Farmer Planning: शेतकरी नियोजन पीक : केळी

बेवडसाठी तूर, हळद (Turmeric) आणि कापूस (Cotton) ही पिकेही घेतो. पीक फेरपालटीवर त्यांचा विशेष भर असतो. जमीन मध्यम आणि पाण्याचा निचरा होणारी असून त्या दृष्टीनेच सर्व बाबींचे नियोजन केले जाते.
Banana Fruit
Banana FruitAgrowon
Published on
Updated on

शेतकरीः अतुल मधुकर पाटील

गावः केऱ्हाळे बुद्रूक, ता. रावेर, जि. जळगाव

एकूण क्षेत्रः ५० एकर

नवीन केळी लागवडः २० एकर (३० हजार केळी झाडे)

अतुल मधुकर पाटील यांची केऱ्हाळे बुद्रूक, पिंप्री, मंगरूळ (ता.रावेर, जि. जळगाव) येथे भोकर व अभोळा नदीच्या लाभक्षेत्रात ५० एकर जमीन आहे. त्यापैकी २० एकरांवर नवती केळीची (Banana Cultivation) जूनच्या मध्यात व जुलैमध्ये लागवड केली आहे. साधारण मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन असते. मात्र, यंदा मे महिन्यात रोपांची उपलब्धता न झाल्याने मे मधील लागवड शक्य झाली नाही.

बेवडसाठी तूर, हळद (Turmeric) आणि कापूस (Cotton) ही पिकेही घेतो. पीक फेरपालटीवर त्यांचा विशेष भर असतो. जमीन मध्यम आणि पाण्याचा निचरा होणारी असून त्या दृष्टीनेच सर्व बाबींचे नियोजन केले जाते. निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्याचा अतुल प्रयत्न करतात. केळी बागेच्या लागवडीसाठी जळगाव येथील अखिल भारतीय फळे (केळी) संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतात.

जून महिन्यात साडेपाच एकरांवर साडेआठ हजार तर जुलैमध्ये ६ एकर क्षेत्रावर ९ हजार केळी रोपांची लागवड केली. या महिन्यात ११ एकर क्षेत्रावर १५ हजार रोपांच्या लागवडीचे नियोजन आहे. संपूर्ण लागवडीसाठी ऊतिसंवर्धित रोपे वापरली आहेत. लागवड ६ बाय ५ फूट आणि साडेपाच फूट व ५ फूट अंतरावर गादी वाफा पद्धतीने केली आहे.

लागवडः

- एप्रिल महिन्यात केळी रोपांच्या लागवडीपूर्वी जमिनीची २ वेळा आडवी व उभी खोल नांगरणी करून जमीन भुसभुशीत केली. नांगरटीनंतर मे महिन्यात कडक उन्हामध्ये जमीन तापू दिली.

- लागवडीसाठी दीड फूट उंचीचे गादीवाफे तयार केले. त्यानंतर २० दिवस आधी गादीवाफ्यावर दोन रोपांमध्ये राखावयाच्या अंतरासाठी आखणी करून घेतली.

- प्रति एक हजार झाडांसाठी ४ पोती सिंगर सुपर फॉस्फेट गादीवाफ्यात टाकून घेतले. त्यानंतर मिनी ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरने गादीवाफ्यावरील दाणेदार सुपर फॉस्फेटचे मिश्रण करून घेतले. पुन्हा गादीवाफे व्यवस्थित करून घेतले.

- गादीवाफ्यांवर ठिबकच्या नळ्या अंथरूण घेतल्या. दोन ड्रीपमध्ये सव्वा फूट अंतर राखले आहे. प्रतितास २ लिटर पाणी ड्रीपरद्वारे दिले जाते.

- लागवडीच्या ५ दिवस आधी रोपे आणून ठेवली. त्यानंतर लागवडीपूर्वी रोपांवर बुरशीनाशके व कीटकनाशकांची फवारणी केल्या.

- ठिबकद्वारे गादीवाफे चांगले भिजवून घेतले. त्यानंतर साधारण मजुरांच्या मदतीने रोपांची लागवड केली.

- लागवडीनंतर त्वरित ठिबकद्वारे पाणी दिले. त्यानंतर प्रतिदिन ३ तास याप्रमाणे सिंचन केले.

व्यवस्थापनातील बाबीः

- सध्या जून आणि जुलै महिन्यातील केळी रोपे वाढीच्या अवस्थेत आहे.

- मागील २० दिवसांत २ वेळा बैलजोडीच्या मदतीने आंतरमशागत करून घेतली.

- पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव दिसून येत होता. त्यासाठी मजुरांच्या मदतीने तणनियंत्रण केले. तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर टाळला जातो. कारण रोपांचे नुकसान होण्याची भीती असते.

- सध्या रोपांवर जीवाणूजन्य करपा (इर्व्हिनिया रॉट) रोगाची लक्षणे पानांवर दिसत आहेत. ढगाळ आणि पावसाळी वातावरणामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे रोग नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार फवारणी घेतली. तसेच बागेत कीडनाशके आणि बुरशीनाशकांची आळवणी केली.

- एक हजार झाडांना युरिया १ किलो, पोटॅश १ किलो त्यासोबत १० किलो सल्फर (दाणेदार), झिंक सल्फेट १० किलो आणि १० किलो फेरस सल्फेट ही खते दिले.

- रोपांचे कुकुंबर मोझॅक विषाणूच्या (सीएमव्ही) प्रादुर्भावासाठी बागेचे सातत्याने निरिक्षण करत आहे. सीएमव्हीच्या प्रादुर्भावामुळे बागेचे मोठे नुकसान होते. त्यामुळे दर ८ दिवसांनी प्रतिबंधात्मक फवारणी घेतली.

- मागील १५ दिवसांत पावसात उघडीप होती. त्याकाळात सलग २ दिवस प्रतिदिन २ तास ठिंबकद्वारे सिंचन केले.

- बागेत स्वच्छता राखण्यावर विशेष भर जातो.

पुढील १५ दिवसातील नियोजनः

- या महिन्यात ११ एकर क्षेत्रावर १५ हजार रोपांच्या लागवडीचे नियोजन आहे. त्यानुसार गादीवाफ्यांवर नियोजित अंतरावर रोपांची लागवड केली जाईल.

- पॉवर टिलरच्या साह्याने गादीवाफे माती लावून व्यवस्थित केले जातील.

- वेळापत्रकानुसार रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातील.

- सीएमव्ही च्या प्रादुर्भावासाठी बागेचे सातत्याने निरीक्षण केले जाईल. तसेच प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातील.

- पावसात उघडीप कायम राहिल्यास प्रतिदिन ३ तास सिंचन केले जाईल.

- येत्या काळात केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांना केळी बागेच्या पाहणीसाठी बोलावणार आहे. तज्ज्ञांच्या सूचनेप्रमाणे आवश्यक फवारणी आणि खतांच्या मात्रा ठरविल्या जातील.

- काही ठिकाणच्या मेलेल्या रोपांच्या जागी नांग्या भरून घेतल्या जातील. रोपे लावण्यापूर्वी शिफारशीप्रमाणे बीजप्रक्रिया केली जाईल.

- अतुल पाटील, ९८२२४५१६२१

(सायंकाळी ६ ते ९ वेळेत संपर्क साधावा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com