
Nagar News : महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) काळात निळवंडे कालव्यांच्या (Nilvande Canal) सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पाच महिन्यांच्या विलंबानंतर मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली.
याबद्दल सरकारचे आभार, मात्र लाभक्षेत्रातील रखडलेल्या कामात निळवंडे विरोधकांनी विघ्न आणू नये, असे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात (Mla Balasaheb Thorat) म्हणाले.
आमदार थोरात प्रसिद्धी पत्रकात म्हणतात, की महाविकास आघाडीच्या काळात गतिमान झालेले निळवंडे कालव्यांचे काम शिंदे- फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर खोळंबले होते. मंत्रिमंडळ बैठकीतील प्रशासकीय मान्यतेमुळे हे काम वेगाने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला.
जानेवारी २०२२ मध्ये दाखल केलेल्या प्रस्तावाला दिवाळीपूर्वीच मान्यता मिळणे अपेक्षित होते. मात्र सरकारच्या दिरंगाईमुळे हे काम पाच महिने रखडल्याचा कबुलीजबाब पालकमंत्र्यांनी देणे अपेक्षित आहे.
लाभक्षेत्रातील शेतकरी आणि लाभधारकांना निळवंडे कालव्यांचे मित्र आणि शत्रू कोण हे माहीत आहे. ‘मविआ’च्या अडीच वर्षांच्या काळात कालव्यांच्या कामातील अडथळे दूर करता आल्यामुळे आज या प्रकल्पाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले.
धरणातून कालव्यात पाणी सोडण्याचा महत्त्वाचा अवघड टप्पा मविआ सरकारने विक्रमी वेळेत पूर्ण केला.
प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांचे पुनर्वसन, त्यांच्याकडील शिल्लक शेतजमिनीसाठी बारमाही पाण्याची सोय करणे ही कामे मूळ प्रकल्पाबाहेरची होती.
महागाई व प्रकल्पात समाविष्ट नसलेली कामे वाढल्याने प्रकल्पाचा खर्चही वाढला होता.
कामाचे श्रेय घेण्याचा आटापिटा ः थोरात
निळवंडे कालव्यांच्या वाढीव निधीला मंजुरी व सुधारित खर्चास तांत्रिक मान्यता घेण्याचे काम महाविकास आघाडीच्या काळातच करून प्रस्ताव जलसंपदा विभागाने सादर केला. मात्र विद्यमान शिंदे- फडणवीस सरकारने या सुधारित प्रशासकीय मान्यतेला पाच महिन्यांचा उशीर केला.
जनभावना लक्षात घेता, सरकारने आज त्याला मंजुरी दिली. यापुढेही प्रकल्प पूर्ण करताना वाढू शकणाऱ्या अनपेक्षित खर्चाला सरकारने वेळच्या वेळी मंजुरी दिली तरच या मान्यतेला अर्थ राहील. मात्र न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा आटापिटा पालकमंत्र्यांनी लावला आहे.
कितीही संभ्रम निर्माण केला तरी जनतेला यातील सत्य माहीत आहे. पुढील काळात निळवंडे कालव्यांच्या कामात विघ्न आणले नाही तरीसुद्धा लाभधारक शेतकऱ्यांवर उपकार केल्यासारखे होईल, असे थोरात म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.