Orange Farming : आंबिया बहरातील उत्पादनावर भर

Article by Vinod Ingole : काटोल हे तालुक्‍याचे ठिकाण असून ७५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथील बी. कॉमपर्यंत शिक्षण घेतलेल्या गोपाल द्वारकाप्रसाद गुप्ता यांची २५ एकर शेती आहे. वडिलांकडून गोपाल यांनी फळबाग व्यवस्थापनातील बारकावे जाणून घेतले. त्यानुसार संत्रा, मोसंबी बागेतील कामे स्वतः करण्यास सुरुवात केली.
Orange Farming
Orange FarmingAgrowon
Published on
Updated on

Orange Orchard Management :

शेतकरी नियोजन

पीक : संत्रा

शेतकरी : गोपाल द्वारकाप्रसाद गुप्ता

गाव : काटोल, ता. काटोल, जि. नागपूर

एकूण शेती : २५ एकर

संत्रा लागवड : १७ एकर (१८०० झाडे)

मोसंबी लागवड : ५ एकर (५०० झाडे)

काटोल हे तालुक्‍याचे ठिकाण असून ७५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथील बी. कॉमपर्यंत शिक्षण घेतलेल्या गोपाल द्वारकाप्रसाद गुप्ता यांची २५ एकर शेती आहे. शिक्षण घेतल्यानंतर शेतीची आवड असल्याने शेतीमध्येच काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तत्पूर्वी गोपाल यांचे वडील द्वारकाप्रसाद यांनी संत्रा, मोसंबी बागेचे व्यवस्थापन करत होते.

वडिलांकडून गोपाल यांनी फळबाग व्यवस्थापनातील बारकावे जाणून घेतले. त्यानुसार संत्रा, मोसंबी बागेतील कामे स्वतः करण्यास सुरुवात केली. घरच्या २५ एकर शेतीच्या जोडीला काका (कै.) शेखर गुप्ता ११ एकर तसेच बहिणीच्या मालकीची ११ एकर अशा सुमारे २२ एकर शेतीचे व्यवस्थापन देखील त्यांनी करण्यास सुरुवात केली.

जमीन काळी तसेच भारी प्रकारची आहे. त्यामुळेच या भागातील जमिनीला हत्तीचे मस्तक असेही गमतीने म्हणतात. या प्रकारची जमीन संत्रा, मोसंबी पिकाला पोषक नसली तरी या भागातील मुख्य पीक म्हणून संत्रा, मोसंबी घेण्यावर भर दिला आहे. सध्या त्यांच्याकडे संत्र्यांची १७ एकरांत सुमारे १८८ झाडे तर मोसंबीची ५ एकरांवर ५०० झाडे आहे. संत्रा लागवडीत आंबिया बहरातील उत्पादन घेण्यावर त्यांचा भर असतो.

Orange Farming
Orange Farming : संत्रा उत्पादकता, गुणवत्ता वाढीसाठी पुढाकार घ्या ः डवले

संत्रा लागवड

सुमारे १७ एकरांत तीन वेगवेगळ्या पद्धतीने संत्रा लागवड केली आहे. त्यात २० बाय २० फूट आणि २० बाय १५ फूट अंतरावर प्रत्येकी ८०० झाडे तर १८ बाय १८ फुटांवर २० झाडांची लागवड केली आहे. २० बाय २० फुटांवरील लागवड ही २५ वर्षे जुनी, २० बाय १५ फुटांची लागवड १२ वर्षे जुनी तर १८ बाय १८ फुटांवरील लागवड ही १५ वर्षे जुनी आहे. याशिवाय मोसंबी बागेची १८ बाय १८ फूट अंतरावर १२ वर्षे जुनी ५०० झाडे आहेत.

ठिबकद्वारे सिंचनावर भर

सुरुवातीच्या काळात बागेत दांडाने पाणी देण्यावर भर दिला होता. मात्र आता आठवड्यातील एक दिवसच दांड पद्धतीने पाणी दिले जाते. आणि ठिबकने पाणी देण्यात सातत्य राखले आहे. त्यासाठी इनलाईन ड्रीपरच्या वापरावर भर दिला आहे. ठिबक सिंचन पद्धतीमुळे कमी पाण्यात, कमी मजुरांच्या बळावर जास्त क्षेत्रावर एकाचवेळी एकसमान पद्धतीने सिंचन करणे सोयीचे झाल्याचे गोपालराव सांगतात.

खत व्यवस्थापन

आंबिया बहारासाठी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बाग ताणावर सोडली जाते. हा ताण साधारण जानेवारी महिन्याच्या मध्यात तोडला जातो. ताण कालावधीत बागेत विविध कामे करण्यावर भर दिला जातो.

वर्षातून दोन वेळा बागेत रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस १२ः३२ः१६ हे खत बाग फुलांवर येण्यासाठी दिली जाते. जून महिन्यात १०ः२६ः२६ किंवा सिंगल सुपर फॉस्फेट एकरी एक पोते सोबत अर्धा पोते पोटॅश यांच्या मात्रा दिल्या जातात. यामुळे संत्रा फळांचा दर्जा सुधारण्यास मदत होते. उर्वरित विद्राव्य खतांची मात्रा ठिबकद्वारे देण्यावर भर दिला जातो.

सुमारे २५ एकरांतील लागवडीस ५० ट्रॉली शेणखताची गरज राहते. त्यामुळे आर्थिक बाबींचा विचार करून त्यानुसार पैशांच्या उपलब्धतेनुसार शेणखत वापरण्याचा निर्णय घेतला जातो. सध्या प्रति ट्रॉली ३५०० रुपये असा शेणखताचा दर आहे. गोपाल गुप्ता यांच्याकडील गोठ्यात सध्या १४ जनावरे आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या शेणखताचा वापर शेतीमध्ये केला जातो. त्यानंतर उर्वरित लागवडीस देण्यासाठी शेणखताची खरेदी करून दिली जाते. दोन ते तीन वर्षातून एकदा शेणखताची मात्रा दिली जाते.

Orange Farming
Orange Farming : आंबिया बहरामध्ये सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

मागील दहा दिवसांतील कामकाज

कॅल्शिअम नायट्रेट व युरिया यांच्या मात्रा ड्रीपद्वारे दिल्या आहेत. तापमान वाढीमध्ये झाडांना नत्रयुक्त खतांची मात्रा कमी पडल्यास फळगळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ड्रीपच्या माध्यमातून नत्र खताचा पुरवठा केला आहे.

मागील काही दिवसांपासून तापमान चांगलीच वाढ झाली आहे. याचा झाडांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यासाठी सिंचन आणि खत व्यवस्थापनावर विशेष भर दिला आहे.

तापमानाचा अंदाज घेऊन आठवड्यातून एक वेळ दांड पद्धतीने, तर २ वेळा ड्रीपद्वारे २ तास सिंचन करण्यावर भर दिला आहे. याकामी ‘वेदर स्टेशन’वरून मिळणाऱ्या अंदाजाची मदत घेतली जाते.

आगामी नियोजन

सध्या झाडांवर असलेल्या लहान आकाराच्या फळांची गळ होत आहे. गळ रोखण्यासाठी शिफारशीनुसार रासायनिक फवारणी घेणार आहे.

बागेत फूलकिडे आणि कोळी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिफारशीत घटकांची फवारणी केली जाईल.तण नियंत्रणासाठी रोटाव्हेटर फिरवला जाईल.

ठिबकद्वारे १३ः४०ः१३ या खताची मात्रा दिली जाईल. त्यानंतर १५ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जाईल.

गोपाल गुप्ता, ९४२२८०६२७८

(शब्दांकन : विनोद इंगोले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com