Tur Pest Management : तुरीवरील मर, वांझ रोगांसह अळी, माशीचा बंदोबस्त

Tur Disease Management : महाराष्ट्रामध्ये तूर या महत्त्वाचे कडधान्य पिकामध्ये मर, फायटोप्थोरा आणि वांझरोग हे महत्त्वाचे रोग येतात. त्याच बरोबर शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा), पिसारी पतंग, शेंगमाशी या महत्त्वाच्या किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठे नुकसान होते.
Tur Crop
Tur CropAgrowon
Published on
Updated on

Tur Crop Management : बदलते वातावरण, दरवर्षी पीक पद्धतीमध्ये फारसा बदल होत नसल्यामुळे तूर पिकामध्ये जैविक व अजैविक ताण निर्माण होत आहेत. या वर्षी पेरणी झाल्यानंतर पीक रोपावस्थेत असताना १८ ते २० दिवसांपासून सतत आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकावर फायटोप्थोरा व मर रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे.

मर रोग

रोगकारक बुरशी ः फ्युजारिअम उडम

प्रादुर्भाव कालावधी ः रोपावस्थेपासून ते शेंगा भरण्याच्या अवस्थेपर्यत. शेंगा पक्वतेच्या काळातील प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते.

अनुकूल वातावरण ः जमिनीचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस व ओलावा २० ते २५ टक्के.

लक्षणे ः पाने व त्याच्या शिरा पिवळ्या होतात. झाडाचे शेंडे मलूल होऊन कोमेजतात. झाड हिरव्या स्थितीत वाळते. जमिनीलगतच्या खोडाचा भाग काळ्या रंगाचा बनतो. मूळ उभे चिरल्यास मध्य भाग काळा झालेला व बुरशी वाढलेली दिसते. कधी कधी खोडावरही पांढरी बुरशी आढळते. वाळलेल्या झाडाची पाने गळत नाही. अंशतः मर म्हणजेच झाडाच्या एक-दोन फांद्या वाळणे, हेही लक्षण आहे. असे रोगग्रस्त झाड उपटण्याचा प्रयत्न केल्यास सहज उपटले जात नाही.

Tur Crop
Tur Disease : तुरीतील फायटोप्थोरा ब्लाईट रोगाच नियंत्रण

प्रतिबंधात्मक उपाय

मध्यम व उशिरा परिपक्व होणाऱ्या वाणांमध्ये मर रोगाचा अधिक प्रादुर्भाव दिसतो.

सलग तूर पिकापेक्षा तुरीसोबत ज्वारीचे आंतरपीक घेतल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.

पाणी साचणाऱ्या व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत तुरीचे पीक घेऊ नये.

पूर्वी मर रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पुढील चार ते पाच वर्षांपर्यंत तूर लागवड करू नये. अशा क्षेत्रात तृणधान्य पिके घ्यावीत.

नियंत्रणाचे उपाय

उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापू द्यावी.

शेतामध्ये रोगग्रस्त झाडे दिसताच त्वरित उपटून टाकावी.

रोग प्रतिबंधक वाण उदा. बीडीएन ७१६, गोदावरी, बी.एस.एम.आर. ७३६, बी.एस.एम.आर. ८५३, आय.सी.पी.एल.-८७११९, सी-११, पीकेव्ही तारा इ. चा वापर पेरणीसाठी करावा.

बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बोक्झिम (३७.५) + थायरम (३७.५ टक्के डब्ल्यू. एस.) (संयुक्त बुरशीनाशक) ४ ग्रॅम व त्यानंतर ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी.

पेरणीच्या वेळी २ किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या २०० किलो शेणखतात मिसळून द्यावा.

खोडावरील करपा

(अ) कोलेटोट्रायकम करपा : रोगकारक बुरशी कोलेटोट्रायकम डिमँशिअम.

लक्षणे : कोलेटोट्रायकम करपा रोगात खोडावर, फांद्यावर काळ्या करड्या रंगाचे चट्टे आढळतात. रोगाची तीव्रता अधिक असल्यास फांद्या व झाडे वाळतात.

(ब) फायटोप्थोरा करपा : रोगकारक बुरशी फायटोप्थोरा ड्रेसलेरा.

लक्षणे ः फायटोप्थोरा करपा या रोगामुळे पानावर ओलसर चट्टे तसेच खोडावर तपकिरी चट्टे जमिनीलगत किंवा जमिनीपासून काही इंच अंतरावर आढळतात. नंतर हे चट्टे वाढत जाऊन खोडा सभोवती खोलगट भाग तयार होतो. काही वेळा खोडावर गाठीसुद्धा तयार होतात. या चट्ट्यांवर अनुकूल वातावरणात पांढरट गुलाबी रंगाची बुरशी वाढलेली दिसून येते. हे चट्टे वाढून झाडाच्या मुख्य बुंध्याला वेढतात, त्यामुळे झाड कमकुवत होऊन त्या ठिकाणी चटकन तुटते. या खोडाच्या चट्ट्याचा उभा छेद घेतल्यास खोडाचा आतील भाग तपकिरी काळा पडल्याचे दिसते. बरेचदा खोडावर २ ते ३ मि.मी. खोल व २ ते ४ सेंटिमीटर लांब भेगा पडलेल्या दिसतात.

अनुकूल वातावरण ः सततचा रिमझिम पाऊस, वातावरणातील आर्द्रता ८० ते ८५ टक्के व २२ ते २५ अंश तापमान या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरतात.

प्रसार ः पाण्यातून व हवेद्वारे या रोगाच्या बीजाणूंचा प्रसार होतो.

Tur Crop
Tur Pest Management : तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन

नियंत्रणाचे उपाय

पेरणी करताना सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा.

पाणी साचणाऱ्या व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत तूर पीक घेऊ नये.

बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बोक्झिम (३७.५) + थायरम (३७.५ टक्के डब्ल्यू. एस.) (संयुक्त बुरशीनाशक) ४ ग्रॅम. त्यानंतर ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी.

पाऊस जास्त पडल्यास शेतात चर खोदून अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे.

रोगग्रस्त शेतात ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

रोग दिसताच मेटॅलॅक्झिल (४ टक्के) + मॅन्कॉझेब (६४ टक्के डब्ल्यूपी.) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे संपूर्ण झाडावर प्रामुख्याने खोडावर व फांद्यावरही फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास ८ ते १० दिवसांनी पुन्हा फवारणी करावी.

किडींची ओळख

तूर पिकावर जवळपास २०० किडीच्या प्रादुर्भावाची नोंद असली तरी त्यातील शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग आणि शेंगमाशी या मुख्य किडी आहेत.

शेंगा पोखरणारी अळी (हेलिकोव्हर्पा)

कळी, फुलोरा ते काढणीपर्यंत मोठा प्रादुर्भाव. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचा प्रादुर्भाव कळी व फुलांवर, तर नंतरच्या अळी अवस्था शेंगावर होतो.

शेंगमाशी

प्रौढ माशीने कोवळ्या शेंगेच्या आत घातलेल्या अंड्यातून बाहेर आलेली अळी तूर दाण्यांचा पृष्ठभाग कुरतडून खाते. त्यामुळे दाण्यावर नागमोडी खाचा तयार होतात. त्यावर बुरशी वाढून दाणे कुजतात.

सर्व्हेक्षण

पीक कळी व फुलोरा अवस्थेत आठवड्यातून किमान एकदा हेक्टरी २० ते २५ झाड किडींसाठी तपासावीत. प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे पिकाच्या १ फूट उंचीवर लावावेत. सापळ्यात सलग ३ दिवस नर पतंगाची संख्या ८ ते १० इतकी आढळली किंवा १ अळी प्रति झाड किंवा ५ टक्के कीडग्रस्त शेंगा दिसल्यास त्वरित पिक संरक्षणाचे उपाय योजावेत.

पिसारी पतंग

पावसाळ्याच्या उत्तरार्धात या किडीचे प्रमाण वाढते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या कळ्यांना, फुलांना व शेंगांना छिद्रे पाडून आतील भाग खातात. पूर्ण वाढलेल्या अळ्या प्रथम शेंगांचा पृष्ठभाग खरडून खातात. नंतर शेंगाच्या बाहेर राहून आतील दाणे खातात. पुढे त्या शेंगावर अथवा शेंगावरील छिद्रांमध्ये कोषावस्थेत जातात.

एकात्मिक कीड व्यवस्थापन

उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी केल्यास किडींचे कोष व अन्य अवस्था नष्ट होतील.

बांध व शेत परिसरातील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पर्यायी खाद्य उदा. कोळषी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.

शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीसाठी पीक कळी अवस्थेत आल्यापासून १ फूट उंचीवर हेक्टरी ५-१० कामगंध सापळे (हेलिल्युवर / हेक्झाल्युवर) लावावेत.

झाडावरील मोठ्या अळ्या वरचेवर वेचून नष्ट कराव्यात. तूर झाड थोडेसे वाकडे करून हळूवार हलविल्यास अळ्या खाली पडतात. त्या गोळा करून नष्ट कराव्यात.

प्रति हेक्टरी १० ते ५० पक्षिथांबे उभारावेत.

वनस्पतिजन्य व जैविक कीडनाशक फवारणी (प्रमाण - प्रति लिटर पाणी)

पीक कळी अवस्थेत असताना निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा अझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि.

शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी विषाणूजन्य एचएएनपीव्ही. (५०० एल.ई.) १ मि.लि.

वरील सर्व उपायांच्या अंमलबजावणीनंतरही किडीने आर्थिक नूकसानीची पातळी गाठल्यास, फवारणी करावी. (प्रमाण - प्रति लिटर पाणी) पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना पहिली फवारणी क्विनॉलफॉस (२५ टक्के ई.सी.) २.८ मिलि किंवा फ्लूबेंडायअमाइड (३९.३५ टक्के एस.सी.) ०.२ मि.लि. किंवा फ्लूबेंडायअमाइड (२० टक्के डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम.

पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी : इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के एस.जी.) ०.४५ ग्रॅम किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि. किंवा लॅम्बडा सायलोथ्रीन (५ टक्के ई.सी.) १ मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८० ईसी) ०.७ मि.लि.

गरज भासल्यास २० दिवसांनी तिसरी फवारणी ः क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (९.३) अधिक लॅम्बडा सायलोथ्रीन (४.६ टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ०.४ मि.लि.

(* लेबल क्लेमयुक्त कीटकनाशके)

डॉ. मनोहर इंगोले (रोगशास्त्रज्ञ),

९४२१७५४८७८

डॉ. प्रज्ञा कदम (कीटकशास्त्रज्ञ),

८२०८५५५४२१

(कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com