणंगले येथील अनेक कार्यकर्त्यांना विविध पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून ताब्यात घेतले. त्यामुळे हे उदगाव येथे होणारे आंदोलन होणार नाही असा समज पोलिसांचा होता. मात्र मोठ्या संख्येने शेतकरी व महिला एकत्रित येऊन महामार्गावर ठिय्या मारल्यानंतर मोठी झटापट झाली. ताब्यात घेतलेल्या शेतकरी व आंदोलकांना हातकणंगले येथे आणण्यात आले होते.
या आंदोलनात स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष रामचंद्र शिंदे, सुधाकर पाटील, राजगोंडा पाटील, वृषभ पाटील, विशाल चौगुले, शैलेश चौगुले, गौतम इंगळे यांच्यासह महिला सहभागी झाल्या. उदगाव टोलनाक्यावर तहसीलदार अनिलकुमार हेळकर हे उदगाव विभागातील सर्व मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्यासह उपस्थित होते. त्याचबरोबर अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळंके, जयसिंगपूरचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, शिरोळचे पोलिस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड आदींचा फौजफाटा होता.
राजू शेट्टी आंदोलनापूर्वीच ताब्यात
जैनापूर येथे गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू असून, याची प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. चौपट भरपाई व उदगाव बायपासवरून मार्ग नेण्यासह इतर मागण्यासाठी सातत्याने आंदोलन होत असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शनिवारी सकाळी माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मारून आंदोलन केले. हे आंदोलन दडपशाहीने मोडीत काढण्याचा प्रयत्न कराल, तर यापुढे हे आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.