डॉ. आनंद नाडकर्णी
Dr. Anand Nadkarni Article : ‘सकारात्मक दृष्टिकोन’ ही संज्ञा आजकाल आपण वारंवार ऐकतो. आपल्या पेशानुसार आपल्या कामाबद्दल आपला दृष्टिकोन कसा असावा? शिक्षकाचा दृष्टिकोन ज्ञानदानाचा, वैज्ञानिकाचा संशोधक वृत्तीचा, नर्सचा सेवाभावनेचा दृष्टिकोन असावा.
हा दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय असतं? दृष्टिकोन किंवा मानसिकता असं आपण म्हणतो तेव्हा आपल्याला अपेक्षित असणारा किंवा अनुभवाला येणारा त्या व्यक्तीच्या विचार, भावना आणि वर्तनाचा एक ठरावीक साचा आपण पाहत असतो. एखाद्या घटनेकडे, कामाकडे किंवा इतर व्यक्तींशी संभाषण करताना मी कसा वागतो, कसा विचार करतो याचा वारंवार दिसणारा साचा म्हणजे माझी मानसिकता.
कसे घडत जातात हे दृष्टिकोन?
काही दृष्टिकोन आपल्या जवळच्या व्यक्तींच्या अनुभवातून, त्यांनी आपल्याला दिलेल्या शिकवणुकीतून तयार झालेले असतात. आपण ते त्यांच्याकडून जसेच्या तसे स्वीकारतो. ही झाली आपली संस्कारांची मिळकत आणि त्यातून आलेला दृष्टिकोन. प्रतिप्रश्न न करता, तपासून न बघता थेट स्वीकारलेला हा दृष्टिकोन असतो.
उदा. भाऊबंदकीतल्या एखाद्या व्यक्ती किंवा कुटुंबविषयी, “ते लोक चांगले नाहीत, उद्धटपणा करतात, लुबडायला बघतात” असं मला माझ्या आई-वडिलांनी सांगितलं आणि मी त्याच पद्धतीने विचार करत असेन तर हा माझ्या मिळकतीतून मिळालेला दृष्टिकोन असतो.
दुसरीकडे, मी मोठा होत जाताना, मला जे अनुभवायला मिळतं त्यातून माझे काही विचार पक्के होत जातात, साचे बनतात, दृष्टिकोन बनतात. हा झाला माझ्या वैयक्तिक अनुभवातून बनलेला दृष्टिकोन.
उदा. भाऊबंदकीत वैर असलेल्या त्याच कुटुंबाशी काही कारणाने माझा संबंध येतो, आणि मला काही वेगळाच अनुभव येतो. ती व्यक्ती माझ्याशी चांगली वागते, सहकार्य करते, लुबडण्याचा हेतू मला अजिबात वाटत नाही. इथे माझ्या अनुभवातून बनतो आहे तो दृष्टिकोन, मिळकतीच्या दृष्टिकोनापेक्षा अगदीच वेगळा असतो.
माझा दृष्टिकोन मी कसा निवडावा?
आपले दृष्टिकोन बदलायच्या काही चाचण्या / पायऱ्या आहेत. (आकृती २)
- अनुभवसिद्ध आणि मिळकतीतून आलेला दृष्टिकोन यात तफावत असेल तर मी स्वत:ची एक चाळणी लावेन.
- मी अनुभव व मिळकत या दोघांची सांगड घालेन व माझं मत बनवेन.
- हे मत एककल्ली असणार नाही. समतोल राखला जाईल.
आपला दृष्टिकोन किंवा मानसिकता समजून घ्यायची आणि बदलायची तर आपल्याला आपल्या स्वगताची जाण आणि निरीक्षण यांचा फायदा होणार आहे. स्वगताचे निरीक्षण आणि परीक्षण करण्यासाठी उपयुक्त अशी चार खिडक्यांची एक रचना आपण बघूया.
१ शब्देविण संवादु
- मनात स्वगत होत आहे, मात्र प्रत्यक्ष संवाद / उच्चार नाही.
- दोन व्यक्ती आपापसांत बोलत नाहीत; परंतु दोघांचाही स्वत:शी संवाद चालू आहे.
- प्रत्यक्षात संवाद नाही परंतु देहबोलीतून, डोळ्यातून ते स्वत: व्यक्त होत आहेत व दुसऱ्याचीही भाषा समजून घेत आहेत.
- हिंदी चित्रपटातल्या अनेक गाण्यांत आपल्याला हे अनुभवता येते.
२. पोटात एक ओठावर भलतेच
- काही वेळा मनात आलेलं आणि प्रत्यक्ष बोललेले शब्द अगदी परस्परविरोधी असतात.
- स्वगत थोडं थोडकं नव्हे तर पार बदलून व्यक्त केलं जातं.
- आरामाच्या वेळी एखादा नकोसा पाहुणा आला की मनात असतो वैताग; पण प्रत्यक्षात आपण हसून आगतस्वागत करतो व त्याच्या येण्याने किती आनंद झाला असं सांगतो.
३. जे पोटात तेच ओठावर
- जे मनात आहे तेच मी / समोरची व्यक्ती बोलत आहे.
- बोलण्याआधी कुठलाही फेरफार / संस्कार त्या स्वगतावर केलेला नाही.
- अतिशय जवळच्या व्यक्तीशी बोलताना किंवा अतिशय राग आला, की आपण पुढचं मागचं न बघता, जे मनात येईल ते बोलून टाकतो, नाही का?
४ पोटात एक ओठात एक
- मनात आलेलं तसंच्या तसं बोलणं ठीक नाही (अडचणी वाढतील, समोरची व्यक्ती दुखावली जाईल) हे लक्षात येतं आणि स्वगत थोडं बदलून व्यक्त केलं जातं.
- कधी कधी मुद्दाम खोचकपणे, उपरोधाने मनात आहे त्याहून वेगळे बोलले जाते.
- बहुतेक वेळा आपण आपल्या स्वगतावर ही अशी प्रक्रिया करून मगच बोलत असतो. मात्र हे करतानाचा आपला हेतू स्वार्थी आहे की चांगला हे तपासून बघायला हवं.
आपले स्वगत व्यक्त करताना, मनातले विचार उच्चारताना आपण आणि समोरची व्यक्ती, आपण सगळेच या चारही खिडक्या आलटून पालटून वापरत असतो. स्वगताची आणि त्यामागच्या दृष्टिकोनाची जाण वाढवायची, अभ्यास करायचा तर ‘आता नेमक्या कुठल्या खिडकीतून हा संवाद होत आहे?' याबद्दल आपलं निरीक्षण वाढवायला हवं.
तुम्ही म्हणाल, मनात एक आणि ओठावर एक असं म्हणताय की काय? आपण तसंही कधी कधी करत असतो, नाही का? मग असा प्रश्न येतो की विचार आणि उच्चार यात अंतर असेल तर त्याला चातुर्य म्हणायचं की चालूपणा? दोन्हींमध्ये काय फरक आहे ते बघू या.
चातुर्य
- मनात केवळ स्वार्थ नाही तर इतरांबद्दल सद्हेतू असतो.
- विचारांची आणि भावनांची जाण असते.
- ध्येयाकडे जायला उपयुक्त असा दृष्टिकोन असतो
- दूर पल्ल्याची उद्दिष्टे (long term goals) गाठायची तर चातुर्य हवेच.
चालूपणा
- मतलबी हेतू, फक्त स्वत:च्या भल्याचा विचार असतो.
- माझे ध्येय मी काहीही करून साध्य करेन असा संकुचित दृष्टिकोन असतो.
- तात्पुरता फायद्याचा वाटला तरी दीर्घ काळाचा विचार करता चालूपणा फायद्याचा नाही.
शेतकऱ्यांची मानसिकता
आता थोडं शेतकऱ्यांच्या मानसिकतेबद्दल. हवामानाची अनिश्चितता, शेतीचे नुकसान, कर्जाचा डोंगर, पिकावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव, मालाला उठाव नसणे, भाव गडगडणे... शेतकऱ्यांच्या समस्यांची यादी अशी वाढतच जाईल.
यातले एक किंवा अनेक कारणे एकत्र आली की काही वेळा शेतकरी अगदी हतबल होतो. निराशा दाटून येते. आत्मविश्वास संपतो. कधी कधी तो आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो.
शेतकरी आत्महत्यांबद्दल नेहमी बोललं, लिहिलं जातं. पण शेतकरी जीव का देतात? सगळी परिस्थिती जेव्हा विरोधात जाते, अतिशय बिकट होऊन जाते, तेव्हा नैराश्य येतं, मनोबल कमी पडतं म्हणून. अशा वेळी परिस्थिती सुधारायची वाट बघतानाच युक्तीचं बळ अधिक व योग्य प्रमाणात वापरलं आणि वैयक्तिक व समूहाची युक्ती आणि शक्ती एकत्रित आणली तर येणाऱ्या संकटांना शेतकरी अधिक सक्षमपणे तोंड देऊ शकतील.
अवकाळाला अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतील. दृष्टिकोन विवेकी आणि सकारात्मक करण्यासाठी आपल्यातील दोषांचे / ध्येयापासून दूर नेणाऱ्या विचारांचे तण उपटून टाकून, चांगल्या विचारांचे बियाणे आपल्या मनाच्या भूमीत रुजवायचा प्रयत्न सातत्याने व्हायला हवा.
या लेखमालेत हळूहळू आपण उद्योजक शेतकऱ्याची वैशिष्ट्ये उलगडणार आहोत. उद्योजक शेतकरी सुवर्णमध्य शोधतो, समतोल साधतो. उद्योजक स्वतःच्या फायद्याबरोबर दुसऱ्याचा फायदा जोडतो. जेव्हा माणसाला ज्ञान मिळतं तेव्हा त्याचा दृष्टिकोन एकांगी राहत नाही.
समतोल साधणारा विचार शेतकऱ्याला सापडेल तेव्हाच त्याच्यातला उद्योजक जागा होईल. समतोल साधणाऱ्या शेतकऱ्यांची फळी निर्माण करायची आहे आणि त्यासाठी सर्वांचे पोषक दृष्टिकोन एकमेकांसाठी मिळते जुळते असणं महत्त्वाचं आहे.
संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी
kartashetkari@gmail.com
आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –
https://www.youtube.com/watch?v=6qisGiafSLM
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.