

रोपवाटिका व्यवसायात पिशव्यात अगर कुंड्यांमध्ये भरण्यासाठी पीट (Peat) नामक एका नैसर्गिक सेंद्रिय माध्यमाचा वापर केला जातो. भारतात नैसर्गिक पीट दुर्मिळ असल्याने त्याला पर्याय म्हणून काथ्या उद्योगात निर्माण होणाऱ्या कथ्या कुटापासून बनविलेला कोकोपीट (Cocopeat) हा पदार्थ भारतात सर्वत्र वापरला जातो. कोकोपीट बनविण्याचा फार मोठा उद्योग केरळात चालतो. पुणे येथील अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलजी इन्स्टिट्यूट (आरती) संस्थेने याच गुणधर्माचा पदार्थ उसाच्या पाचटापासून बनविण्यात यश मिळवले आहे.
माध्यम कसे तयार करायचे?
- उसाचे पाचट लवकर कुजत नाही व त्याचा पशुखाद्य म्हणूनही काही उपयोग होत नाही म्हणून शेतकरी ते शेतातच जाळून टाकतात. पाचट लवकर न कुजन्याचे मुख्य कारण म्हणजे कुजन्याच्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सूक्ष्मजीवांना त्यात कोणतेच खाद्य उपलब्ध नसते.
- या जंतूंना खाद्य म्हणून वाळलेल्या एक टन पाचटाच सुमारे दहा किलो शेण मिसळावे लागते. तसेच या पाचटावर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या बुरशीची प्रक्रिया केल्यास पाचटाच्या पेशीच्या पेशीभित्तिकांमधले सेल्युलोज विरघळते. त्यामुळे ते कुजण्याच्या प्रक्रियेला मदत होते.
- एक टन पाचटा मागे ट्रायकोडर्मा व्हिरिडीचे सुमारे ५०० ग्रॅम संवर्धन लागते. शेणात २०० लिटर पाणी मिसळून त्याचा काला करावा. याच काल्यात १० किलो सुपर फॉस्फेट आणि ८ किलो युरिया मिसळावा.
- कडबा कापण्याच्या यंत्राने पाचटाचे एक ते तीन सेमी आकाराचे तुकडे करावेत. हे तुकडे शेणकाल्यात भिजवावेत. या भिजलेल्या पाचटाचे पंधरा सेमी उंचीचे एकावर एक थर रचून त्यांचा एक ढीग करावा.
थर रचताना प्रत्येक थर रचून झाला की त्यावर ट्रायकोडर्मा व्हिरीडीच्या संवर्धनाची भुकटी पसरावी. हा ढीग शक्यतो एखाद्या झाडाखाली सावलीत करावा. म्हणजे तो वाळत नाही. दर आठवड्यातून एकदा या ढीगावर पाणी मारून तो फावड्याने हलवून खाली वर करावा व त्याचा पुन्हा एकत्र ढीग करून ठेवावा.
- साधारणतः साडेचार महिन्यांनी पाचट कुजते. पाचट कुजले आहे हे ओळखण्यासाठी ते हातात घेऊन चोळले तर त्याचा सहज भुगा होतो.
- तयार झालेले खत पाच मिमी छिद्रे असणाऱ्या चाळणीने चाळून मोठ्या प्लास्टिक पिशव्यात भरून ठेवावे. गरजेप्रमाणे रोपवाटिकेतील पिशव्या किंवा कुंड्या भरण्यासाठी वापरावे. पीट तयार करण्यासाठी उसाचे पाचट वापरण्याचा फायदा पर्यायी पीट निर्माण करण्यासाठी उसाचे पाचट वापरण्याचा फायदा असा की त्याच्या पेशीभित्तीमध्ये लिग्निन व सिलिका हे दोन पदार्थ असल्याने कुजल्यानंतरही त्यांची पेशीकायुक्त रचना कायम राहते. त्यामुळे कमी वजन, पाणी शोषून घेणे व ते वनस्पतींना हळूहळू गरजेप्रमाणे उपलब्ध करून देणे. हे पीट चे सर्व गुणधर्म या खतात ही आढळतात.
स्त्रोत ः पुस्तिका- अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) ने विकसित केलेली तंत्रे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.