Agricultural Export : बांगलादेशात शेतीमालाची निर्यात ठप्प

Agriculture Products Export Update : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेला व्यापार ठप्प झाला. कापूस, सूत, सोयाबीन, सोयापेंड, कांदा, टोमॅटो, भाजीपाला आणि फळे, मसाले, प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थांची निर्यात थांबली आहे.
Agricultural Export
Agricultural ExportAgrowon
Published on
Updated on

Pune News : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेला व्यापार ठप्प झाला. कापूस, सूत, सोयाबीन, सोयापेंड, कांदा, टोमॅटो, भाजीपाला आणि फळे, मसाले, प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थांची निर्यात थांबली आहे. सीमेवर शेतीमाल घेऊन ट्रक उभे आहेत. त्यामुळे निर्यातदार आणि शेतकऱ्यांचीही चिंता वाढली. शेतीमालाचा व्यापार लवकरच सुरू होईल, असे दोन्ही देशांमधील व्यापारी सांगत आहेत.

भारतातून शेतीमाल निर्याती करण्यात बांगलादेशचा मोठा वाटा आहे. शेजारी आणि वाहतूक सोईस्कर असल्याने भारताचा बांगलादेशसोबतचा व्यापार गेल्या काही वर्षांपासून चांगलाच वाढला. विशेष म्हणजे भारत आयातीपेक्षा बांगलादेशला निर्यात जास्त करतो. २०२३-२४ मध्ये भारताने एकूण १ हजार ११० कोटी डॉलरची निर्यात केली होती. तर १८० कोटी डॉलरची आयात केली होती. भारताच्या निर्यातीत शेतीमालाचा वाटा सर्वाधिक आहे.

भारताने २०२३-२४ मध्ये बांगलादेशला २४२ कोटी डॉलरची शेतीमाल आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात केली होती. कापड निर्यात २१५ कोटी डॉलरची होती. म्हणजेच बांगलादेशसोबतच्या व्यापारात शेती आणि शेतीशी संबंधित वस्तूंचा वाटा जास्त आहे. आयातीचा विचार केला तर भारत बांगलादेशातून कापड आणि तयार कपडे जास्त आयात करतो.

Agricultural Export
Agriculture Export : देशातील पहिली कृषी-निर्यात सुविधा जेएनपीटीत उभारणार

कापसावर काय परिणाम होणार?

भारतातून बांगलादेशला कच्चा कापूस आणि सुताची निर्यात होते. तर बांगलादेशातून तयार कापडाची आयात होते. पण बांगलादेशमधील हिंसाचारामुळे येथील कापड उद्योगही प्रभावित झाला. भारताच्या एकूण कच्च्या कापूस निर्यातीपैकी निम्मा कापूस बांगलादेशला निर्यात होत असतो. पण भारताचा हंगामातील जास्त निर्यातीचा काळ संपला. त्यामुळे बांगलादेशला मागील महिन्यापासून निर्यात कमी होत आहे.

परिणामी, कापूस बाजारावर बांगलादेशची मागणी कमी झाल्याचा परिणाम होणार नाही. तसेच बांगलादेशलाच भारताच्या कापसाची जास्त गरज असते. कारण भारताकडून पाहिजे तेवढ्या प्रमाणात आणि कमी वेळेत कापूस मागवता येतो. अमेरिका आणि ब्राझीलमधून जास्त कापूस मागवला तर परवडते. त्यामुळे बांगलादेश आयात खुली करेल, असे कापूस उद्योजक अविनाश काबरा यांनी सांगितले.

कांदा निर्यातीला अंशतः परवानगी

नाशिक : भारत-बांगलादेश सीमेवर थांबलेल्या कांदा निर्यातीला अखेर ३० तासांनंतर मंगळवारी (ता. ६) मध्यरात्री अंशतः परवानगी मिळाली आहे. कांद्याशिवाय फळे भाजीपाला यांची काही प्रमाणात निर्यात सुरू झाली आहे. मात्र यापूर्वी जारी झालेल्या लेटर ऑफ क्रेडिटच्या अनुषंगाने ही वाहने सोडण्यात आली आहे. नवीन मागणी व त्यासाठी नवीन लेटर ऑफ क्रेडिट निर्यातदारांना मिळालेले नाही. त्यामुळे तूर्त निर्यात ठप्प आहे. इंटरनेट सेवा अद्याप पूर्णतः सुरळीत नाही. तीन दिवसांत बँकिंग सेवा सुरळीत होऊन व्यवहार पूर्ववत होतील, असे बोलले जात आहे.

Agricultural Export
Agriculture Export Ban : एकवेळ किसान सन्मान निधी परत घ्या, पण निर्यातबंदी उठवा !
कापूस निर्यात आधीच होऊन गेली. सध्या निर्यातीचा ऑफ सीझन आहे. त्यामुळे बांगलादेशातील परिस्थितीचा भारताच्या कापूस निर्यातीवर परिणाम होणार नाही.
अतुल गणात्रा, अध्यक्ष, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
बांगलादेशात कापड निर्मिती ठप्प झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी भारताकडे येईल. पण कापूस आणि सूत निर्यात थांबल्याचा सध्या परिणाम जाणवत नाही. मात्र नव्या हंगामाच्या तोंडावर ही परिस्थिती किती दिवसांत पूर्वपदावर येते, हेही महत्त्वाचे आहे.
अविनाश काबरा, कापूस उद्योजक, जळगाव
बांगलादेशमधील परिस्थितीचा सध्यातरी परिणाम देशातील सोयाबीन बाजारावर जाणवत नाही. कारण आधीच निर्यात चांगली झाली. सध्या देशात मागणी सुधारत आहे.
सचिन अगरवाल, सोयाबीन प्रक्रियादार आणि निर्यातदार
सध्या दोन्ही देशांमधील शेतीमालाचा व्यापार ठप्प झाला आहे. बांगलादेशातील सरकार ही परिस्थिती किती दिवसांमध्ये बदलते हे महत्त्वाचे आहे. जास्त काळ हा तणाव राहीला तर निश्चितच बाजारावर याचे पडसाद दिसायला लागतील.
अजय केडिया, शेतीमाल बाजार अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com