Pik Vima Bharpai : पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडूनच वसुली; सर्वेक्षकांकडून नुकसान दाखविण्यासाठी पैशांची मागणी

Crop Insurance Update : नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीचे लोकं पैसे मागत असल्याच्या तक्रारी राज्यभरातून पुढे येत आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Pune News : नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीचे लोकं पैसे मागत असल्याच्या तक्रारी राज्यभरातून पुढे येत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना तक्रारी केल्यानंतर कारवाई देखील करण्यात आली. काही लोकांना कामावरून काढण्यात देखील आले. तरीही शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचे प्रकार थांबायला तयार नाहीत. 

त्याचे महत्वाचे कारण म्हणजे हे लोक विमा कंपन्यांमध्ये कायमस्वरुपी काम करणारे नसतात. विमा कंपनी त्रयस्त कंपन्यांमार्फत पंचनाम्यासाठी कर्मचारी पुरवठ्याचे काम करून घेतात. या त्रयस्त कंपन्या पंचनाम्यासाठी तात्पुरते लोक कामावर घेतात. म्हणजेच त्यांची नोकरी तात्पुरती असते. त्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकले तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे हे लोक शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याची संधी सोडत नाही, असे काही स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. 

विशेष म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होतात, तेव्हा कृषी विभागाचा कर्मचारी सोबत असणे आवश्यक आहे. म्हणजेच कृषी विभागाच्या देखरेखीखाली पंचनामे व्हायला हवेत. पण कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित नसतात. याचा फायदा पंचनामे करण्यासाठी आलेल्या कंपनीचे कर्मचारी घेतात, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. 

जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सांगितले की, विमा कंपनीच्या कर्मचाऱ्याने ५०० रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर विमा मिळेल की नाही हे सांगता येत नाही, असे सांगितले. त्याच्या सोबतचा माणूस म्हणाला की, पैसे दिले नाही तर नुकसान दाखवले जाणार नाही. पैसे दिले तर जास्त नुकसान दाखवू. त्यामुळे नाइलाजाने पैसे द्यावे लागले. 

Crop Insurance
Crop Insurance Compensation : विमा कंपनीच्या पोर्टल बंदमुळे पूर्वसूचना थांबल्या

बीड जिल्ह्यातील शिराळा येथील शेतकरी संजय आजबे यांना देखील असाच अनुभव आला. या प्रकाराची तक्रार तालुका कृषी अधिकारी, एसीबी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, पिकाचे नुकसान झाल्यानंतर अनेक दिवस पंचनामा झाला नाही. त्यामुळे मी उडीद आणि सोयाबीन पीक काढून शेत पेरणीसाठी तयार केले. त्यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनाम्यासाठी आले असता तुम्ही पीक लावलेच नाही.

त्यामुळे पंचनामा करण्यास नकार दिला. पैसे दिल्याशिवाय विमा कंपनीच्या अॅपवर नुकसानीची नोंद करणार नाही, असेही सांगितले. त्यांनी पंचनामा आणि स्पाॅट व्हेरिफिकेशनसाठी २५०० रुपये मागितल्याचे आजबे यांनी सांगितले. शेवटी २ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी ७०० रुपये मी त्यांना ऑनलाईन पाठविले. तसेच उरलेले पैसे त्यांना रोख दिले. त्याचा पुरवाही मेलमध्ये जोडल्याचे त्यांनी कळवले. 

Crop Insurance
Crop Insurance : रब्बी हंगामाचा पीकविमा लवकरच जमा होणार

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात तर तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी २१ जणांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली. सर्वेक्षकांनी बाधित क्षेत्र अधिक दाखविण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप आहे. जागेवर बसून सर्व्हे करणे, शेतकऱ्याच्या शेतावर न जाता एकाच जागेवरून इतरही शेतकऱ्यांचे नुकसान नोंदविणे, असेही आरोप तक्रारीतून करण्यात आले आहेत.

रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या वतीने दिल्ली नोएडा येथील ‘द लीडर’ या कंपनीकडून सर्वेक्षकांची नेमणूक करार तत्त्वावर करण्यात आली आहे. या पुरवठादार कंपनीकडे याबाबतची माहिती पोहोचताच त्यांनी संबंधित सर्वेक्षकांना काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तर पोलिस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे समजते. 

राज्यभरात शेतकऱ्यांकडून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. काही ठिकाणी शेतकरी स्वतः पैसे देतात तर काही ठिकाणी जबरदस्तीने पैसे उकळले जात आहेत. शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी कुणालाही पैसे देऊ नये. कृषी पंचनाम्यासाठी पैसे मागत असतील तर कृषी विभागाकडे लेखी तक्रार करा, असे आवाहन कृषी विभागाने केले. 

आता काही ठिकाणी शेतकरी तक्रारी करत आहेत. पण ज्या सर्वेक्षकांच्या हाती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आला तेच पैसे मागत असतील तर शेतकरी शे-दोनशेकडे पाहत नाही, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. या सर्व कामावर कृषी विभागाचा आणि विमा कंपनीचा वचक असायला हवा. जर असे प्रकार घडत असतील तर थेट विमा कंपनीवरच कारवाई व्हायला हवी. कारण आपले काम विमा कंपनी पुरवठादार कंपनीकडून करून घेते. त्यामुळे जबाबदारीही विमा कंपनीवर असायला हवी. तेव्हाच असे प्रकार थांबतील, असेही शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com