आज भारतात शेतीशी निगडित ३०० पेक्षा जास्त कंपन्या आणि त्यांची ५००० पेक्षा जास्त उत्पादने आहेत. गेल्या वर्षी २० हजार कोटींची कीडनाशके विकली गेली. ५०० कोटींचे बियाणे, तर १५०० कोटींची शेतीशी निगडित अवजारे यांची उलाढाल झाली. थोडक्यात, भारतामध्ये ४० हजार कोटींची उलाढाल फक्त शेतीशी निगडित निविष्ठांमध्ये (इनपुट) झाली.
आज ज्या पद्धतीने कृषी कंपन्या मार्केटिंग करत आहेत त्यावरून असे दिसत आहे, की यांचे प्रॉडक्ट नाही वापरले तर झाडाला मूळ आणि पाने फुटणार नाहीत. गेल्या वर्षी केवळ ह्युमिक ॲसिडची उलाढाल ही २३०० लाख रुपयाची होती ज्यावर कोणत्याही कृषी विद्यापीठाची शिफारस नाही किंवा त्यांना कोणत्याही नियमात अजून बसवले नाही. (Agriculture Financial Management)
आज तंत्रज्ञानाच्या नावाखाली कृषी डायरीमधील लेख किंवा वेबसाइटवरील माहिती कॉपी पेस्ट करून ती विकली किंवा त्याने शेतीचे उत्पादन वाढले असे सांगितले जात आहे. ज्या ड्रोनने फवारणी करा म्हणतात पण त्याच ड्रोनने पीकविमा नुकसान भरपाईचे निकष लावावेत असे कुणी म्हणत असेल, तर त्याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे.
यू-ट्यूबचे किती फॉलोअर आहेत किंवा व्हॉट्सॲपवर ग्रुपमध्ये किती लोक आहेत, यावर आज बन्याच कंपन्या व्हिडिओ तयार करून अपलोड किंवा नुसता मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी २० हजार ते ५० हजार रुपये देतात.
उगाच नाही वाढत शेतीचा खर्च. आज मार्केटिंग च्या नव्या युक्त्या काढून खिसा कसा रिकामा करता येईल, यासाठी कोट्यवधी रुपयांची पॅकेज देऊन लोक ठेवली आहेत. आज मातीला सुद्धा अमिनो ॲसिड म्हणून विकणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या बाजारात आहेत.
आपण मात्र पावसाळ्यात माती वाहून जाऊ नये यासाठी साधा शेतावर बांध घालत नाहीत किंवा झाडे लावत नाहीत पण हो एक हजार रुपये देऊन २५ किलो किंवा पाच किलो चे बकेट डोळे झाकून आणतो.
रोग, कीड आणि खत नियोजन करते वेळी शेतीला समजून घेतले पाहिजे. एखाद्याने १० बॅग अमुक खत टाकले म्हणजे मला टाकायलाच पाहिजे, असे नसते. तो नोकरी करून शेती करत आहे तुम्ही नाही. अशा काळात योग्य वाचन आणि विचारांची देवाण घेवाण झाली पाहिजे. यू-ट्यूबवर १० मिनिटे व्हिडिओ पाहण्यापेक्षा कृषी विद्यापीठ किंवा जाणकार शेतकरी मित्रांच्या शेतावर भेट देणे कधीही फायद्याचे ठरेल.
सोयाबीनला सात हजार रुपये भाव लागणार यामुळे शेतकरी खत औषधे आणि टॉनिकवर अमाप खर्च करतो. उत्पादन कमी झाले तर कोणतीच कंपनी जबाबदारी घेत नाही उलट त्याला सांगते पाणी जास्त पडले असेल, पाऊस नव्हता त्या वेळी फवारणीची वेळ चुकली असेल असे अनेक कारणे देऊन कंपन्या मोकळ्या होतात.
येणारा काळ तुमचा खिसा रिकामा करेल. केवळ मी झिरो बजेट शेती, सेंद्रिय शेती किंवा फक्त रसायन वापरून केलेली शेती, असे फायद्याचे नाही तर शेती करताना या दोघांमधील मध्य साधला पाहिजे. येणारा शेतीचा काळ तुमच्या हातात नाही पण विचारपूर्वक शेतीचे आर्थिक नियोजन करणे तुमच्या हातात आहे.
- रवींद्र बोटवे, बाणेर, पुणे
: ९६८९५००४२८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.