
Sangli Bank News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे शेतकऱ्यांना थकबाकी वसुलीसाठी ‘ओटीएस’अंतर्गत जूनअखेर मुदतवाढ देण्यात आली होती. त्याची मुदत आठवडाभरात संपणार आहे. मुदतीत अधिकाधिक वसुली करण्यासाठी बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जोरदार मोहीम राबविली आहे.
आतापर्यंत कोट्यवधींची वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे एनपीए कमी होण्यास मदत मिळणार आहे. मुदतीत थकबाकी भरून सहकार्य करावे, येत्या दोन वर्षांत बँकेचा एनपीए आकडा नीचांकी पातळीवर आणण्यात येणार असल्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.
जूनअखेर अधिकाधिक थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असून गेल्या दोन महिन्यांपासून बँकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. महिनाअखेरनंतर किती वसुली झाली, शिवाय बँकेचा एनपीए कमी होण्यास किती मदत होणार, हे स्पष्ट होईल.
अध्यक्ष आमदार श्री. नाईक, उपाध्यक्षा जयश्री पाटील, सीईओ शिवाजीराव वाघ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अधिकाधिक वसुलीचे प्रयत्न आहेत. सुटी दिवशीही बॅंकेच्या शाखा सुरू ठेवल्या जात आहेत.
गतवर्षी बँकेला १३० कोटी रुपये नफा झाला होता. यंदा १५१ कोटी रुपये नफा मिळाला. मात्र शेतकरी ‘ओटीएस’ योजनेतील सवलतीसाठी १७ कोटी रुपये वर्ग केले. त्यामुळे बँकेला १३४ कोटी रुपयांचा नफा मिळाला.
शेती कर्जाच्या वसुलीचे प्रमाण ९५ टक्के आहे. बँकेचा एनपीए कमी करण्यात यश आले असून पुढील दोन वर्षांत शून्य टक्के एनपीएसाठी आराखडा केला आहे.
सलग तीन वर्षे एनपीए पाच टक्क्यांहून कमी असल्यास डिजिटल सेवा सुरू करण्यास परवानगी मिळेल, असा विश्वास अध्यक्ष नाईक यांनी व्यक्त केला आहे.
कर्मचाऱ्यांचे लक्ष बक्षीस पगाराकडे
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच अन्य विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून केलेल्या प्रयत्नांमुळे कोट्यवधींची वसुली झाली आहे. विशेषकरून दुष्काळी भाग असलेल्या जत तालुक्यात थकबाकी वसुलीचा धडका सुरू आहे.
वसुलीमुळे एनपीए आणखी कमी होणार आहे. शिवाय बँकेचा नफाही वाढणार आहे. मार्चअखेर केलेल्या वसुलीमुळे याचे बक्षीस म्हणून कर्मचाऱ्यांना अडीच पगार जादा देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. मात्र अद्याप हा पगार दिला नसल्याने कर्मचाऱ्यांचे या पगाराकडे लक्ष लागून आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.