
Crop Damage Update : विविध पिकामध्ये उंदरांमुळे होणारे नुकसान मोठे आहे. अधिक प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये उंदीर गव्हासारखे संपूर्ण पीक नष्ट करू शकतात. रसायनांचा वापर न करताना उंदरांपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी ऑस्ट्रेलिया येथील सिडनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी नवी पद्धत शोधली आहे.
गहू कोंबाच्या वासावर आधारित या तंत्रामुळे किमान ६३ टक्के ते ७४ टक्के इतक्या गहू पिकाचा बचाव शक्य होत असल्याचे चाचण्यातून आढळले आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये २०२१ मध्ये उंदरांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे पिकांचे एक अब्जापेक्षा डॉलरचे नुकसान झाल्याची माहिती आहे. अशा स्थितीमध्ये तयार झालेले पीक डोळ्यांसमोर उंदरांनी खाऊन फस्त केल्याची स्थिती होती.
ही समस्या भविष्यात सातत्याने येत राहणार असल्याचे लक्षात घेऊन सिडनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी त्यांच्या नियंत्रणासाठी संशोधनाला सुरुवात केली. विद्यापीठातील सिडनी इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चर अॅण्ड स्कूल ऑफ लाइफ अॅण्ड इन्व्हायर्न्मेंटल सायन्सेस येथील प्रो. पीटर बॅंक्स, डॉ. कॅथरिन प्राइस आणि जेन्ना बायथेवे यांच्यासह पीएच.डी. विद्यार्थी फिन पार्कर या विषयावर काम करत होते. त्यांनी गहू पिकावर गहू कोंबाच्या तेलाच्या (व्हीट जर्म ऑइल) विरल द्रावणाची फवारणी करण्याचे तंत्र विकसित केले आहे.
या रसायनविरहित तंत्रामुळे सामान्य परिस्थितीच्या तुलनेमध्ये उंदराकडून गहू दाणे पळविण्याची शक्यता ६३ टक्क्यांनी कमी होते. हे संशोधन नेचर सस्टेनेबिलिटीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
स्वस्त आणि पर्यावरणपूरक
गहू कोंबाचे तेल हे गहू प्रक्रियेतील उपउत्पादन असून, ते अत्यंत स्वस्त आहे. त्याचे पाण्यासोबत विरल केलेले द्रावण अन्य कोणत्याही उंदीरनाशकांप्रमाणे किंवा आमिषाप्रमाणे विषारी नाही. त्यामुळे अन्य कोणावरही त्याचे विपरीत परिणाम होत नाहीत. तसेच ते पर्यावरणपूरकही आहे. उंदरांच्या नियंत्रणासाठी वेगवेगळे उपाय करूनही त्यांची संख्या आणि त्रास कमी होत नसल्यास हे नवे तंत्र उपयोगी ठरू शकते.
ऑस्ट्रेलियामध्ये शरद ऋतूच्या काळात गव्हाची पेरणी झालेली असते. याच काळात उंदरांची संख्या वेगाने वाढून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्यामुळे हे संशोधन अत्यंत मोक्याचे वेळी पुढे आल्याचे येथील कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. या हंगामामध्ये ऑस्ट्रेलियन गव्हाचे उत्पादन वाढून, त्यापासूनचे उत्पन्नही १५ अब्ज डॉलरपर्यंत पोचण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
या तंत्रज्ञानाचा व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक ः https://youtu.be/CAZZ_MhDD4M
काय आहे हे तंत्र?
जे गहू खाण्यायोग्य नाहीत, अशा गव्हाकडे दुर्लक्ष करण्याची सामान्यपणे उंदराची प्रवृत्ती असते. कारण अशा खाण्यायोग्य नसलेला गहू दाण्यासाठी माती उकरत बसण्यापेक्षा तोच वेळ अन्य ठिकाणी वापरल्यास अधिक फायदा होतो.
त्यामुळे शास्त्रज्ञांनी पेरणीपूर्वी दाण्यावर गहू कोंबापासून काढलेल्या तेलाचे विरल द्रावण तयार करून त्याची फवारणी करण्याचा निर्णय घेतला. न्यू साउथ वेल्स येथील सुमारे ६० क्षेत्रामध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारे हे तंत्र वापरून त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी दोन प्रक्रियांमध्ये गहू कोंबाच्या तेलाचा वापर केला होता, तर अन्य तीन पद्धतींमध्ये वेगळ्या कॅनोला तेलांसह अजिबात प्रक्रिया न केल्या बियांचा वापर केला होता.
बाकी सर्व व्यवस्थापन सारखेच ठेवण्यात आले. या चाचण्यांमध्ये संशोधकांना असे दिसून आले, की पेरणीपूर्वी ज्या गहू क्षेत्रावर व्हीट जर्म ऑइलच्या विरल द्रावणाची फवारणी केलेली आहे, अशा ठिकाणी उंदराकडून होणारे नुकसान हे त्याही पेक्षा अधिक म्हणजे ७४ टक्के इतके कमी झाले.
त्या विषयी माहिती देताना प्रो. बॅंक्स यांनी सांगितले, की उंदीर हे जमिनीतील अन्नाचा किंवा दाण्याचा वास घेऊन त्या प्रमाणे बिळे बनवत जातात. मात्र नव्या तंत्रामुळे उंदराला येणारा गव्हाचा वास हा खाण्यायोग्य गव्हाचा नसल्यामुळे तो टाळून अन्य ठिकाणी ते शोधाशोध करत राहतात. त्याच प्रमाणे गव्हाच्या वासामुळे त्यांची फसगत होत राहते.
त्यामुळे उंदरांच्या अतितीव्र समस्येच्या काळातही उंदरांमुळे होणारे नुकसान कमी करणे शक्य झाले. गंधाच्या आधारे शोध घेणाऱ्या सर्व सजीवांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी हे तंत्र उपयोगी ठरू शकते.
पार्कर यांनी सांगितले, की छद्मवेश किंवा लपून राहण्याची क्षमता ही केवळ प्राण्याच्या बाबतीतच नव्हे, तर बियांच्या बाबतही वापरणे शक्य आहे. मात्र बियांच्या बाबतीत हे तंत्र बियांची उगवण होऊन अंकुर दिसेपर्यंतच शक्य होते.
अर्थात, त्यापूर्वीच्या संवेदनशील काळात बियांचा बचाव ही मोठी बाब ठरते. त्याच सोबत या तंत्रासाठी उंदरामध्ये प्रतिकारकता विकसित होण्याचा धोकाही अत्यल्प आहे. जे काही नुकसान उंदराकडून झाले तेही बहुधा उगवण झाल्यानंतर म्हणजे पेरणीनंतर दोन आठवड्यांनी झाल्याचे दिसून आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.