Tomato Cultivation : उन्हाळी टोमॅटोचं नियोजन करताना काय काळजी घ्यावी?

अळीच्या नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या आहेत. कीड नियंत्रणासाठी जैविक कीड नियंत्रण पद्धतींवर अधिक भर दिला जातो.
Tomato
Tomato Agrowon

शेतकरी ः शाम वसंत धोंडगे

गाव ः मातोरी, ता. जि. नाशिक

एकूण शेती ः ९ एकर

टोमॅटो लागवड ः २ एकर

Summer Tomato Cultivation : नाशिक जिल्ह्यातील मातोरी येथील शाम वसंत धोंडगे यांची मातोरी व रवळगाव (ता. दिंडोरी) अशा दोन ठिकाणी ९ एकर शेती आहे. त्यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष पिकाची लागवड केली आहे.

मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पीक पद्धतीत बदल करत त्यांनी टोमॅटो लागवडीस सुरुवात केली आहे. टोमॅटोची हंगामी लागवडीचा करण्याचा निर्णय घेत गुणवत्तापूर्ण रोपांची निवड, सुधारित लागवड पद्धतीचा अवलंब ते करत आहेत.

टोमॅटो लागवडीमध्ये प्रामुख्याने खत, कीड-रोग व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिल्यास दर्जेदार उत्पादन मिळत असल्याचे शामराव सांगतात. सध्या त्यांच्याकडे ५ एकरावर द्राक्ष बाग आणि २ एकरावर उन्हाळी टोमॅटो लागवड आहे.

रवळगाव येथील द्राक्ष बाग काढल्यानंतर त्याच क्षेत्रात त्यांनी यावर्षी पहिल्यांदाच उन्हाळी टोमॅटो लागवड केली आहे.

लागवड नियोजन

रवळगाव (ता. दिंडोरी) येथे २ एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवडीचे नियोजन केले. त्यासाठी जमीन तयार करून खतांच्या मात्रा दिल्या. त्यात प्रामुख्याने कोंबडीखत ८ क्विंटल, जैविक खते २०० किलो, १०ः२६ः२६ आणि १५:१५:१५ प्रत्येकी १०० किलो प्रति एकर प्रमाणात मात्रा दिली.

लागवडीसाठी ४ फुटांचे बेड तयार करून ठिबकच्या नळ्या टाकून घेतल्या. त्यावर २५ मायक्रॉन जाडीचा ४ फूट रुंदीचा पेपर अंथरूण घेतला आहे.

लागवडीसाठी रोपवाटिकेतून रोपांची १ रुपये प्रति रोप दराने खरेदी केली. लागवडीसाठी एकरी ५ हजार रोपे लागली आहेत.

लागवड ४ फुटांच्या बेडवर झिगझॅग पद्धतीने दोन ओळींत दीड फूट तर दोन रोपांत १ फूट अंतर राखत केली आहे. त्यानुसार तयार रोपांची १२ जानेवारीला २ एकरावर लागवड केली. संपूर्ण लागवड पॉलिमल्चिंगवर केली आहे.

Tomato
Summer Jowar Cultivation : शेतकऱ्यांचा उन्हाळी ज्वारी लागवडीकडे कल

खत व्यवस्थापन

जमिनीतील अन्नघटकांचे प्रमाण आणि झाडाची गरज पाहून खत व्यवस्थापन करण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे मर्यादित खर्चात चांगले उत्पादन घेणे शक्य होते. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून झाडे सशक्त होण्यास मदत होते.

वाढीच्या अवस्थेनुसार खतांचा प्रमाणशीर वापर केल्यामुळे झाडांची वाढ जोमदार होऊन अधिक फळधारणा होत असल्याचे शामराव सांगतात.

लागवडीनंतर फुलधारणा व अपेक्षित उत्पादनासाठी पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होणे आवश्यक असते. पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी ह्युमिक ॲसिडची आळवणी केली.

मॅग्नेशिअम सल्फेट, फेरस, कॅल्शिअम यांचा ठिबक व फवारणीद्वारे वापर केला आहे.

वाढीच्या अवस्थेत १३:४०ः१३, १३:०:४५ यांचा वापर केला जातो.

कॅल्शिअम नायट्रेट, मॅग्नेशिअम नायट्रेट यांच्या संतुलित वापरावर भर दिला जातो.

सिंचन नियोजन

उन्हाळ्यात पिकास पाण्याचा ताण बसण्याची अधिक शक्यता असते. पाण्याचा ताण बसू नये याची विशेष काळजी घेतली जाते. जेणेकरून पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होऊ नये. त्यासाठी आठवड्यातून एक वेळ प्रवाही पद्धतीने सिंचन केले जाते.

जमिनीची वाफसा स्थिती आणि पिकाची पाण्याची गरज पाहून सिंचन केले जाते. संपूर्ण लागवडीत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.

पीक फुलोऱ्यात असताना तसेच फळवाढीच्या अवस्थेत वाफसा अवस्था पाहून ठिबक संचाचा कालावधी कमी-जास्त केला जातो.

आगामी नियोजन

सध्या लागवड होऊन ७० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. झाडांवर चांगली फळधारणा झालेली आहे.

पुढील १० ते १२ दिवसांत टोमॅटोचे तोडे सुरु होतील. कीड-रोग व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यामुळे फळांचा दर्जादेखील चांगला राहिला आहे.

वेळोवेळी निरीक्षणे नोंदवून व्यवस्थापन केल्याने झाडांचा हिरवेगारपणा व गुणवत्तापूर्ण फळधारणा झालेली आहे.

टोमॅटो विक्री नाशिक येथील मार्केटसह गुजरात मधील नानाबोंडा मार्केटमध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार ज्याठिकाणी दर चांगले मिळतील तेथे विक्री केली जाईल. चालू हंगामात साधारणपणे ५ हजार क्रेट उत्पादन अपेक्षित आहे.

वाण निवड महत्त्वाची..

उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटो लागवडीचे नियोजन करताना वाणांची निवड ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामध्ये झाडांची वाढ व गुणवत्तापूर्ण उत्पादन या बाबींचा विचार केला जातो.

विशेषतः रोगप्रतिकारशक्ती, उत्पादकता व फळे काढणीपश्चात टिकवणक्षमता या मुख्य बाबी विचारात घेतल्या जातात.

उन्हाळ्यात फळांचा रंग, आकार, चकाकी व टिकवणक्षमता चांगली असणे अत्यंत गरजेचे आहे. अशा मालास बाजारात दरही चांगला मिळतो. त्यानुसार दर्जेदार रोपांसाठी रोपवाटिकेत आगाऊ मागणी नोंदवून उपलब्धता केली जाते.

Tomato
Summer Crop Sowing : पाच जिल्ह्यांत २९ हजार एकरांवर उन्हाळी पीक

कीड रोग व्यवस्थापन

उन्हाळी हंगामातील टोमॅटो लागवडीमध्ये रोगांच्या तुलनेत किडींचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. त्यामुळे किडींच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण केले जाते. प्रादुर्भाव ओळखून उपाययोजना करण्यावर भर दिला जातो.

पावसाळ्याच्या तुलनेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव उन्हाळी लागवडीत तुलनेने कमी असतो. त्यामुळे बुरशीजन्य रोगांवर होणारा पीक संरक्षणाचा खर्च उन्हाळी हंगामात कमी होतो.

उन्हाळी टोमॅटोवर टुटा अळीचा प्रादुर्भाव अधिक होतो. टुटा अळीशिवाय फुलकिडे, लाल कोळी व फळ पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

त्यासाठी किमान खर्चात पीक संरक्षण करण्यासाठी चिकट सापळ्यांचा वापर केला जातो. तसेच वेळोवेळी निरीक्षणे नोंदवून शिफारशीत कीटकनाशकांचा वापर केला आहे.

टुटा अळीचे नियंत्रण

टोमॅटो पिकावर रोगांच्या तुलनेत टुटा अळीच्या प्रादुर्भावामुळे अधिक नुकसान होते. त्यामुळे पिकाचे सातत्याने निरिक्षण करत आहे. मागील काही दिवसांत टोमॅटो पिकावर प्रामुख्याने टुटा अळीचा प्रादुर्भाव दिसून आला.

अळीच्या नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या आहेत. कीड नियंत्रणासाठी जैविक कीड नियंत्रण पद्धतींवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन चांगले परिणाम मिळतात. त्यामुळे फळांची गुणवत्ता आणि उत्पादकता साधणे शक्य झाले आहे.

शाम धोंडगे, ९८२२८७५००० (शब्दांकन ः मुकुंद पिंगळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com