आज जागतिक पर्यावरण दिन. महाराष्ट्रात जंगलाखालील क्षेत्र फक्त १६.५ टक्के इतके आहे. मात्र ते अधिक असणे आवश्यक आहे. जगभरात हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम दिसत आहे. हवामान बदलाचे परिणाम मॉन्सूनच्या आगमनापासून ते वितरणापर्यंत होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. हवेमध्ये वाढत चाललेल्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल असे परिणाम दिसून येत आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिक क्षेत्रावर वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे.
पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावाने वाऱ्याची दिशा अद्यापही वायव्येकडून राहण्यामुळे मॉन्सूनच्या प्रगतीत अडथळे निर्माण होत आहेत. जून महिन्यात वारे प्रामुख्याने नैर्ऋत्येकडून वारे वाहणे अपेक्षित असताना ते वायव्येकडून वाहत आहेत. मराठवाडा व पश्चिम विदर्भात वाऱ्याचा ताशी वेग वाढत आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग वाढत आहे. मात्र कोकण व पूर्व विदर्भात तो सर्वसाधारणच आहे.
सध्या ढगांच्या प्रमाणातही अपेक्षित वाढ नसल्याने पावसाचे प्रमाणही कमी आहे. चांगल्या पावसासाठी मुख्यतः महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होणे गरजेचे आहे. मात्र या सर्व बाबी नैसर्गिक आहेत. यात सुधारणा होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. त्यासाठी येत्या मॉन्सून हंगामात अधिक क्षेत्रावर वृक्ष लागवडीचा प्रयत्न करूयात.
कोकण ः
कमाल तापमान रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ३६ ते ३७ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३९ ते ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ८७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ कि.मी. आणि दिशा वायव्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र ः
कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ४२ ते ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे, नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत २७ ते २८ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ७४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १७ ते २५ टक्के राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून, तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
मराठवाडा ः
उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस, तर लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस राहील. हा आठवडादेखील थोडा उष्ण तापमानाचा राहील. किमान तापमान औरंगाबाद जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, बीड, जालना जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २१ ते २६ टक्के, तर उस्मानाबाद, बीड व जालना जिल्ह्यांत ३२ ते ३५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १९ ते २९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ ः
बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २३ ते ३८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २४ ते २८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मध्य विदर्भ ः
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ५ कि.मी. राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १५ ते १८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते १० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १८ ते २५ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
पूर्व विदर्भ ः
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १६ ते ३१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते ८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे सकाळी व दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १३ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून, गडचिरोली जिल्ह्यात आग्नेयेकडून तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र ः
कमाल तापमान कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत ३८ ते ३९ अंश सेल्सिअस, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सोलापूर व नगर जिल्ह्यांत ५० ते ६० टक्के तर सातारा, पुणे, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ७० ते ८६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १७ ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते २८ कि.मी. आणि दिशा वायव्येकडून राहील. हवामान कोरडे राहील.
कृषी सल्ला ः
- धूळवाफ पेरणी करणे टाळावे. जमिनीत ६५ मि.मी. ओलावा झाल्याशिवाय पेरणी करू नये.
- सोयाबीनची पेरणी रुंद वरंबा व सरी पद्धतीने करावी.
- फळबाग लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करा.
- पावसाळ्यापूर्वी जनावरांना रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.