Dr. M.S. Swaminathan : डॉ. स्वामिनाथन आणि बटाटा संशोधन

Agriculture Potato Research : डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. देशाला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याच बरोबर देशातील बटाटा उत्पादन वाढविण्यातही त्यांचे योगदान आहे.
Dr. M.S. Swaminathan
Dr. M.S. Swaminathan Agrowon

आ. श्री. केतकर

Dr. M.S. Swaminathan : भारतात १९६० च्या दशकात झालेली हरितक्रांती (ग्रीन रिव्होल्यूशन) आणि कालांतराने सदाहरितक्रांतीची (एव्हरग्रीन रिव्होल्यूशन) दिशा दाखवणारे म्हणून डॉ. एम. एस. स्वामिनाथन सर्वांना माहीत आहेत. गहू आणि तांदूळ (भात) या पिकांमध्ये उत्पादनवाढीला त्यांच्या प्रयत्नांनी मोठाच हातभार लागला आणि एकेकाळी धान्यासाठी परदेशांवर अवलंबून असलेला आपला देश आता त्या धान्यांची निर्यातही करू लागला आहे.

अन्नाबाबतचे आपले परावलंबित्व नाहीसे करण्याचे श्रेय निर्विवादपणे डॉ. स्वामिनाथन यांचेच आहे. एका गोष्टीबाबत मात्र बऱ्याच जणांना फारशी माहिती नाही. ती म्हणजे शिक्षणासाठी परदेशात असताना त्यांनी त्यांच्या पीएच.डी.साठी बटाट्याचे वाण सुधारण्याचा विषय निवडला होता. त्यात त्यांना चांगलेच यश मिळाले आणि पीएच. डी. देखील. त्यांनी बटाट्यावरही चांगले काम केले होते.

त्यांनी बटाट्याचे उत्पादन तर वाढवलेच, पण त्याचबरोबर त्याच्यात कीड प्रतिकारशक्तीही निर्माण केली. आज भारतात बटाट्याचे उत्पादन सहा कोटी टनांवर होते, याचे श्रेय काही प्रमाणात डॉ. स्वामिनाथन यांनाही आहे.

त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला, १९४७ मध्येच त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेत (आयसीएआर) डॉ. हरभजनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आपले पदव्युत्तर संशोधन सुरू केले होते. सिंग हे प्लांट इंट्रोडक्शन डिव्हिजनचे (वनस्पती ओळख विभागाचे) प्रमुख होते.

तरुण वयातील स्वामिनाथन यांना त्यावेळी बटाट्यामध्ये खूपच रस होता. त्याचे कारण म्हणजे मानवी आहार सुरक्षेमधील बटाट्याचे महत्त्व आणि त्याच्यातील आश्चर्यकारक जनुकीय आणि पेशी आनुवांशिकी गुणधर्म आणि त्याचबरोबर त्याचा सांस्कृतिक इतिहास.

कृषी क्षेत्रात संशोधन करण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी १९४९ मध्ये युनेस्कोने (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, विज्ञान आणि सांस्कृतिक संघटना) दिलेली अभ्यासवृत्ती स्वीकारली आणि बटाट्याबाबतचे संशोधन सुरू ठेवण्यासाठी नेदरलँड्सला (हॉलंडला) गेले. वेजनिनजेन (Wageningen) येथील कृषी विद्यापीठात त्यांनी आपले काम सुरू केले.

स्वामिनाथन यांना तेथेच समजले, की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपमधील लोकांचा बटाटा हाच प्रमुख आहार होता. त्यामुळे त्या काळात तेथे जास्तीत जास्त बटाट्यांचे उत्पादन करण्याची गरज निर्माण झाली होती. परिणामी, पारंपरिक पीकचक्रामध्ये बदल करावा लागला होता. पण याचा परिणाम असा झाला, की ‘गोल्डन नेमॅटोड’ या किडीचा प्रश्न निर्माण झाला आणि नेदरलँड्समधील पोल्डर म्हणजे समुद्रसपाटीखालील जमिनींच्या विशिष्ट गुणधर्मामुळे तो खूपच गंभीर झाला होता.

त्यामुळे स्वामिनाथन यांच्या प्राध्यापकांनी त्यांना विचारले, की ते ‘गोल्डन नेमॅटोड’ला प्रतिकार करणारे जनुक (जीन्स) बटाट्यात घालण्यासाठी आणि अतिशीत - शून्य अंशाखाली तापमान असलेली हवा, तसेच हिमवृष्टीमुळे होणारे बटाट्याच्या पिकाचे नुकसान (फ्रॉस्ट डॅमेज) नुकसान टाळण्यासाठी सुरू असलेल्या संशोधनात मदत करतील का? स्वामिनाथन यांनी या प्रस्तावाला होकार दिला आणि ते डॉ. प्रक्केन प्रमुख असलेल्या अनुवंशशास्त्र संस्थेत काम करू लागले.

त्यांना विविध जंगली जातीच्या सोलानम या वंशातील वनस्पतींचे जनुक, पीक म्हणून घेण्यात येणाऱ्या बटाट्यात (सोलानम ट्युबरोसम- Solanum tuberosum) टाकण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या ‘मायक्रो ग्राफ्टिंग’ तंत्राचे प्रमाणीकरण करण्यात यश आले. नंतर याच विषयात संशोधन सुरू ठेवण्यासाठी त्यांनी ट्रंपिंग्टन येथील प्लांट ब्रीडिंग इन्स्टिट्यूट, केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर, मध्ये १९५० मध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी प्रो. एच. डब्ल्यू. हवर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले आणि १९५२ मध्ये त्यांना पीएच.डी. मिळाली.

Dr. M.S. Swaminathan
M S Swaminathan: स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या तर शेतीचे प्रश्न सुटतील का ?

डॉ. स्वामिनाथन यांनी ‘इंड्यूस्ड पॉलिपॉइड्‍स इन नॉन-ट्यूबरस सोलानम्स अँड देअर क्रॉसेबिलिटी विथ पोटॅटो’ या विषयावर सादर केलेले निबंध आणि त्यांनी डॉ. हावर्ड यांच्या साथीने १९५३ मध्ये ‘द सायटॉलॉजी अँड जेनेटिक्स ऑफ द पोटॅटो (सोलनम ट्यूबरोसम एल.) ॲण्ड रिलेटेड स्पीशीज’ यावर केलेले सविस्तर परीक्षण यांचा उल्लेख अप्रतिम शैक्षणिक शोधनिबंध म्हणून आजही बटाट्यावर संशोधन करणाऱ्यांकडून केला जातो.

पीएच.डी. मिळवल्यानंतर डॉ. स्वामिनाथन बटाट्यावरील आपले संशोधन पुढे सुरू ठेवण्यासाठी अमेरिकेला गेले. तेथे विस्कॉन्सिन विद्यापीठात त्यांनी अनुवंशशास्त्रात संशोधक सहायक म्हणून १९५२-५३ मध्ये काम केले.

तेथे ‘सोलानम जर्मप्लास्म’चा (Solanum germplasm) मोठा संग्रह जतन करण्यात आला होता. तेथील त्यांच्या कामामुळे बटाट्याच्या अनेक नव्या जातींची निपज करण्यास मदत झाली. यापैकी एक जात अलास्का फ्रॉस्टलेस ही अलास्कामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आली.

डॉ. स्वामिनाथन १९५४ मध्ये भारतात परतले. परंतु दिल्लीत काही अपवाद वगळता बटाट्यांना फुलोरा येत नसल्याने त्यांना बटाट्याबाबतचे संशोधन पुढे करता येणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी भात, गहू, बार्ली, कपाशी, टोमॅटो, ज्यूट इ. अन्य पिकांच्या संशोधनावर भर दिला. दरम्यान, त्यांनी भारतात १८ व्या शतकापासून पिकवल्या जाणाऱ्या बटाट्याच्या मूळ जातीचे बारकाईने संशोधन केले.

त्यावरील शोधनिबंध (स्वामिनाथन आणि मगून १९६१) या विषयावरील सविस्तर अभ्यास म्हणून ओळखला जातो. वाढते उत्पन्न, शहरीकरण, तसेच फास्ट फूड इंडस्ट्री आणि लोकांच्या खाण्याबाबतच्या बदलत्या सवयींमुळे बटाट्याची मागणी वाढणे शक्य होते.

याबाबतचा एक अंदाज होता, की २०२० पर्यंत जगातील कंदमुळांच्या आहाराची मागणी ३७ टक्क्यांनी वाढेल. त्यात बटाट्याचा वाटा ४१.९ टक्के असेल. अन्न आणि शेती संघटनेच्या (Food and Agriculture Organization - एफएओ) अंदाजानुसार २०१९ मध्ये बटाट्याचे उत्पादन ३७ कोटी टन होते.

डॉ. स्वामिनाथन यांच्या मते बटाट्याच्या उत्पादनाला मर्यादा आणणारे घटक हे प्रामुख्याने अनेक प्रकारच्या किडी आणि रोग, रोगप्रतिकारशक्ती असलेल्या वाणांची निर्मिती आणि वाटप करण्यातील अडचणी, शीत कोठारांची कमी संख्या आणि बटाट्याच्या दरात होणारे मोठे चढ-उतार हे आहेत.

विषारी कीटकनियंत्रक औषधे वापरल्याने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणत हानी होते. तसेच नव्याने आढळणाऱ्या काही बुरशीजन्य रोगांचाही प्रश्न आहेच. लेट ब्लाइट (Phytophthra infestans) या बुरशीच्या जातींच्या प्रादुर्भावामुळे त्यावर तातडीने उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली होती.

त्यावर जॉन निडरहौसर (John Niederhauser) या १९९० च्या जागतिक अन्न पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाने सुरू केलेल्या मेक्सिको सिटीजवळच्या टोलुका व्हॅलीत सुरू केलेल्या ‘हॉट स्पॉट स्क्रीनिंग’ केंद्रामुळे बटाटा संशोधकांना मोठीच मदत झाली.

सिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन केंद्राने केलेल्या (सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूटने - CPRI) अंदाज केला होता, की २०२० मध्ये भारतात २० लाख हेक्टर क्षेत्रात बटाटा पिकवला जाईल, म्हणजे बटाट्याचे उत्पादन पाच कोटी टन होईल. भारतामध्ये सध्या हेक्टरी २५ टन बटाटा पिकतो. पण हे प्रमाण युक्रेनमधील सरासरी उत्पादनाच्या केवळ निम्मे आहे.

त्यामुळे डॉ. स्वामिनाथन यांना वाटत होते, की ते प्रमाण गाठणे फारसे अवघड जाऊ नये. पण प्रत्यक्षात उत्पादन किती होते ते बटाटा शेतीतील उत्पादन खर्च, पत्करावा लागलेला धोका आणि मिळणारे उत्पन्न (कॉस्ट- रिस्क - रिटर्न) या रचनेवर अवलंबून राहील, असेही त्यांनी म्हटले होते. त्यालाही कारण होते. ते म्हणजे अचानक कोसळणाऱ्या किमतींमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागते.

जोडीला पिकाचे उत्पादन आणि काढणीनंतरचे तंत्रज्ञान यांचा मेळ जमत नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही विक्रमी पीक आले तरी त्याचा फायदा मिळत नाही. यावर उपाय म्हणून डॉ. स्वामिनाथन यांनी २०१० मध्ये एक पाच कलमी कृती आराखडा सुचवला होता.

देशातील उत्पादन पाच ते सहा कोटी टनांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले, तर बटाटा आपल्या अन्नसुरक्षितेत महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे २०२०-२१ या काळात बटाट्याच्या लागवडीखालील क्षेत्र २०.११७ लाख हेक्टरवर गेले होते आणि उत्पादन ५ कोटी ३१ लाख टन झाले होते.

डॉ. स्वामिनाथन यांच्या मते बटाटा बीज निर्मिती ही महत्त्वाची गरज होती. सिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन केंद्रात संशोधकांचे नेतृत्व करणाऱ्या महेश दत्त उपाध्याय या त्यांच्या शिष्याने हे काम केले. उपाध्याय हे भारतीय कृषी संशोधन संस्थेत (आयएआरआय) १९६३ मध्ये डॉ. स्वामिनाथन यांचे पीएच.डी.चे विद्यार्थी होते.

ते गुणसूत्राच्या आनुवंशिकी विश्‍लेषण (chromosome cytoanalysis) या बाबतीतले जादूगार समजले जातात. त्यांनी उत्तर भारतासाठी माव्याचा (ॲफिड) प्रादुर्भाव नसण्याच्या काळात बटाट्याच्या क्लोनल सीड प्रॉडक्शनचे तंत्रज्ञान विकसित केले. डॉ. स्वामिनाथन यांनी सुचवलेला आणखी एक मार्ग म्हणजे ट्रु पोटॅटो सीडचे (टीपीएस TPS- सत्यप्रत बियाणे) उत्पादन करून ते मोठ्या प्रमाणात वापरण्यात यावे.

त्याला कीड आणि रोगांची बाधा होत नाही आणि गावांमध्ये विकेंद्रित स्वरूपात त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येऊ शकते. सुदृढ बटाट्याच्या लहान आकाराच्या फुलांपासून तयार केलेले बी - टीपीएस हे बटाट्याच्या ‘लेट ब्लाइट’ या रोगाला कारणीभूत असलेल्या पी. इनफेस्टन्सला (P.infestans) उत्तर आहे.

Dr. M.S. Swaminathan
M. S. Swaminathan : स्वामिनाथन यांचे काम म्हणजे क्रांतिकार्यच...

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे टीपीएसचा वापर केला तर केवळ १०० ग्रॅम बियाणे एका हेक्टरसाठी पुरे होते. त्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते. भारत हा बटाट्याच्या उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. केंद्रीय बटाटा संशोधन केंद्राने सहा संकरित वाणांची निर्मितीही केली. ही सहा संकरित वाणे मूलतः पेरू देशातील लिमा येथे निर्माण करण्यात आली आणि त्यांची गुणवत्ता चाचणी भारतात करण्यात आली.

डॉ. स्वामिनाथन यांच्या मते किडी आणि रोगांना प्रतिकार याशिवाय बटाट्याच्या आकारामध्येही वाढ व्हायला हवी. मेंडेलच्या आणि रेण्विक पैदास तंत्राचा वापर केल्यास हे शक्य होईल. त्यांना असेही वाटत होते, की बटाट्यावर आधारित शेतीपद्धत विकसित करायला हवी. त्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करायला हवा.

अचूकतेने केलेली शेती नैसर्गिक संसाधनांची बचत करण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याने छोट्या शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ होते. शिवाय रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापरही कमी करते. यासाठीच्या पद्धती आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित करायला हव्यात.

याबरोबरच काढणीनंतरचे तंत्रज्ञान, प्रक्रिया यांचा वापर करायला हवा. भाव वाढतील तेव्हा विक्री करता यावी म्हणून शीतगृहांमध्ये आपला माल साठवून ठेवण्यात येतो. त्यामुळे अल्पावधीत शीतगृहे भरून जातात.

क्लोरोफ्लुरोकार्बन या घातक वायूशिवाय अशी शीतगृहे निर्माण करायला हवी. कारण हा वायू ओझोन थराला धोका निर्माण करतो. याबरोबरच विविध उपयोगांसाठी बटाट्याच्या खास वेगवेगळ्या जाती निर्माण केल्या पाहिजेत. कारण आता बटाट्यापासून विविध खाद्यपदार्थ निर्माण केले जात आहेत आणि त्यांना मागणीही चांगली आहे, असेही ते म्हणत.

आनुवंशिकतेच्या वापराने - जेनेटिकली मॉडिफाइड तंत्राने - बटाट्याच्या अनेक सुधारित जाती तयार करता येतात; परंतु त्यांचा वापर करण्यापूर्वी त्यांच्यापासून काही धोका तर नाही ना, याची खात्री करून घ्यायला हवी आणि नंतरच त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करावे असेही त्यांनी म्हटले होते.

कारण व्यावसायिक कंपन्यांना केवळ आपला फायदा वाढवायचा असतो. त्यामुळे त्या ग्राहकांच्या हिताकडे फारसे लक्ष देत नाहीत. भारतासारख्या देशात अन्नाच्या खरेदीसाठी उत्पन्नाचा ६० टक्के भाग उपयोगात आणला जातो, त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष पुरवायला हवे. त्यासाठी ‘नॅशनल कमिशन फॉर जेनेटिक मॉडिफिकेशन फॉर फूड अँड हेल्थ स्क्रूटिनी’ स्थापन करण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली होती.

बटाटा हे केवळ पौष्टिक अन्नच नाही, तर ते अनेकांना रोजगाराची संधी मिळवून देणारे पीक आहे. त्यामुळे आपल्या अन्न सुरक्षा योजनेत त्याला महत्त्वाचे स्थान देण्यात यायला हवे, कारण आता लागवडीखालील जिराईत शेती क्षेत्राचे माणशी प्रमाण घटत चालले आहे. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धताही कमी होत चालली आहे.

त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा विकास करून परिस्थितिकी सुरक्षा आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत शेतीसाठी शेतीपद्धत विकसित करायला हवी. आणि त्यासाठी ‘‘आपण तंत्रज्ञानात आपल्या पारंपरिक शहाणपणाचा विज्ञानाशी मेळ घालायला हवा. आपल्या धोरणातही अर्थशास्त्र आणि परिस्थितिकी आणि समानता यांचा मेळ घालायला हवा.

पण या सर्वांपेक्षा आपण आपले कृषी आयात-निर्यात धोरण हे गरिबीत दिवस काढणाऱ्या तीन कोटी शेतकऱ्यांचे बळ वाढवून त्यांना सुरक्षा देईल, त्यांच्या उपजीविकेला धोका निर्माण करणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी,’’ असे डॉ. स्वामिनाथन यांनी १९९९ मध्ये सांगितले होते. त्यांचे हे सांगणे कायम ध्यानात ठेवायला हवे.

(साभार : कर्तव्य साधना)

(या लेखाचा मुख्य आधार भारतीय विद्या भवन, मुंबई यांनी प्रकाशित केलेले आर. डी. अय्यर, अनिल कुमार आणि रोहिणी अय्यर यांनी लिहिलेले ‘एम. एस. स्वामिनाथन, सायन्टिस्ट, ह्युमॅनिस्ट, कॉन्झर्व्हेशनिस्ट’ हे पुस्तक आहे. नवी आवृत्ती २०२१)

(लेखक, ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

aashriketkar@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com