Jalgaon News : खानदेशात विविध फिडरवर वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने वीजपुरवठा सुरळीत करावा व जीर्ण तारा बदलाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
ग्रामीण भागासाठी कार्यरत विविध फिडरवरून विविध गावांतील शेतकऱ्यांना वीजपुरवठा होतो. सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू असून, बहुतांश शेतकऱ्यांनी केळी, पपई व कापसाची लागवड केली आहे. गेल्या आठवड्यापासून परिसरात तास दोन तास वीजपुरवठा सुरळीत राहतो. पुन्हा काही काळासाठी खंडित होतो. त्यामुळे बागायती शेती धोक्यात आली आहे.
वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे महागडी रोपे, तसेच बियाणे वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून, पिकांना मोठ्या प्रमाणावर पाणी द्यावे लागत आहे.
त्यातच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे जिकिरीचे ठरत आहे. पिकांना पाणी देता येत नसल्याने कोवळी पिके अखेरची घटका मोजत आहेत. येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्यात धरणगाव, जळगाव, चोपडा, यावल, मुक्ताईनगर, धुळ्यातील धुळे, शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारात शहादा, तळोदा, नंदुरबार, नवापूर आदी सर्वच भागात शेतीचा वीजपुरवठा खंडित होत आहे.
यंत्रणा खराब
गेल्या अनेक वर्षांपासून तारा टाकण्यात आल्या आहेत. त्या जीर्ण झाल्यामुळे वारंवार विद्युत फॉल्ट होतो, तसेच खांबही मोठ्या प्रमाणावर जुने झाल्याने कधी कोसळतील याची भीती व्यक्त होत आहे. शिवाय वारंवार होणाऱ्या घर्षणामुळे भविष्यात शॉर्टसर्किटमुळे आगीची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळे विविध भागांतील तारा लवकर बदलून वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.