
Nashik Election News : एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लांबणीवर गेले आहेत तर प्रतीक्षेनंतर बाजार समितीच्या निवडणुका जिल्ह्यात नुकताच पार पडल्या. त्यामध्ये निवडणुका लांबल्याने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या माजी सदस्यांनी जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणूक रिंगणात उड्या घेतल्याचे दिसून आले. यात माजी सदस्यांनी बाजी मारली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका गत सव्वा वर्षापासून लांबणीवर पडलेल्या आहेत. या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले अनेक माजी सदस्य बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात उतरत नशीब अजमावीत होते.
जिल्ह्यात झालेल्या १४ बाजार समितीत जवळपास जिल्हा परिषदेचे १८ माजी सदस्य रिंगणात होते. मात्र या निवडणुकीत मोजक्या सदस्यांचा पराभव झाला. मात्र अनेकांना यश प्राप्त झाले आहे.
यामध्ये पिंपळगाव बसवंत बाजार समितीत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अमृता पवार विजयी झाल्या आहेत. येथूनच अपक्ष म्हणून यतीन कदम यांनी बाजी मारली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी लासलगाव बाजार समितीत हॅट्ट्रिक साधली आहे. येथूनच माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी सदस्य डी. के. जगताप यांनी विजय प्राप्त केला आहे.
जिल्हा परिषदेतील भाजपचे माजी गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड दोघेही वेगवेगळ्या पॅनेलकडून विजयी झाले आहेत.
माजी कृषी सभापती संजय बनकरांना येवल्यातून मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे. येथे माजी सदस्या सविता पवार यांना यंदा संधी मिळाली आहे.
देवळा बाजार समितीत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या धनश्री आहेर यांनी बिनविरोध निवडून येत बाजी मारली होती.
दिंडोरी बाजार समितीत माजी सदस्य तथा मविप्रचे संचालक प्रवीण जाधव आणि पंचायत समिती माजी सदस्य श्याम बोडके, कळवण बाजार समितीत माजी सभापती रवींद्र देवरे आणि यशवंत गवळी, घोटी बाजार समितीत नेतृत्व करत असलेले माजी सदस्य तथा मविप्रचे संचालक संदीप गुळवे, हरिदास लोहकरे विजयी झालेले आहेत.
नाशिक बाजार समितीत माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे, माजी सदस्य भास्कर गावित, विनायक माळेकर विजयी झाले आहेत. माजी सभापती दिलीप थेटे, माजी सदस्य उदय जाधव पराभूत झाले आहेत.
नाशिक बाजार समितीत माजी सभापती शिवाजी चुंभळे व त्यांची पत्नी माजी नगरसेविका कल्पना चुंभळे विजयी झाल्या आहेत. तर लासलगाव बाजार समितीत गत पंचवार्षिकमध्ये सुवर्णा जगताप यांनी सभापती म्हणून काम केले होते.
यंदाच्या पंचवार्षिकमध्ये त्या आणि त्यांचे पती तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी. के. जगताप या पती-पत्नींनी बाजी मारली आहे.
दोन माजी आमदारही विजयी
बाजार समितीच्या रिंगणात विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनी पिंपळगावमध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे. येथूनच माजी आमदार अनिल कदम प्रथमच निवडून आले आहेत. चांदवडमध्ये माजी आमदार शिरीष कोतवाल पुन्हा विजयी झाले आहेत. कदम, कोतवाल दोघेही जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देखील आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.