Farmer Demands: शेतीपंपांसाठी केवळ सहा तास वीजपुरवठा आणि त्यातही वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या कायगाव परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. २०) मध्यरात्री गणेशवाडी येथील वीज उपकेंद्रावर धडक मोर्चा काढत महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना जाब विचारत नियमित व सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी केली..महावितरणकडून यापूर्वी शेतीपंपांसाठी दररोज आठ तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून हा कालावधी कमी करून केवळ सहा तासांवर आणण्यात आला आहे. त्यातही आठवड्यातून तीन ते चार दिवस विविध कारणे देत वीजपुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. उर्वरित वेळेतही तार तुटणे, वीज खांब कोसळणे, तांत्रिक बिघाड किंवा तातडीचे भारनियमन यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे..Farmers Protest: शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ओतले बनावट खत.सध्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता असतानाही विजेअभावी पंप बंद पडत आहेत. आधीच पावसाने दडी मारल्याने ऊस, कापूस, भाजीपाला तसेच इतर सिंचनावर अवलंबून असलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत नैसर्गिक संकटाबरोबरच प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे..Farmers Protest: उपसाबंदी उठवण्यास पाटबंधारे विभागाचा नकार.या पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्री मोठ्या संख्येने शेतकरी गणेशवाडी वीज उपकेंद्रावर एकत्र आले. वरिष्ठांच्या आदेशानुसार वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचे तेथील ऑपरेटरने सांगितले. मात्र, या उत्तराने शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीन भूमिकेबाबतही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली..आमदारांच्या पत्रालाही केराची टोपली?गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवून कृषीपंपांना नियमित व सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली होती. तसेच लोडशेडिंगचे वेळापत्रक पूर्वसूचनेसह पारदर्शकपणे जाहीर करणे, पावसाळ्यापूर्वी जीर्ण ट्रान्सफॉर्मर, वीज खांब, डीपी आणि तारांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करणे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अजूनही अपुरा व खंडित वीजपुरवठा सहन करावा लागत असल्याने आमदारांच्या सूचनांकडे महावितरण प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून प्रशासनाविरोधातील रोष दिवसेंदिवस वाढत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.