Summer Jowar : उन्हाळी ज्वारीला हमीभाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

Jowar Rate : शासनाने खरीप व रब्बी हंगामांतील पिकांचे हमीभाव जाहीर केले असले, तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतल्या गेलेल्या उन्हाळी ज्वारीची खरेदी हमीभावाने केल्या जात नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
Jowar
Jowar Agrowon

Yavatmal News : शासनाने खरीप व रब्बी हंगामांतील पिकांचे हमीभाव जाहीर केले असले, तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतल्या गेलेल्या उन्हाळी ज्वारीची खरेदी हमीभावाने केल्या जात नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यंदा सोयाबीन, कपाशी व तुरीचा बहुतांश शेतकऱ्यांनी पेरा केला होता.

सोयाबीनवर आलेल्या येलो मोझॅकमुळे उत्पादनात घट आल्याने शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी केली, परंतु पेरणीदरम्यान व पेरणीनंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे पीक करपले. काहींनी अटोकाट प्रयत्न करून पिकाला वाचविले. परंतु पाहिजे त्या प्रमाणात यश आले नाही.

Jowar
Jowar Registration : ज्वारी विक्रीसाठी शासकीय केंद्रात अल्प नोंदणी

त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा मोडून ज्वारी पिकाला पसंती देत पुसद तालुक्यात तब्बल एक हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात जानेवारी महिन्यात ज्वारीची पेरणी केली. पेरणीनंतर अस्मानी संकटामुळे ज्वारीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे महागडे रासायनिक कीटकनाशके फवारून पीक वाचवावे लागले. अनेक भागात वादळी पावसामुळे पीक आडवे पडून नुकसान झाले. परंतु शेतकरी डगमगला नाही.

ज्वारीला असलेल्या बाजारभावामुळे आता आर्थिक तूट भरून निघेल या आशेने पिकाचे संगोपन केले. ज्वारी काढणी वेळी पुन्हा अवकाळीचे संकट आल्याने मजुरानींही आपली मजुरी वाढवली व शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली. त्यावरही मात करून शेतकऱ्यांनी पीक काढणी केली. तब्बल १५ ते वीस क्विंटल एकरी उत्पादन काढून धान्य घरी आणले. त्या वेळी ज्वारीला ३१८० रुपये हमीभाव मिळेल अशी आशा होती.

Jowar
Jowar Rate : ज्वारीची विक्रीदर अद्याप हमीभावापेक्षाही कमीच

शासन खरीप, रब्बी पेऱ्याची सातबारावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांचीच नोंदणी करीत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी ज्वारीचे भाव पाडले असून, तब्बल १८०० ते १९०० रुपये इतक्या कमी भावाने शेतकऱ्यांना ज्वारी विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने भेदभाव न करता उन्हाळी ज्वारीलाही हमीभावाने खरेदी करून दिलासा द्यावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

किसान मार्केट यार्डला नाफेडची नोडल एजंसी असून, रब्बी पिकांतर्गत नोंद असलेल्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचीच नोंदणी चालू आहे. उन्हाळी ज्वारी नोंदणी संदर्भात नाफेडकडून कुठलेही निर्देश नसल्याने उन्हाळी ज्वारीची नोंदणी सुरू नाही.
- यशस अग्रवाल, बाजार समिती, संचालक
यंदा कपाशी पिकाने दगा दिल्याने जानेवारी महिन्यात कपाशी काढून सहा एकर क्षेत्रांवर ज्वारीचे पीक घेतले. जवळपास १०० क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. नाफेडच्या अधिकृत केंद्रावर उन्हाळी ज्वारी हमीभावाने खरेदी केल्या जात नसल्याने आम्ही शेतकऱ्यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन हमीभावाने ज्वारी खरेदी करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्याची मागणी केली आहे.
- अशोक चंद्रवंशी, शेतकरी, वालतूर रेल्वे, ता. पुसद, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com