Yavatmal News : कापूस उत्पादक पणन महासंघासाठी सात जानेवारी २०२४ ला मतदान होणार आहे. यासाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. यवतमाळ विभागात या वेळी तीन नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या मतदारसंघात निवडणूक न होता बिनविरोध उमेदवार निवडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
पणन महासंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवधी आहे. त्यामुळे निवडणूक न होता बिनविरोध करण्यासाठी राजकीय पक्ष व पुढाऱ्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पणनच्या ११ विभागांपैकी पाच विभाग बिनविरोध झाले आहेत. सहा विभागांसह राखीव मतदारसंघातही निवडणूक होऊ नये, यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
या वेळी यवतमाळ विभागातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मुंबई बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल मानकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी नामांकन दाखल केले आहे.
एका जागेसाठी काँग्रेसकडून दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) एक अर्ज दाखल झाला आहे. या मतदारसंघात १७ मतदार आहेत. त्यामुळे निवडणूक न होता बिनविरोध निवडीसाठी मनधरणी सुरू झाली आहे.
यवतमाळ विभागातून अॅड. प्रफुल्ल मानकर यांचे नाव आघाडीवर आहे. यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रवीण देशमुख व वसंत घुईखेडकर यांनी माघार घ्यावी, असे प्रयत्न आतापासूनच सुरू झाले आहेत. त्यात जवळपास चर्चा झाली असून, माघारीनंतर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी यवतमाळ विभागातून ययाती नाईक ‘पणन’चे संचालक म्हणून बिनविरोध झाले होते. यंदाही त्याच पद्धतीने निवड करावी, असा मतप्रवाह आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ओबीसी प्रवर्गातून दहा अर्ज
ओबीसी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढणाऱ्यांची संख्या जास्त आहे. एका जागेसाठी तब्बल दहा उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. त्यात यवतमाळमधून दोघांचे अर्ज आहेत. याशिवाय इतर जिल्ह्यांतूनही आठ नामांकन दाखल झालेले आहेत. त्यामुळे बिनविरोध होणार की निवडणूक, हे आता येत्या २२ डिसेंबरनंतरच स्पष्ट होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.