Pune News : खासगी साखर उद्योगात उल्लेखनीय काम करणाऱ्या साखर कारखान्यांची नावे ‘विस्मा’ने घोषित केली आहेत. ‘ऊस विकास शेती’मध्ये नाशिकच्या द्वारकाधीश साखर कारखान्याने बाजी मारली आहे. तर, साखर उत्पादनाचे पारितोषिक ‘दालमिया’ उद्योगाने पटकावले आहे.
राज्यातील १३३ खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोसिएशन’ अर्थात ‘विस्मा’ने उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच साखर कारखान्यांना पारितोषिके देण्याचे यापूर्वी घोषित केले होते. पुरस्कार वाटपाचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे कारखान्यांमध्ये उत्सुकता होती. ‘विस्मा’ने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली एक निवड समिती स्थापन केली होती.
साखर गाळप हंगाम २०२३-२४ मधील विविध पाच गटांमध्ये कारखान्यांचे प्रस्ताव समितीने अभ्यासले. या समितीने निवडलेल्या उत्कृष्ट कारखान्यांची घोषणा गुरुवारी (ता. २९) करण्यात आली. निवड समितीत विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, उपाध्यक्ष आमदार रोहित पवार, सरचिटणीस डॉ. पांडुरंग राऊत, ‘डीएसटीए’चे अध्यक्ष एस. बी. भड, साखर संचालक राजेश सुरवसे, तंत्रज्ञ डॉ. संजय पाटील यांचा समावेश होता.
पुण्याच्या एरंडवणा येथील म्हात्रे पुलाजवळील डीपी रोडलगतच्या ‘सिद्धी साज गार्डन’ येथे शनिवारी (ता. ३१) सकाळी दहा वाजता होत असलेल्या विशेष सोहळ्यात या कारखान्यांना गौरविले जाणार आहे. या वेळी केंद्रीय नव व अपारंपरिक ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संगिता कस्तुरे, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित असतील.
या वेळी बायोसीएनजी क्षेत्रातील संधी, उत्पादन व अनुदान योजना याविषयी माहिती डॉ. कस्तुरे देणार आहेत. तसेच, प्राज इंडस्ट्रीजच्या तज्ज्ञांकडून हवाई इंधन, कार्बन फुट प्रिंटस् याविषयावर सादरीकरण केले जाणार आहे. राज्याच्या साखर उद्योगातील सर्व संस्था, अभ्यासक, कारखाना पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे व कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी केले आहे.
पारितोषिक विजेत्या कारखान्यांची नावे अशी ः द्वारकाधीश साखर कारखाना लिमिटेड, नाशिक (उसाची शेती व विकास), दालमिया भारत शुगर अॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड, कोल्हापूर (साखर उत्पादन), गुरुदत्त शुगर्स लिमिटेड, कोल्हापूर (उपपदार्थ उत्पादन), नॅचरल शुगर्स अॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड, धाराशिव (संशोधन व विकास आणि नावीन्यपूर्ण उपक्रम), व्यंकटेश कृपा शुगरमिल्स् लिमिटेड, पुणे (आर्थिक व्यवस्थापन).
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.