Jambhul Cultivation: प्रत्येक गाव बहाडोली व्हावे

Jambhul Health Benefits : आज जांभूळ फळामुळे बहाडोली गावाला चांगलीच समृद्धी आली आहे. या फळाला दरही चांगला मिळत आहे. मधुमेह नियंत्रण, रक्तदाब आणि लोह कमतरतेवर प्रभावी असलेले हे फळ अनेक औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे.
Jambhul Season
Jambhul SeasonAgrowon

Orchard Management : काही मोजकी गावे, तालुके, जिल्हे एवढेच काय पण राज्यांना सुद्धा कृषी आणि फळबाग उत्पादनात स्वतःची खास ओळख असते. अर्थात, यासाठी तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थिती कारणीभूत असते.

यामध्ये हवा, मातीची प्रत, सभोवतालचे जंगल, पाऊस-पाणी आणि सर्वांत म्हणजे तेथील शेतकरी आणि उत्पादकांनी त्या फळासाठी, धान्यासाठी जपलेली त्यांची निष्ठा! म्हणूनच कोकणचा हापूस आजही तेथील जांभा दगड आणि वाहणारा खारा वारा यास सकारात्मक साद देत जिवंत आहे.

असाच प्रकार घोलवडच्या चिकूचा! तेथील शेकडो चिक्कूच्या बागांमधील हजारो वृक्षांचे उत्पादन आज ५० टक्केसुद्धा नाही तरीही चिकू उत्पादक शेतकरी ब्रिटिश काळापासून जोपासलेल्या या बागांची आजही काळजी घेत आहेत.

सध्याच्या वातावरण बदलाचे सर्वांत जास्त चटके शेतकऱ्यांना बसत आहेत. कर्ब आणि मिथेन वायू निर्मितीमध्ये अर्थात त्यांचाही सहभाग आहे. यावर उपाय म्हणून आपण वृक्ष लागवडीची सूचना करतो, त्यात शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था भाग घेतात, झाडांची संख्या लाखातून कोटीवर उड्या घेते, प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला, की त्याच त्या खड्ड्यांचे पुन्हा पुन्हा बारसे होते.

मात्र वृक्ष काही तेथे आढळत नाहीत. संगमनेर तालुक्यामधील एक गाव ‘तिगाव’ जेथे मला गावच्या लोकसंख्येच्या अनेक पटीत वृक्ष आढळले. थोडक्यात गावचे नेतृत्व सक्षम असेल तर त्या गावात घनदाट वृक्ष सावली का नाही तयार होणार? असेच एक पालघर जिल्ह्यामधील बहाडोली गाव. येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या भात शेतीला पर्याय म्हणून जांभूळ वृक्ष लागवड केली.

आज या लहान गावात लोकसंख्येच्या चारपट म्हणजे तब्बल सहा हजार झाडे आहेत. कृषी क्षेत्रात एखाद्या पिकाचा त्याग केल्यावर त्यांना त्याजागी दुसऱ्या पिकाचाच पर्याय स्वीकारणे आवश्यक असते. मात्र तो शाश्‍वत आणि पर्यावरणास पूरक हवा.

Jambhul Season
Jambhul Farming : जांभूळ शेतीतून समृद्धीकडे वाटचाल

आपण शेकडो पारंपरिक पिकांचा आणि त्याच बरोबर सेंद्रिय शेतीचा त्याग करून रासायनिक खतांचे तृप्त भोजन आणि त्यासोबत पाण्याचे भांडे रिकामे करून ढेकर देणारी सोयाबीन, कापूस, उसासारखी पिके निवडली आणि पर्यावरणाचा समतोल बिघडविण्यात मोलाचा सहभाग नोंदवला.

असाच प्रकार केरळचा! ऐके काळी भारताचे भाताचे कोठार असलेल्या या राज्याने केवळ मजूर मिळत नाहीत म्हणून भात शेतीला मोठ्या प्रमाणावर तिलांजली दिली, शेतजमिनी विकसकांना विकून टाकल्या, पर्यावरण बिघडले. आज या राज्याला तेलंगणामधून भात पाठवला जातो.

या दोन उदाहरणांच्या तुलनेत बहाडोलीने भात पिकास उपजीविकेपर्यंत मर्यादित ठेवून उरलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर जांभूळ वृक्ष लागवड केली.

कोकण कृषी विद्यापीठाने येथील स्थानिक पण दुर्लक्षित जांभूळ वृक्ष, त्यांचा बहर, फळांचा आकार, रस, स्वाद यांचा सविस्तर अभ्यास करून बहाडोली ही नवीन संकरित जात निर्माण केली. या जातीची याच गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर लागवड करून गावकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून दिला.

बहाडोली आणि त्या परिसरामधील अनेक गावांमध्ये जांभूळ वृक्ष वाढीसाठी अतिशय पोषक वातावरण आहे, म्हणूनच ही यशोगाथा येथे फुलली आहे.

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे पालघर येथे अद्ययावत संशोधन केंद्र आहे. या केंद्रातच येथील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नामधून हजारो बहाडोली रोपांची निर्मिती झाली आणि अतिशय अल्प किमतीत ती आदिवासी शेतकऱ्यापर्यंत पोहोचली सुद्धा! मी स्वतः या केंद्रास भेट देऊन तेथील शास्त्रज्ञांशी चर्चा केली आणि शेकडो बहाडोली आणि केसर आंब्याची रोपे खरेदी करून 'कावळे' या आदिवासी गावांमधील चाळीसपेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा या प्रमाणे ती वाटली.

चार वर्षांपूर्वीच्या या प्रयत्नास आज चांगलेच यश प्राप्त झाले आहे. पालघर जिल्ह्याचा हा गुजरात सीमेपर्यंतचा पट्टा जांभूळ आणि केसर आंब्यासाठी खूपच पोषक आहे. पावसाळ्यात भात आणि नागलीचे पोटापुरते पीक घेऊन आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात रब्बी आणि उन्हाळ्यात वीट भट्ट्यांवर काम करण्यास लहान मुलाबाळांसह स्थलांतरित होतात.

कारण तेथील पश्‍चिम घाटामधील जंगलात त्यांना उपजीविकेसाठी काहीही साधन उरलेले नाही. स्थलांतर हे बालकांच्या कुपोषणाचे मुख्य कारण आहे. आदिवासींचे स्थलांतर आणि त्यांच्या मुलांचे कुपोषण थांबवावयाचे असेल तर या भागात जांभूळ आणि केसर आंब्यास जास्त प्राधान्य देणे गरजेचे आहे.

डिसेंबर, जानेवारीत जांभळास मोहर येतो आणि मे, जूनमध्ये ही झाडे काळ्या मोठ्या टपोऱ्या जांभळाच्या घोसाने लगडून जातात. बहाडोलीला ही पिकलेली जांभळे झाडावरून हळुवार पद्धतीने काढून, खोक्यात पॅक करून नंतर मुंबई, पुणे, बंगलोर आणि दिल्लीपर्यंत जातात. एक झाड प्रत्येक ऋतूमध्ये अंदाजे चाळीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न देते.

शेतकऱ्याची स्वतःच्या मालकीची दहा ते वीस झाडे असतील तर यातून त्यांना चांगले अर्थार्जन होते. जे भात आणि नाचणीमधून कधीही शक्य नव्हते. आज जांभूळ फळामुळे बहाडोली गावाला चांगलीच समृद्धी आली आहे.

मला आठवते, लहानपणी माझ्या गावी ५-६ मोठमोठी जांभळाची झाडे होती. त्यातील दोन जांभळाची झाडे तर आमच्याच शेतात होती. त्या झाडांची जांभळे गावामध्ये कोणासही खाण्यास परवानगी होती. आता एप्रिल, मेमध्ये जांभळे बाजारात येणे हा वातावरण बदलाचा चमत्कार आहे.

रोज सकाळीच पिशवीभर जांभळे घरी येऊन सर्वांना वाटत राहणे हा माझा नित्याचा उपक्रम, पण आता जांभळाची किंमत पाहिली की छातीत धडकीच भरते. परवाच ५० रुपयांत ५ मोठी टपोरी जांभळे मी घरी औषध म्हणून आणली आणि हरवलेले बालपण पुन्हा आठवले.

Jambhul Season
Food Processing : शेंगालाडू ते जांभूळ, डाळिंब, आवळा सिरप; पंढरपूरच्या तरूणाचे प्रक्रिया उद्योगात यश

पाऊस अनियमित झाल्यामुळे जांभळास टपटप जमिनीवर पडावे लागते. अशी फुटलेली फळे रस निर्मितीसाठी आणि त्यांच्या बिया वाळवून त्याचे चूर्ण करण्यासाठी वापरतात. ही दोनही उत्पादने औषधी आहेत. बहाडोलीमध्ये काही शेतकऱ्यांनी आता या उद्योगामध्ये सुद्धा प्रवेश केला आहे ही आनंदाची बातमी आहे.

जांभूळ हा दीर्घायुषी डेरेदार वृक्ष आहे. जांभूळ फळ निर्मितीमध्ये मधमाश्यांचा फार मोठा सहभाग आहे. येथील शेतकऱ्यांनी जांभूळ वृक्ष संगोपन, फळ उत्पादन, त्याची विक्री, जांभूळ रस आणि बियांचे चूर्ण याबरोबरच मधमाश्यापालन सुद्धा मोठ्या प्रमाणावर करणे गरजेचे आहे. संशोधनामधून सिद्ध झाले आहे की ज्या जागी भरपूर मधमाश्या असतात तेथे फुलांना जास्त बहर येतो.

बहाडोली जांभूळ, बहाडोली मध आणि यास जोडून बहाडोली पर्यटन करता आले तर हे छोटे गाव जांभळांच्या वृक्षामुळे भारतामध्येच काय पण जगाच्या नकाशावर सुद्धा येऊ शकते. आपण फक्त बहाडोली आणि त्याच्या लगतच्या खामलोलीपर्यंतच थांबावयाचे काय? निश्‍चितच नाही. त्या परिसरात आज शेकडो गावे आहेत.

आज ही सर्व गावे बहाडोली सहज होऊ शकतात आणि तसे झाले तर ती फक्त पर्यावरणाचीच सेवा होणार नाही तर त्याचबरोबर आर्थिक सुबत्ता, स्थानिकांच्या आहाराचे पोषणमूल्य वाढवणारे आणि त्याचबरोबर स्थलांतर थांबणारे सुद्धा ठरणार आहे.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com