
Jalgaon News : पावसाळा लांबल्यामुळे आधीच उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच त्यातच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने पिकांची स्थिती बिकट होत आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांत ही समस्या कायम आहे.
त्यामुळे संतप्त झालेल्या फुपनगरी (ता. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी याप्रश्नी जळगाव येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी जळगावात धडक दिली.
फुपनगरी व परिसरात आणि जिल्हाभरात विजेची समस्या शेतकऱ्यांसाठी तापदायक ठरली आहे. फुपनगरी येथील शेतकऱ्यांनी नुकतीच जळगाव शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक दिली व या समस्येबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. या वेळी अधिकाऱ्यांनी विजेची मागणी अदिक आहे. पण तोडगा काढू, असे आश्वासन देऊन अंग काढून घेतले.
नंदुरबार जिल्ह्यात तळोदा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक वैतागले असून, कापूस, केळी होरपळत असल्याने आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत चालू राहील यासाठी संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या तळोदा तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून, बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच केळी, पपई, ऊस, कापूस यांसारख्या नगदी पिकांवर अधिक भर देतात.
विशेषतः उसाचे व कापसाचे क्षेत्र जास्त असल्याने साहजिकच अधिक पाण्याची गरज भासते. तसेच तालुक्यात कृषिपंपांची संख्यादेखील अधिक असून, अनेक विद्युत रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक भार आहे.
परिणामी अधिक लोडमुळे रोहित्रावर तांत्रिक बिघाडाची समस्या कायम उद्भवत असल्याने ठिकठिकाणी वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. तसेच कमी दाबाने देखील वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तळोदा शहरासह तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांमध्ये आठ दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्याने असंख्य नागरिकांचे विशेषतः शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी वीजखांब मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडल्याने वीजपुरवठा मोठ्या प्रमाणावर खंडित झाला.
वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागल्याने शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी मोठी धडपड करावी लागली. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी बागायती कपाशीची लागवड केली आहे, त्यामुळे ते कोवळे पीक वाचविण्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावे लागले. तसेच जून महिना अर्धा संपला असला तरी तालुक्यात पावसाने हजेरी लावलेली नाही.
महागडी रोपे जळण्याची भीती
सध्या शेतकरी फळबागायतीकडे मोठ्या प्रमाणावर वळला असून, केळी व पपईची महागडी रोपे खरेदी करून लागवड करीत आहे. पावसाळा लांबल्याने उकाड्यात मोठ्या प्रमाणावर भर झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.