Jalgaon Water News : जून महिन्याचे दहा दिवस उलटले, तरी अद्याप जिल्ह्यात मॉन्सून दाखल झाला नाही. यामुळे जिल्हा प्रशासन पाणी टंचाईबाबत अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर प्रकल्पाचे सर्व दरवाजे बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले असून, त्यानुसार शनिवारी (ता. १०) सकाळी सर्व दरवाजे बंद करण्यात आले.
या सिंचन प्रकल्पांतून आता केवळ पिण्यासाठी पाणी सोडले जाईल. तेही गरज पडेल तेव्हा जिल्हा प्रशासनाच्या आदेशानेच.
जिल्ह्यातील अतितापमानाने विहिरींची पाणी पातळी घटली आहे. बोदवड, यावल, भुसावळ आणि जामनेर तालुक्यांतील भूजल पातळीत ०.३५ मीटरने घट झाली. किमान सात जूनला काही प्रमाणात तरी पाऊस पडणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झालेले नाही.
त्यातच पाऊस आणखी किती दिवस लांबेल हे सांगणे शक्य नाही. यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी आता केवळ पिण्यासाठी आरक्षीत आहे. धरणाचे काही गेट सुरू होते. मात्र, तेही आता बंद करण्यात आले आहेत. सिंचन प्रकल्पातील पाणी ऑगस्टपर्यंत पुरले पाहिजे, त्या अनुषंगाने उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.
जानेवारी ते जूनपर्यंत टंचाई आराखडा तयार होता. जून महिन्यात पाऊस न झाल्यास सिंचन प्रकल्पातील पाणी ऑगस्टपर्यंत कसे पुरेल, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. सोबतच टंचाई निवारण्यासाठीच्या विविध उपायांचा अवलंब करीत आहेत.
विशेष टंचाई आराखडा
जिल्हा प्रशासनाने जानेवारी ते जून दरम्यान दोन कोटी ४४ लाख ६९ हजारांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यानुसार टंचाईवर उपाययोजना सुरू आहेत. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे तापमानात वाढ होईल, सोबतच पावसाळाही लांबत आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खास बाब म्हणून एक कोटी ९७ लाख ९३ हजारांचा विशेष टंचाई आराखडा तयार करून ठेवला आहे. जूननंतर पाऊस झाला नाही, तर या आराखड्यातील तरतुदीतून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे.
सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा
सिंचन प्रकल्प पाणीसाठा (टक्के) - झालेला पाऊस (मिमी)
हतनूर- ४१.९६ ९
गिरणा - २३.४३ ७
वाघूर - ६२.५३ ०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.