
Pune News : राज्यात एक व्यक्ती स्वतः कृषी आयुक्त असल्याचे सांगून वावरत असल्याचे निदर्शनास येताच कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर कृषी खात्याने संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
राज्यात तोतया कृषी आयुक्त असल्याची चर्चा चालू होती. मात्र, पुरावे हाती येत नव्हते. पुण्याचे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांच्या पथकाने या प्रकरणी माहिती गोळा करणे सुरू ठेवले होते. गेल्या आठवड्यात त्यांनी हडपसरच्या गाडीतळ भागातील पारख कॅपिटल ३०२ या पत्त्यावर अचानक भेट दिली.
या ठिकाणी प्रशांत अनिल गवळी नावाची व्यक्ती ‘मानद कृषी आयुक्त’ म्हणून वावरत असल्याचे आढळून आले. ‘ऑनररी ॲग्रिकल्चर कमिशनर’ असा उल्लेख असलेला नामफलकदेखील तेथे होता. पुण्याच्या हडपसर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील २०४ कलमान्वये गवळीवर गुन्हा दाखल केला आहे.
‘‘भारतीय प्रशासकीय सेवेतून (आयएएस) कृषी आयुक्त निवडला जातो. गवळी कृषी आयुक्त असल्याचा दावा करत होता. त्यामुळे त्याची सर्व माहिती गोळा करण्यात आली. चौकशी पथकाने त्याच्या कृषी आयुक्ताचा संदर्भ असलेल्या बनावट नामफलकाची छायाचित्रे काढली. समूह माध्यमातदेखील तो स्वतःला कृषी आयुक्त म्हणून मिरवून घेत होता.
यामुळे गवळीकडून राज्यातील शेतकरी तसेच सामान्य नागरिकांची फसवणूक होऊ शकते, असा निष्कर्ष कृषी विभागाने काढला. त्यानंतर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय दिनकर पाटील यांना संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले,” अशी माहिती सूत्रांनी दिली.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस दफ्तरी प्रशांत गवळीच्या पत्त्याची ‘डायरेक्टर, समर्थ क्रॉप केअर लि., पुणे, हडपसर, महाराष्ट्र’ अशी देखील नोंद आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले हे या प्रकरणी तपास करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.