
Washim News : येत्या खरीप हंगामात खताची कमतरता जाणवणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी. कृषी केंद्रांनी कोणत्याही कंपनीच्या खतांची साठेबाजी करू नये. जबरदस्तीने खतांसोबत शेतकऱ्यांना अन्य वस्तू घेण्याचा आग्रह कंपनीने कृषी केंद्रामार्फत शेतकऱ्यांना करू नये. खतांचे दर कमी झाले असल्यास कमी झालेल्या दरानेच खतांची विक्री कृषी केंद्रांनी करावी.
शेतकऱ्यांची विक्री दराबाबत फसवणूक करू नये. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांना कृषी निविष्ठा कंपन्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त खते व बियाणे, बळजबरीने पुरविल्यास संबंधितांवर रीतसर कारवाई करण्यात येईल. कृषी केंद्रांना देण्यात येणाऱ्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे, अन्यथा पालन न करणाऱ्या कृषी केंद्रावरही कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिला.
जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची आढावा बैठक श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी त्या बोलत होत्या. सभेला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ पाहा, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अभिजित देवगीरकर, विविध खत, बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समित्यांचे कृषी अधिकारी आणि तालुका निविष्ठा संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, जिल्ह्यात शेतकरी उत्पादक संस्थाची संख्या वाढविण्यावर भर द्यावा. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा चांगला भाव मिळण्यास मदत होईल. जिल्हा प्रशासनाने येत्या दोन महिन्यांत १० लाख जलतारा शोषखड्डे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला जलतारा शोषखड्डे निर्माण करण्याबाबत जनजागृती करावी.
कंपन्यांनी आपल्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी. कृषी केंद्रांनी एका विशिष्ट कंपनीची उत्पादित निविष्ठा खरेदी करण्याबाबत शेतकऱ्यांना आग्रह करू नये. शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्यास कृषी विभागाने प्रोत्साहित करावे. श्री. शाह म्हणाले, की ज्या कंपनीचे बियाणे कृषी केंद्राकडे येईल, त्या विक्रेत्याने त्या बियाण्यांची उगवण क्षमतेची खात्री करुन बियाण्यांची विक्री करावी.
कृषी निविष्ठांच्या तपासणीसाठी भरारी पथके व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. सन २०२४-२५ या वर्षात चार लाख ५ हजार ३६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित होती. तर प्रत्यक्षात तीन लाख ९७ हजार ८९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. सन २०२५-२६ या वर्षात चार लाख एक हजार क्षेत्रावर लागवड प्रस्तावित आहे. खरीप हंगामात दोन लाख ३६ हजार ३७ क्विंटल बियाण्याची गरज भासणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.