
ॲग्रोवन वृत्तसेवा
बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Devendra Fadanvis : मुंबई : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आझाद मैदानावर बुधवारी (ता. १२) जोरदार आंदोलन केले. त्याच वेळी विधान परिषदेत स्थगन प्रस्तावाद्वारे या महामार्गाबाबत सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र हा महामार्ग पूर्ण करायचा आहे हे सरकारचे धोरण स्पष्ट असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
तसेच आझाद मैदानात जेवढे शेतकरी विरोध करण्यासाठी आले आहेत, त्यापेक्षा तिप्पट शेतकरी समर्थनासाठी मेळावा घेणार आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना सांगितले. दरम्यान, आझाद मैदानावर आंदोलनावेळी माजी खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रमुख वक्त्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली.
या महामार्गाचा देवाधर्माच्या नावाने घाट घातला आहे. मात्र आपला फायदा कसा करून घ्यायचा यासाठी हा महामार्ग केला जात आहे. पवनारपासून सुरू होणारा रस्ता पत्रादेवीला जाणार आहे. तेथून तो पुढे गोव्याला कशासाठी जाणार हे मला माहीत नाही, याचाच अर्थ हा मार्ग देवाच्या आळंदीचा नव्हे, तर चोराच्या आळंदीला जाणारा आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. तर मोठ्या प्रमाणात राज्यात रस्ते करायचे आणि त्यातून पैसे उभे करायचे, पार्टी फंड तयार करायचा आणि निवडणुका जिंकायच्या असा फंडा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र सभापती राम शिंदे यांनी तो दालनात फेटाळला. त्यानंतर या प्रस्तावावर बोलण्याची संधी दानवे यांना दिली.
या वेळी दानवे यांनी आझाद मैदानातील आंदोलनाची माहिती देत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यात असताना हा महामार्ग होणार नाही, असे सांगितले होते. तरीही पुन्हा शक्तिपीठ महामार्गाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.
यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारला शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करायचा आहे, अशीच भूमिका आहे. हा महामार्ग शेतकऱ्यांवर लादायचा नाही. ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्यांच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन अडचणी सोडविल्या जातील. मी कोल्हापूर दौऱ्यावर असताना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कोल्हापूर विमानतळावर गेलो असता, सुमारे एक हजार शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग व्हावा, अशी मागणी करणारे निवेदन दिले होते. निवेदनावर एकही सही खोटी नाही, खोटी असल्यास कारवाई करावी, असेही शेतकऱ्यांनी म्हटले होते. या महामार्गासाठी आम्ही जमीन द्यायला तयार आहोत. हा महामार्ग झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
वर्धा, यवतमाळ, सांगली या जिल्ह्यांतल्या शेतकऱ्यांनी सह्यांचे निवेदन दिले आहे. या शेतकऱ्यांनी शक्तिपीठला जागा देण्यास सहमती दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या सहमतीचे निवेदन मला दिलेले आहे, असे सांगितले.
तसेच शक्तिपीठ केवळ श्रद्धेचा विषय नाही. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या विकासासाठी शक्तिपीठ महामार्ग पूर्ण केला जाणार आहे. महामार्ग ज्या जिल्ह्यांतून जाणार आहे, त्या जिल्ह्यांचा वेगाने विकास होणार आहे. कोल्हापूरमधून पाऊण तासात मोफा (उत्तर गोवा) विमानतळावर जाता येणार आहे, असे स्पष्ट केले.
समर्थनासाठी तिप्पट शेतकऱ्यांचा मेळावा
आझाद मैदानावरील शेतकऱ्यांच्या उपस्थितीचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘शक्तिपीठ महामार्ग आमचा अट्टहास नाही. आझाद मैदानावर आज शक्तिपीठच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तिप्पट शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शक्तिपीठला समर्थन असणाऱ्या शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. सतेज पाटील यांनी मध्यस्थी करावी, शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढू. शेतकऱ्यांच्या सहमतीने महामार्ग पूर्ण करू.’’
‘मिळालेल्या पैशांतून जमिनी घेता येतील’
जमीन मोबदल्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, ‘जमिनीच्या चार -पाच पट भाव मिळतो, त्यामुळे शेतकरी जमिनी देण्यास तयार होत आहेत. त्यामुळे विना टॅक्सचे पैसे मिळतात. त्यात त्यांना जमीनही घेता येऊ शकते. रस्ते विकासाचे मार्ग आहेत. समृद्धी, शक्तिपीठ आणि कोकण महामार्गामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला विमानतळ, बंदरांशी जोडले जाणार आहे. दळणवळणाच्या सोयी वाढणार आहेत.’
समर्थन देणारेच विरोधात होते : सतेज पाटील
आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत बोलताना सध्या जे समर्थन देत आहेत, तेच अधिसूचना निघाल्यावर विरोधात होते, असे सांगितले. तसेच या रस्त्याला समांतर नागपूर-रत्नागिरी महामार्ग आहे. त्याला जोडणारे अनेक मार्ग आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात संकेश्वरहून गडहिंग्लज, आजरा मार्गे चार पदरी महामार्ग कोकणाला जोडणारा झाला आहे. मोफा येथून केवळ चार तासांत कोल्हापुरात येता येईल. नांदेड- तुळजापूर महामार्ग झाला आहे. हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हे खरे आहे. पण शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या. शेतकऱ्यांना वेळ दिला तर ते चर्चा करतील. एक हजार शेतकऱ्यांनी सह्या दिल्या असतील, तर त्याची प्रत आम्हालाही द्या. केवळ एकच बाजू ऐकून घेणे बरोबर होणार नाही. या रस्त्याचा फेरविचार करावा.’’
अमेरिकेची समृद्धी रस्त्यांमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी रस्त्यांची उपयुक्तता सांगताना अमेरिकेचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘नागपूर -मुंबई महामार्ग असतानाही ग्रीनफील्ड महामार्ग केला. त्यामुळे वाशीमसारखा जिल्हा जोडला गेला. दिल्ली-मुंबई महामार्ग असतानाही त्यामुळे ग्रीनफील्ड महामार्ग केला आहे. अमेरिका ही रस्त्यांमुळे समृद्ध आहे. त्यामुळे समृद्धी, शक्तिपीठ आणि कोकण महामार्ग जोडणार आहोत. नीट विचार करून जाळे तयार केले आहे. महाराष्ट्राच्या हिताकरिता हा मार्ग काढायचा आहे.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.