Land Dispute : शेतजमीन, मालमत्तेच्या वादात साधी माणसंसुध्दा भारी डोकं चालवतात...

नव्या पिढीमध्ये जमिनीचा वाद निघू नये म्हणून म्हातारपणी चारही भावांनी त्यांच्या जमिनीचे वाटप करायचे ठरविले. सूर्यभान थोरला होता आणि कुटुंबाचा कारभारी पण होता. घरातले व बाहेरचे सर्व व्यवहार सूर्यभान करीत असे.
Agriculture Land Dispute
Agriculture Land DisputeAgrowon
Published on
Updated on

Agriculture Land Dispute: एका गावात सूर्यभान नावाचा एक शेतकरी होता. त्याला भगवान, तुकाराम, निवृत्ती असे तीन भाऊ होते. सर्व जण एकत्र कुटुंबाच्या मालकीची जमीन आजोबापासूनच कसत होते. आता सर्व भाऊ वयाने साठीच्या वर गेले होते.

नव्या पिढीमध्ये जमिनीचा वाद (Agriculture Land Dispute) निघू नये म्हणून म्हातारपणी चारही भावांनी त्यांच्या जमिनीचे वाटप (Land Distribution) करायचे ठरविले. सूर्यभान थोरला होता आणि कुटुंबाचा कारभारी पण होता.

घरातले व बाहेरचे सर्व व्यवहार सूर्यभान करीत असे. सूर्यभानला चार मुले, भगवानला एक मुलगा व एक मुलगी, तुकारामला दोन मुली व निवृत्तीला एक मुलगा व एक मुलगी होती.

Agriculture Land Dispute
Grazing Land : गायरान जमिनीवर शेती करणाऱ्यांच्या नावे सातबारा करा

वाटपासाठी जी बैठक झाली, त्या वेळी सूर्यभानने पहिल्या बैठकीत, ‘‘आता आपण वयोवृद्ध झालो असून, सगळ्यांची मुले मोठी झाली आहेत. आपल्या सर्वांच्या संमतीने जमिनीचे वाटप करून घेऊ. आता काळ बदलला आहे.

आपले निभावून गेले, मात्र पुढच्या पिढीत वाद होऊ नये म्हणून ज्याची त्याची जमीन वाटून द्यावी असे मला वाटते.’’ असे सांगितले व इतर सर्व भावांनी पण त्याला होकार दिला.

त्यानंतर सूर्यभान म्हणाला, की आपल्या चार भावांमध्ये मिळून एकूण १० मुले आहेत. त्यामुळे जमिनीचे आपण १० हिस्से करू. मी एका वकिलाला विचारून आलो आहे.

Agriculture Land Dispute
Land Dispute : जमिनीविषयक तंटे

‘‘जेवढी मुले तेवढ्या वाटण्या होतील.’’ असा त्याने हिशेब मांडल्यावर राहिलेले तीन भाऊ त्याला म्हणाले, ‘‘आपण चार भाऊ आहोत. आधी आपल्या चौघांच्या चार वाटण्या झाल्या पाहिजेत.

तुझ्या वाट्याला जेवढी जमीन येईल तेवढी तू तुझ्या चार मुलांना वाटून दे.’’ कारभारी असल्याचा व स्वत:लाच जास्त मुले असल्याचा फायदा करून घेण्यासाठी सूर्यभानने हे डोके चालवले होते.

त्यानंतर दोन-तीन घरगुती बैठका झाल्या, पण सूर्यभान काही चार वाटण्या करायला तयार होईना. शेवटी धाकट्या निवृत्तीने हे भांडण दिवाणी कोर्टात नेले.

तीन वर्षांनंतर वाटपाच्या दाव्याचा निकाल लागला आणि दिवाणी कोर्टाने एकूण जमिनीमध्ये चार भावांचे चार हिस्से पाडण्याचे आदेश कलेक्टरला दिले व प्रत्येकाला एक चतुर्थांश जमिनीचा हिस्सा दिला.

या गोष्टीवरून साधी वाटणारी माणसेसुद्धा कधी काय डोके चालवतील आणि घरात किंवा कुटुंबात स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल याचा विचार करीत असता हे लक्षात येते.

आयुष्यभर कारभार पाहिलेल्या सूर्यभानला त्याची मागणी चुकीची आहे हे समजत नसेल काय? माणूस आणि प्रॉपर्टी यांचा विचार करताना अशा या मानवी प्रवृत्तीला समजून घेणे अवघड आहे.

जुने खरेदी खत

दुष्काळी भागातील वडगाव या गावामध्ये सखाराम नावाचा एक शेतकरी होता. त्याची एकूण १२ एकर जमीन एका ओढ्याशेजारी होती. या ओढ्याला दरवर्षी फक्त पावसाळ्यात दोन-तीन वेळा पूर येत असे. राहिलेल्या काळात बहुतेक वेळा हा ओढा कोरडाच असे.

सखारामच्या जमिनीच्या जवळच ओढ्याचे पात्र अतिशय रुंद, वाळू आणि दगड-धोंड्यांनी भरलेले होते. पलीकडे बरीच जमीन पडीक होती.

कित्येक वर्षे ही जमीन कोणीच कसत नव्हते. एक दिवस सखारामच्या बायकोला घरातील अडगळीच्या एका खोलीत जुन्या एका पत्र्याच्या पेटीमध्ये काही जुने कागद सापडले. सखारामने हे कागद पाहिले असता त्यामध्ये पंचवीस वर्षांपूर्वीचे त्याच्या आजोबांनी खरेदी केलेले जमिनीचे जुने खरेदी खत सापडले.

हे खरेदीखत एक एकराचे होते मात्र नोंदणीकृत होते. सखारामने त्याच्या ओळखीच्या मित्रांना विश्‍वासात घेऊन हा खरेदी खताचा कागद दाखवला. सखारामच्या मित्रांनी त्याला सांगितले, की या दस्ताला नोंदवून बारा वर्षे उलटली आहेत.

शिवाय सही करणारे सगळे लोक मरून गेले आहेत. आता आजोबा जरी जिवंत असते, तर ही जमीन तुला मिळू शकली असती. एवढी वर्षे झाली तरी घरातली पेटी तू उघडू नये म्हणजे काय? असा प्रतिप्रश्‍नच सखारामच्या मित्रांनी केला. त्यामुळे या कागदाचा आता काहीच उपयोग नाही असे त्याला वाटले.

सखारामने मात्र हा दस्त तालुक्यातल्या एक प्रसिद्ध वकिलाला नेऊन दाखवला. वकिलांनी त्याला खरेदी खतात लिहिलेली जमीन नक्की कोठे आहे, ही जमीन दुसरा कोणी कसतो का? या जमिनीचा ७/१२ आज देणाऱ्याच्या नावावर आहे का?

गावच्या नकाशात ही जमीन कोठे आहे? अशी माहिती मागितली. थोड्या दिवसांत ही सगळे कागदपत्रे तपासून त्यांनी ही खात्री केली, की चुकून या जमिनीची नोंद करायचे आजोबांकडून राहिले आहे.

आजही गावदफ्तरी ७/१२ वर जमीन देणाऱ्याच्या नावावर होती. त्यानंतर सखारामने गाव कामगार तलाठ्याकडे अर्ज दिला आणि काही आठवड्यांत पेटीत सापडलेल्या नोंदणीकृत खरेदीखताच्या आधारे सखारामचे नाव ७/१२ ला लागले.

सखारामचा आनंद गगनात मावेनासा झाला. या गोष्टीवरून रजिस्टर झालेला खरेदीचा दस्त जुना होत नाही. तथापि, या दस्ताची अंमलबजावणी करण्यासारखी परिस्थिती उरली आहे काय हे पाहावे लागते.

जर मूळ मालकाने पुन्हा दुसऱ्या कोणाला तरी मधल्या काळात जमीन विकली असती, तर मात्र सखारामचे नाव लावणे अवघड होते.

‘हजीर तो वजीर’ ही म्हण बऱ्याच वेळा प्रॉपर्टीच्या ताब्याच्या बाबतीत खरी ठरते. त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी व हितसंबंधित व्यक्तींनी दक्षता घेतली पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com